Monday 18 May 2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 9


नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
तु फक्त खचू नकोस....

धीर बन स्वता:चा, फक्त तु खचु नकोस

काहीही बिघडल नाही अजुन, मागे तु वळू नकोस

आजवर जे दॆवू केलय नियतीने, ते आज दुर सारू नकोस

कर्म देतय, उपकार नाहीत ते, तु घोर जिवाला लावू नकोस

विश्वास ठेव तो नाही सोडणार हात तुझा, तु फक्त खचू नकोस....

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 8


नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
प्रवास.. जगलो तर जगण्याचा, मेलो तर मरणाचा.

अधीर मनाची विस्तृत भावना
कोठे जातोय कुणास कळेना
प्रवास मृत्युचा की जगण्याचा
हरण्याचा की जिंकण्याचा
पळण्याचा की थांबण्याचा
प्रवास.. जगलो तर जगण्याचा, मेलो तर मरणाचा.

आहे सतत भितीचा
फक्त नित्य कसोटीचा
अनवाणी पावलांनी चालण्याचा
पोराबाळांच्या सोबतीचा
तहान भुकेने तडपण्याचा
प्रवास.. जगलो तर जगण्याचा, मेलो तर मरणाचा

नित्य नव्या प्रश्नाचा
सतत धडपडण्याचा
स्वकियाचे हाल पाहण्याचा
नव्हे हाल सोसण्याचा
नित्य नव्या अनुभवाचा
प्रवास.. जगलो तर जगण्याचा, मेलो तर मरणाचा

अनामिका (PMJ)

Tuesday 12 May 2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 7

नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..

भारतीय आम्ही आमच्याकडे सार्‍या जगाच लक्ष आहे.
कोरोना तुला हरवायला, आम्ही सारेच दक्ष आहे


कर्तव्यदक्ष डाॅक्टर्स आमुचे, रात्रंदिवस सज्ज आहे
जीवाची पर्वा न करता, परिचारिका राबत आहे
सफाई कर्मचारी आपले कार्य, ईमानाने करत आहे
भारतीय आम्ही आमच्याकडे सार्‍या जगाच लक्ष आहे.
कोरोना तुला हरवायला, आम्ही सारेच दक्ष आहे

पोलीस आमुचा लठवय्या, अजुनदेखील थकला नाही
समाजसेवक आमुचा, अजुनही सजग आहे
सिमेवरच्या शत्रुवर, याही परिस्थीतीत वचक आहे
भारतीय आम्ही आमच्याकडे सार्‍या जगाच लक्ष आहे.
कोरोना तुला हरवायला, आम्ही सारेच दक्ष आहे

शास्त्रज्ञ अामुचे लस शोधण्यात, सतत व्यस्त आहे
शासन कर्मचार्यासह नियमित कार्यमग्न आहे
जनतेच्या धैर्याच तर कौतुच कौतुक आहे
भारतीय आम्ही आमच्याकडे सार्‍या जगाच लक्ष आहे.
कोरोना तुला हरवायला, आम्ही सारेच दक्ष आहे

अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 6

नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..

जुन तेच नव होतय, बघा युग कस बदलतय...

रामायण महाभारत आवडीने बघतोय
जुन्या आठवणी नव्याने मुलानां सागतोय
जुन तेच नव होतय, बघा युग कस बदलतय..

जुने फोटो सवडीने पाहतोय
त्यातील नाती मुलानां समजावतोय
जुन तेच नव होतय, बघा युग कस बदलतय..

पुर्वी हातपाय धुवूनच गुळपाणी देवून घरात प्रवेश होता
आज बाहेरून आल्यावर स्वत:ला सॅनिटाइज करतोय
हातपाय धुतोय, अंघोळही करतोय
जुन तेच नव होतय, बघा युग कस बदलतय..

अंतर ठेवून राहू लागलोय, अंतर ठेवून बोलू लागलोय
संपर्कातील मंडळीन बरोबर, फोनवरच बोलू लागलोय
वृद्ध मंडळी आराम तर जवान सगळी कामे करताय
जुन तेच नव होतय, बघा युग कस बदलतय..

पुर्वीसारखे एकत्र जेवू लागलोय, प्रत्येकाच्या आवडी निवडी समजु लागलोय..
एकत्र प्रार्थनेची ताकद कळतेय,एकत्र शुभमंकरोती म्हणू लागतोय
जुन तेच नव होतय, बघा युग कस बदलतय
बघा युग कस बदलतय.....

अनामिका (PMJ)

Monday 11 May 2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 5


नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
भारत माते तुझ्या चरणी लीन झालोय..

हेलावल मन आज सुन्न झालोय, भारत माते तुझ्या चरणी लीन झालोय..
तुझीच लेकर आहोत..बघ जरा आमुच्याकडे
थांबव हा तांडव, बघ जरा स्वता:कडे..
चुक आहे आमुची, म्हणुन इतक का नाराज व्हायचय?
लेकरू आहे तुझच, म्हणुन माफ नाही का करायचय?
हेलावल मन, आज सुन्न झालोय,भारत माते तुझ्या चरणी लीन झालोय..

तु निर्माण केलेल सगळं दिलस आमुच्याकडे
मग आजच का हवंय सगळ तुला तुझ्याकडे?
आमुच्याशिवाय सांग तु, एकटीनं कस जगायचय?
लेकरू आहे तुझच, म्हणुन माफ नाही का करायचय?
हेलावल मन, आज सुन्न झालोय,भारत माते तुझ्या चरणी लीन झालोय..

शिकवणीचा हा धडा चागलाच लक्षात राहील अलिकडे
यानंतर खरच सांगतो काहीच मागणार नाही तुझ्याकडे
मला परत हसत, खेळत, सर्वानंसोबत जगायचय..
लेकरू आहे तुझच, तुला माफ नाही का करायचय?
हेलावल मन, आज सुन्न झालोय,भारत माते तुझ्या चरणी लीन झालोय..
अनामिका (PMJ)

Friday 8 May 2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 4


नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
ये कह के दिल ने मेरे हौसले बढाए है।
गमों की धूप के आगे खुशी के साए है।

कोरोनामुळे काय झाले याचा विचार करतांना या आपत्तीने आपण काय शिकलो? हे पण खूप महत्वाचे आहे. शेवटी काहीही झाले तरी मनाने मात्र हार मानू नये, हेही तितकेच महत्वाचे...

संकटाने आम्हाला काय शिकवल ?
सर्वप्रकारचे मोठ्याप्रमात प्रदुषण करणारे आम्ही,
संकटान निसर्गाच सुंदर रुप पहायला शिकवल...

सौंदर्य प्रसाधने व ब्युटी पार्लरवर खर्च करणारे आम्ही,
संकटान साधी राहणीमानच महत्व शिकवल..

बडेजावपणासाठी बाहेर होटलींग करणारे आम्ही,
संकटान घरच्या अन्नाची चव चाखायला शिकवल..

लहान-मोठ्या कार्यक्रमावर अवास्तव खर्च करणारे आम्ही, संकटान साधेपणान सोहळा करायला शिकवल..

घरासाठी जगुनही कधीही घरी न राहणारे आम्ही,
संकटान आपल्या माणसांना जवळून ओळखयला शिकवल...

जगण्यासाठी ध्येयावेडे बेधूंदपणे वागणारे आम्ही, संकटान जगण्यासाठीच थांबायला शिकवल...

आर्थीक, भावनिक, मानसिक,सामाजिकरित्या अपूर्ण असणारे आम्ही,
संकटान आम्हाला स्वयंपूर्ण होण्यास शिकवल
स्वयंपूर्ण होण्यास शिकवल....
अनामिका (PMJ)

Wednesday 6 May 2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 3

नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..

"सद रक्षणाय, खल निग्रहणाय" अस म्हणत आमचा वर्दीतला माणूस लढतोय... तो कधीच पाहत नाही जात अन् धर्म देशाचे रक्षण करणे एेवढेच ते काय त्याचे कर्म
वर्दीतला माणूस खंबीरपणे उभा असतो, म्हणून गर्दीतला माणूस मनसोक्त जल्लोष करू शकतो.!
सदैव दक्ष खाकी वर्दीतल्या कर्तव्यदक्ष पोलीस माणसा तुला सलाम.....

आमचा वर्दीतला माणूस लढतोय...

भुक तहान विसरून, उन्हातान्हात भिरतोय
दिवस रात्र माहीत नाही, प्रत्येक क्षणी झिजतोय
आमचा वर्दीतला माणूस लढतोय...

कोरोनाच्या या संकटाशी, रोज दोन हात करतोय संकटाला आपल्या घरात न येवू देता, दारातच नडतोय
आमचा वर्दीतला माणूस लढतोय...

चुकणाऱ्या शिक्षा,भुकेलेल्याला अन्नदान करतोय
जनजागृती करण्याकरता नवनवीन युक्त्या काढतोय
आमचा वर्दीतला माणूस लढतोय...

बरेच दिवस स्वगृही न जाता तो देशसेवेच व्रत करतोय कधी पोलीस स्टेशन, कधी रूग्णालय, कधी रस्त्यावर तास अन् तास डूव्टी करतोय.
आमचा वर्दीतला माणूस लढतोय...

ईमानदारीने जगतो, देशाची आन बान शान राखतोय
जबादारी मोठी समाज रक्षण्याची कर्तव्यदक्षतेने निभावतोय
आमचा वर्दीतला माणूस लढतोय...
अनामिका (PMJ)
16-04-2020
 

Monday 4 May 2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 2

नमस्कार मित्रहो सुप्रभात....
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
सध्या काहीदिवस एकच विचार करू या
"सर सलामत तो पगड़ी पचास", "जान है तो जहान है"

फक्त आम्ही जगलो पाहीजे...
पैसा अडका नुकसान नफा, नको ताळेबंद आता..
वाट्टेल ती किंमत देवू आम्ही, जीवन हाच आमुचा नफा
फक्त आम्ही जगलो पाहीजे...

नको बर्गर, नको पिस्ता, पास्ता, नको चायनिज, नको सुग्रास जेवणाचा घाट, नको आता पंचपक्वानांचे ताट
पोटाची खळगी भरेल इतका पुरूदे अन्नसाठा..
फक्त आम्ही जगलो पाहीजे...

गाडी,बंगला,बँक बॅलेन्स,नोकर-चाकर काही काही नकोय.
नकोय खुप सुखसोई, नको आरामाच्या सवयी
अन्न, वस्र, निवारा पुरू दे सर्वत्र
फक्त आम्ही जगलो पाहीजे...

नको मोबाईल, कम्प्यूटर, इंटरनेट, टिव्ही, मुव्हीज,वेब सिरीज, काही काही नको रे ..
माणसाला माणसाची शेवटपर्यंत, सोबत तेवढी असली पाहीजे..
फक्त आम्ही जगलो पाहीजे...

इच्छा, आकांक्षा, लोप पावल्या, लोप पावल्या दाही दिशा .
सृष्टी सौंदर्य वाढविण्यासाठी माणूस जगु दे हाच वसा
फक्त आम्ही जगलो पाहीजे...
अनामिका (PMJ)
15-04-2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 1

नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
देशाच्या आत घुसू पाहाणाऱ्या संकटानं आज अनपेक्षितपणे मोठा विसावा आपल्या सर्वांच्याच वाट्याला आणला आहे. मात्र हा विसावा वाट्याला न आलेले, आपल्या सुरक्षिततेसाठी जिवाची पर्व न करता संकटाशी दोन हात करणारे वैद्यकीय क्षेत्रातील आपले डॉक्टर या संकटाला आपल्यापर्यत पोहोचू देत नाहीत. या संकटाला संपवायच या एकच ध्येयानं.. सुट्टी न घेता ते रात्रनदिवस संकटाशी दोन हात करताहेत... त्या धैर्याला खरचं सलाम! अश्या परिस्थितीतही काही लोक चुकीच्या पध्दतीने वागतात तेव्हा....

          ते डाॅक्टर आहेत देव नाही......
कोरोना मुळे जगाची झाली आहे दुरावस्था..
ते डाॅक्टर आहेत देव नाही, कशी बदलावी मानसिकता

शासन ओरडुन सांगतय, विदेशातील आकडे पुरावा देताय..
एक एक पेशन्टं वाचवतानां, नाकी त्यांच्या नऊ येताय..
ते डाॅक्टर आहेत देव नाही, कशी बदलावी मानसिकता

आपण सुसाट मोकाट फिरतोय, काहीही कारण सांगुन
तासागणित पेशंन्ट वाढतोय, वाईट वाटत राहुन राहुन ते डाॅक्टर आहेत देव नाही, कशी बदलावी मानसिकता

फक्त दोन तास Hand close घालुन बघा कस वाटत..
ते पीपीई किट घालुन दिवस दिवस लढताय...
भुक तहान आहे त्यांनाही, पण पाणी प्यायला वेळ नाही
ते डाॅक्टर आहेत देव नाही, कशी बदलावी मानसिकता

डॉक्टरांच्या मानसिकतेचं, कोणाला काही पडलेलं नाही 
त्यांच्यावरच्या हल्ल्याचे आता, समाजाला दूःखच नाही 
समाजाला वाटत नाही त्यांच्याविषयी आत्मियता 
मग त्यांनीच का करायची तुमच्या आरोग्याची चिंता ?
ते डाॅक्टर आहेत देव नाही, कशी बदलावी मानसिकता

आता आता कुठे साथ देवु लागलीय, काही आपली डोकी..
डॉक्टर नाही विसरले अजुनही, त्यांची ती सामाजिक बांधिलकी
दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका ते अहोरात्र सेवा देताय..
ते डाॅक्टर आहेत देव नाही, कशी बदलावी मानसिकता

लक्षात ठेवा तुमच्या अश्या वागण्यान, भीतीच्या भावनेने
त्यांची भक्ती आता हरवेल, जिवनदान देण्याची त्याची अनोखी शक्ती संपेल ...
ते डाॅक्टर आहेत देव नाही..पण आज देवापेक्षा कमी नाही..पण आज देवापेक्षा कमी नाही...

अनामिका (PMJ)
14-04-2020

Tuesday 14 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस एकविस..13/4/2020

भारत हमारी माँ है माता का रूप प्यारा
करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा ||


कर्म म्हणजे कर्तव्य करणे हाच अधिकार आहे. कर्तव्याचा अधिकार ही घराने व्यक्तीला दिलेली व मिळालेली देणगीच आहे. एक अंधळा व एक लंगडा – दोघांनाही एकाच गावी जायचे आहे. ते दोघे जर परस्पर सहकार्याने काम करतील – म्हणजे अंधळा लंगड्याला उचलून घेईल व लंगडा अंधळ्याला वाट दाखवील, तर काम सुलभ होईल. घराच्या भल्याकरिताही कर्तव्याची जाण व अधिकाराचे भान दोन्ही आवश्यक आहेत. स्वतःचे कर्तव्य बजावत असता तसाच व्यवहार इतरांकडून अपेक्षिण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असतीच. तसे होत नसेल तर तशी जाणीव येणे हेही एक कर्तव्यच बनते. घरातील मोठी माणसे या सर्व गोष्टी कुशलतेने करवून घेऊन शकतात.

व्यक्तीला हा कर्तव्याचा अधिकार प्राप्त झाला की, जणू काही तो अखिल विश्वाचा सम्राटच बनतो, असे म्हणायला हरकत नाही. केवळ नवीन खेळणे हातांत आले की, व्यक्ती त्याचा उपयोग आधी स्वतासाठी, स्वतावर प्रयोग करते. माझे स्वसंबंधी कर्तव्य-उत्तम, देहसंपदा,सद्गुणांचा विकास अन या सगळ्या गोष्टींचा सत्कार्यासाठी उपयोग करण्याची बुद्धी- या सर्व गोष्टी प्राप्त करणे हे झाले स्वसंबधी कर्तव्य. यातूनच निर्माण होतो कुटुंबासंबंधी कर्तव्यभाव. कुटुंबीयांचा विकास व्हावा, त्यांची सुरक्षीतता, शिक्षण, स्वास्थ, मानसिक स्थैर्य व आवश्यक गोष्टींची पूर्तता यासाठी हा ‘ स्व‘ प्रयत्नशील राहतो. पण तेवढ्यापुरतीच त्याच्या कर्तव्याची मर्यादा असत नाही. शेजारीपाजारी- गाव- तालुका- म्हणजे समाज- राष्ट्र- पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती आदी सजीव स्रुष्टी- परमेष्टी असे हे वर्तुळ वुस्तारत जाते.

कर्तव्यविचार अधिकाधिक विकसित अगदी सहजपणे होत जातो. माझ्या कुटुंबीयांबद्दलची भावना हळूहळू विस्र्तुत होत जाते व शेजारीपजारीसुध्दा सुखी व्हावेत, असे वाटू लागते. शेजारच्या काका-काकुबद्दल आपुलकी वाटायला लागते. त्यांव्या आनंदात सहभागी होणे त्यांच्या अड्चणीच्या वेळी मदत करणे हा स्वभाव बनतो. शेजारची मुलगी माझी ताई,मावशी आत्या बनते. मग तिची कुचेष्टा करायला मन धजत नाही. कोणी कुचेष्टा करु लागले तरी राग येतो. आपल्या लक्षात येइल की, हा भाव कमी झाल्यामुळे आजकाल ‘स्त्री‘ वर वासनेला बळी पड्ण्याचे प्रसंग उदभवतात. साधारणपणे ज्या घरात ओळखीच्या मुला-मुलीना दादा, ताई, ती मुली- मुले अशा अनैतिक गोष्टीना बळी पडत नाहीत. हाच ममत्वाचा भाव पशुपक्षी, कीटक, वनस्पती यांबाबतही उत्पन्न होतो. त्यांचे रक्षण, त्यांच्याबद्दल ममत्वभाव या गोष्टी सहजरीत्या घडत राहतात. पूर्वी घराच्या उंच भिंतींना पक्षांच्या निवासासाठी विटांमद्ये पोकळ जागा आवर्जून ठेवली जायची. आजही मोठमोठ्या शहरांतून कबुतरे व पक्षी यांना धान्य घालण्यासाठी ठेवली जायची.

वरील सर्व कर्तव्य भाव आपण आपसुक शिकत
असतो नव्हे व्यवहारात वापरतो. तो वारसा आपल्याला आपल्या संस्कृतीने दिला आहेच पण आज हे सांगण्याचा उद्देश असा की हाच कर्तव्यभाव आपल्याला आता तन-मन-धन वापरून आपल्या भारत मातेकरीता दाखवायचा आहे आपल्यावर आलेल्या संकटाची तिव्रता आजुन कमी झालेली नाही उलट दुर्रदैवाने वाढत जात आहे त्यासाठी लाॅकडाउन हा शब्दही न ऐकलेले आपण 21 दिवस अगदी अतिमहत्वाच्या कामाखेरीच बाहेर गेलेलो नाही. घरातच बसून आहोत .देशाच्या उंबरठ्यावरून वेगानं आत घुसू पाहाणाऱ्या संकटानं आज अनपेक्षितपणे असा विसावा आपल्या सर्वांच्याच वाट्याला आणला आहे. कधी नव्हे ते आपण पाहातोय कि काही अपवाद वगळता सगळी नेतेमंडळी अद्वैत होऊन उभी ठाकलीहेत ह्या संकटाशी दोन हात करायला! दुजाभाव न करता एकीनं उभं ठाकलेलं आपलं राष्ट्र आपला येणारा भविष्यकाळ सुंदर करेलच आणि प्रकाशाची पाऊलवाट होत अवघ्या विश्वालाही सोनेरी पहाटेकडे घेऊन गेल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हां आपलाच आतला आवाज ऐकूया, आपल्याच आंतरवृत्ती जागृत करूया, दूत होऊन आलेल्या वेदनेला समजून घेऊया आणि स्वत:शी-प्रत्येकाशी-विश्वाशी जोडले जात तेजस्वितेशी एकरूप होवू या ....या प्रसंगी फक्त एकच पद्य रचना आठवते

भारत हमारी माँ है माता का रूप प्यारा
करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा ॥धृ॥
जननी समान धरती जिस पे जनम लिया है
निज अन्न वायु जल से जिसने बडा किया है
जीवन वो कैसा जीवन इसपे अगर न वारा ...

आपले स्वसंबधी कर्तव्य बाजुला ठेवून सामाजीक कर्तव्य करूया का? थोडा विचार 'करो ना'
अनामिका (PMJ)

Monday 13 April 2020

थोडा विचार करो ना' लॉकडाउन दिवस पहिला ...24/3/2020

"आज रात 12 बजे से पूरे देश में संपू’र्ण लॉकडाउन होने जा रहा है"

काल हा आवाज ऐकताच मनात धस्स झाल या आधी अस कधीही झाल नव्हत. माहेरी दोन दिवस राहायला आलेली मी आता आणखी काही दिवस माहेरी राहणार हे खरे, पण नवरोबा बिचारा एकटा कसा राहणार या अाणि अश्या अनेक गोष्टांचा विचार करत सकाळ कधी झाली ते कळलच नाही.
आजची सकाळ काही वेगळीच होती सगळे निवांत, चहाचा घोट घेत गप्पा करत बसलेले, कदाचित कुणालाच कसलीच घाई नव्हती, क्षणभर विसाव्यातलं सुखही अनुभवू न शकणारे आपण! आज ह्या संकटाच्या निमित्ताने का होईना जबरदस्तीने तरी काही क्षण स्थिरावलो.. घरातल्या घरातच घडलेल्या सुसंवादाचं नवखेपण अनुभवलं, आज मशिनीसारखं पळून कामाची वेळ गाठायची नव्हती. रोजच्या ताणतणाव, दडपणाचं ओझं वाहाणारं मन रितं होऊन हलकं झालं होतं... छोट्या छोट्या क्षणांतलं छोटंसं सुख अनुभवण्याइतकं झालं होतं.

देशाच्या उंबरठ्यावरून वेगानं आत घुसू पाहाणाऱ्या संकटानं आज अनपेक्षितपणे असा विसावा आपल्या सर्वांच्याच वाट्याला आला होता .मात्र हा विसावा वाट्याला न आलेल्यांची तीव्र आठवण मनात कायम आहेच. आपल्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरपासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यापर्यंतचा एकेकजण, संकटाला घराघरात पोहोचू न देता या संकटाला संपवायचय या ध्येयानं.. महत्वाचे निर्णय घेऊन त्याप्रमाणे यंत्रणा राबवणारे देशाच्या पंतप्रधानांपासून किमानतम श्रेणीतील संपूर्ण कर्मचारीवर्ग, जीवनावश्यक सेवा पुरविणारा प्रत्येकजण... असे आपलेच देशबांधव आपल्या ह्या निवांत क्षाणांतील सुखाला कारणीभूत ठरत आहेत ही भावना मात्र प्रत्येक क्षणी जाणवत होती. ह्या सर्वांना केवळ सुट्टी नाही, विसावा नाहीये इतकंच नाही, तर इतरांसाठी स्वत:च्या जिवाची पर्व न करता हे सारेजण संकटाशी दोन हात करताहेत... त्या धैर्याला खरचं सलाम!

आपण घरात बसून ह्या सर्वासाठी प्रार्थना करूच शकतो आणि त्याही आधी अजिबात घराबाहेर न पडता त्यांना मोठं सहकार्य करू शकतो. खरंच गंमत आहे बघा कि ह्या संकटापासून देश वाचवायचा असेल तर आपल्याला हत्यारं उपसून कुठंही लढाईला जायचंच नाहीये. शांतपणे स्वत:च्या घरट्यात फक्त विसावायचं आहे... खरंतर खूप सोपं आहे, म्हटलं तर खूप कठीणही आहे. मात्र मनावर ताबा ठेवून, आपल्याला सकारात्मकताही सोडायची नाहीये.

संध्याकाळी पाच वाजता सायरन वाजेल आणि लगेच सर्वांनी टाळ्या, थाळ्या वाजवून, घंटानाद, शंखनाद करून संकटाशी सामना करण्यात प्रत्यक्षपणे कार्यरत असणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी... असं कळकळीचं आवाहन आपल्या प्रधानमंत्र्यांनी साऱ्या देशाला केलं होतं. आणि तशीच कृतीही झाली. ह्या गोष्टीची प्रत्यक्ष अनूभूती ही अत्यंत विलक्षण, अलौकिक अशी होती. पाच वाजता सायरन वाजणार म्हणून घड्याळाकडं डोळे लावून बसलेल्या आम्हाला चार पंचावन्न-छपन्नलाच आजूबाजूनं जोरजोरात टाळ्यांचे आवाज, घंटानाद ऐकू येऊ लागले.. आम्हीही मग त्यात सामील झालो. त्याच क्षणी परकी घरे, इमारतीही आपल्या वाटू लागल्या, एकमेकांना न पाहाताही! हेच कदाचित एकतत्व असेल, डोळे घळाघळा कसे आणि का वाहू लागले ह्याचं वर्णन मात्र कदापि शक्य नाही.. त्यावेळी मनात फक्त आणि फक्त कृतज्ञता भरून राहिली होती आणि नकारात्मकता पूर्णवाहून गेली होती. याच क्षणी संकटाला आणखी जवळ यायचं आमंत्रण देणाऱ्या समाजकंटकांविषयी जी प्रचंड चीड, संताप मनात होता तोही या अश्रूंत वाहून गेला आणि त्यांना सद्बुद्धी व्हावी ही प्रार्थनाच मनात उमटली.

संकटाशी झुंजणाऱ्या आपल्या लढवैय्यांसाठी! आपल्यासाठी सकारात्मक राहाणं गरजेचं आहे
अनपेक्षित वाट्याला आलेले हे विसाव्याचे क्षण छोट्याछोट्या सुखांनी पूर्ण भरूया, एरवी वेळ मिळत नाही म्हणून मागं पडलेल्या कलागुणांना उजाळा देऊया. जिवलगांशी दोन शब्दांचा सुखसंवाद साधूया,फोनचं एक बटन दाबून आपण हे करूच शकतो. राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी आपण आता करू शकतो. घरात राहणे हीच कृती देशाला वाचवू शकेल.
सर्वे भवन्तु सुखिन:,सर्वे सन्तु निरामया: !
सर्वे भद्राणि पश्यन्तु,मा कश्चित् दुःखभाग्भवेत् ।।
*अर्थ*- सभी सुखी हो , सभी रोग मुक्त हो , सभी कल्याणकारी देखे, किसी को भी दुःख प्राप्त न हो।

जेव्हा देशाची प्रमुख व्यक्ती तुमची कळकळीने विनंती करते, घरात राहा सांगते. थोडा विचार 'करो ना'..
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस विसांवा ..12/4/2020

हम युवा है हम करे मुश्किलों से सामना मातृभूमी हित जगे है हमारी कामना .....

नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्‍मजात हुशार होते. त्‍यांच्‍या वडील वकिलांची इच्‍छा होती की त्‍यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी सुभाषबाबू इंग्‍लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्‍यांचा इंग्रजांच्‍या गुलामीला विरोध होता. त्‍यांच्‍यात राष्‍ट्रसेवेची प्रबळ इच्‍छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्‍च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्‍यागमय मार्ग होता. याचे त्‍यांच्‍या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्‍यांनी घेतला. त्‍यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्‍यू यांच्‍याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्‍यांच्‍या वडिलांचे मित्र विल्‍यम ड्युक यांनी त्‍यांचा राजीनामा आपल्‍याजवळ ठेवून त्‍यांच्‍या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्‍या या कार्याकडे गौरव म्‍हणून पाहतोय. मी त्‍याची ही अट मान्‍य करण्‍यासाठी त्‍याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्‍यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्‍यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्तरले,’’ मला लहानपणापासून दोन आण्‍यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळवीन.’’ विल्‍यम ड्युक अवाक् होऊन त्‍यांच्‍याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्‍यांच्‍या वडिलांनी पत्र लिहीले, त्‍यात ते म्‍हणाले,’’ तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्‍ट्रकार्यात यश मिळो.’’ यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहीले,’’ बाबा, मला आज स्‍वत:वर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्‍हता. "

कथासार- राष्‍ट्रसेवेची आवड असणारे प्रत्‍येकजण अनुकूल प्रतिकुल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्‍ट्रसेवा करण्‍यास उद्युक्त करते. 

मला माहीत आहे ,सुरक्षित छप्पराखाली, भरल्यापोटी हे लिहिणं खूप सोपं आहे. पण आपण प्रत्येकानं एक पाऊल पुढं टाकलं तर खरंच शक्य नाहीये हे? आणि मुळात हे पाऊल उचलणं जड जात असेल तर आपल्या दृष्टीवरची स्वार्थी झापडं काढून जरा आजूबाजूला पाहुया.... ह्या राष्ट्राला वाचविण्यासाठी खऱ्या अर्थानं मैदानात उतरलेले असंख्य जीव दिसतील, प्रत्येक जीव स्वत:चा जीव तळहातावर झेलत आपल्या जिवाला तळहातावरच्या फोडासारखं जपतोय, त्यांच्या काळजाच्या तुकड्यांना डोळे भरून पाहाणं, चिमुकल्या हातांची लाघवी गळाभेट अनुभवणं, जोडीदाराच्या हातात हात देऊन दोन क्षणांचा संवाद साधणं ह्या साध्यासाध्या गोष्टींनाही पारखे झालेत ते... त्यांच्या प्राणांतली संजीवनी हरपतेय तरीही त्यांनी पाऊल माघारी वळवलेलं नाही आणि आपण बेदरकारपणे सुखांच्या राशींत लोळत असताना त्या राशींतला एक घास काढून एका पीडिताच्या मुखी नाही भरवू शकत? लोंढेच्या लोंढे पोटाच्या खळगीसाठी वाट चालताहेत... त्यांना समजवायला आपल्याकडे शब्दही नाहीत आणि आपली तेवढी कुवतही नाही, त्यांची विचारधारा त्यांच्या परिस्थितीतून, त्यांच्या जगण्यातून आलेली आहे. तिला निष्ठूरपणे दोषी ठरवणं हेही योग्य ठरणार नाही. मात्र त्यांना मदत करणारे अनेक थांबे सरकार, सेवाभावी संस्था, पोलिसांनी उभे केले आहेत. तिथं दोन घासाची व्यवस्था व्हावी हे नाही जमू शकणार आपल्याला? नक्कीच जमेल करूया आपण चला तर मग लागा कामाला...
हम युवा है हम करे मुश्किलों से सामना
मातृभूमी हित जगे है हमारी कामना ॥धृ॥
संस्कृती पली यहाँ पुण्य भू जो प्यारी है
जननी वीरों की अनेकों की भरत भू हमारी है
ऐसा अब युवक कहाँ दिल मे ज़िसके राम ना ॥१॥
ये कदम हजारों अब रुक ना पायेंगे कभी
मंझीलों पे पहुंचकर ही विराम ले सभी
ध्येय पूर्ती पुर्व अब रुक ना पाये साधना ॥२॥
ज्ञान के प्रकाश की ले मशाल हाथ में
शील की पवित्रता है हमारे साथ में
एकता के स्वर उठे छुनेको ये आसमाँ ॥३॥
आँधीयों में स्वार्थ की त्याग दीप ना बुझे
मातृभू को प्राण दूँ याद है शपथ मुझे
मै कहाँ अकेला हूँ साथ है ये कारवा ॥४॥
हम युवा है हम करे मुश्किलों से सामना
मातृभूमी हित जगे है हमारी कामना

आपल्याच सुरक्षेसाठी दिवस रात्र उभे असलेले आपले पोलीस बांधव, तसेच काही पीडित जन त्याच्या मुखी दोन घास भरवुया? थोडा विचार 'करो ना'..
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस एकोनविस..11/4/2020

मानवाला जे जे हवं, ते ते त्यानं अगदी ब्रम्हांवर विजय प्राप्त करत मिळवत गेला. दिवस आणि रात्र घडवून आणणाऱ्या त्या चंद्र ताऱ्यांवर आणि ग्रहांवर अस्तित्व मांडू लागला. त्यातच धरतीवर वास्तव्य ठोकून बसलेल्या देशानी तर मर्यादेची परिसीमाच ओलांडलीय. एकमेकांमध्ये महासत्ता बनण्याची स्पर्धाच लागलीय. कोणी एकमेकांच्या जीवावर उठू लागलाय. कोणी एकमेकांविरुद्ध षडयंत्र रचू लागलाय. कोणी दृष्टीहीन जीवाणूंचच अस्र बनवू लागलाय. परिणामी, या प्रयोगातून महासत्ता नव्हे तर समस्त धरतीला लेकारापासून अन लेकरापासून धरणीमायेला दूर कराल. एवढंच काय तर त्यांची विकृतीच माझ्या धरणी मायला वांज करेल की काय? अशा प्रश्न चिन्हान काहूर माजलंय!

आपण घेऊन चिंता, दु:ख ठेवुनीया उशी आता जगु

हरु किंवा जिंकु पण आधी संकटांशी लढुन तर बघु.

जागे होऊया... आता तरी जागे होऊया...! कित्येक यंत्रणा आणि कित्येक जीव आपल्यासाठी जिवाची ढाल करून आपल्यासाठी लढताहेत ह्याची आपल्याला कल्पनाच नाहीये. त्या प्रत्येकासाठी एक दुवा आणि पीडितांतल्या एका मुखी घास इतकंच सुरक्षित छप्पर अनुभवत आपल्याच घरी राहून आपल्याला करायचं आहे. काय फार मोठे दिवे लावायचेत आपल्याला कि गड सर करायचाय!? ह्या प्रत्येक जिवाचं आक्रंदन का पोचत नाहीये आपल्यापर्यंत तेही आपल्या स्वत:च्या जिवाच्याच सुरक्षिततेसाठी केलेलं!? ते ऐकणं, समजून घेणं आणि कमी करणं आपली जबाबदारी नाही? कि फक्त प्रशासनावर खापर फोडत लंब्याचौड्या गप्पांच्या फुशारक्या मारणार आपण! लॉकडाऊन वाढवला म्हणून शंख करणार आणि नाही वाढवला तर आणखी वाढत्या भयाण परिस्थितीला पुन्हा प्रशासनालाच जबाबदार धरणार! त्यापेक्षा आपली स्वत:ची समज वाढवूया... नियमांचं उल्लंघन न करता मदतीची साखळी बळकट करूया! घरात बसून हे अगदीच शक्य आहे.
सारखी चिंता करण्यापेक्षा कृती करूया .
हरु किंवा जिंकु म्हणण्या आधी लढुन बघुया का?
थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस अठरावा..10/4/2020

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया! .....रोज सघ्यांकाळी मी माझ्या बाळाला घेऊन शुभकरोती म्हणते त्याचा जन्म झाल्यापासुन अगदी पाचव्या दिवसापासुन मी त्याला घेऊन शुभकरोती म्हणते. आज आठ महिन्यात मला कधीही आठवत नाही बाळाने शुभकरोती म्हणतानां मला त्रास दिला. चुळबुळ केली, रडला..कधीच नाही उलट तो तितका वेळ नेमाने शांत प्रार्थना ऐकतो..कदाचित त्याला प्रसंन्न वाटत असावं मला वाटत प्रार्थना म्हणजे स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी मिळालेली संधी. जरा वेळ शांत,स्तब्ध बसून मन एकाग्र करून नियमित म्हटली गेलेली एखादी प्रार्थना आपल्या मन आणि शरीरावरचा ताण हलका करू शकते.  प्रार्थना ही मनाची शक्ती आहे. मनावरचा ताण-तणाव हलका करून मनातले विचार सुसंगत करण्याची प्रेरणा आपल्याला प्रार्थनेतून मिळू शकते....  प्रार्थना म्हणजे जीवनाच्या सुसंस्कुत बाजूंचा जाणीवपूर्वक घेतलेला वेध आणि बोध.

मनावर सतत ताण-तणावा चे ओझे घेऊन आज आपण सगळेच जगत आहोत. त्यापासून सुटका मिळवण्याचे प्रत्येकाचे आपापले वेगळे मार्ग आहेत. मनातल्या ताणाचे योग्य नियोजन केले नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मन शरीर आणि चित्त वृत्तींचे संतुलन, निरोगीपणा  आपण गमावून बसतो. आपली विविध व्याधींशी सामना करणारी प्रतिकार क्षमता खिळखिळी होते आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध मनोशारीरिक आजारांचे मूळ मात्र मनावर असलेल्या आणि टाळू न शकलेल्या ताणात असते.  
सततच्या चिडचिड्या स्वभावामुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखावतो आणि त्या आपल्यापासून दूर निघून गेल्या हे ही आपल्याला सहन करणे शक्य होत नाही. एकूण काय आपला अभिमन्यू होतो, ताणाच्या चक्रव्यूहात परत मागे फिरण्याची वाट हरवलेला. या ताणतणावाचे नियोजन करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या मार्गाने करत असतोच.

आपल्या मनाची हाक ऐकण्यासाठी आपण स्वतःलाच दिलेला एक छोटासा अवसर. स्वतःचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न. संवेदनशील मनाची संवेदनशीलता सतत जागी असावी म्हणून मनाची केलेली जडणघडण. आपल्यातल्या बऱ्या-वाईट वृत्ती प्रवृत्तींचे संपूर्ण समर्पण करण्यासाठी मनाला मिळालेली प्रेरणा,सकारात्मक उर्जेचा मानसिक स्त्रोत म्हणजे प्रार्थना. आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांचा निचरा करण्याची खूप मोठी शक्ती प्रार्थनेत आहे. आस्तिक असण्याशी किंवा नसण्याशी तिचा काही संबंध नाही,चांगल्या विचारांवर, चांगल्या वागणुकीवर असलेली श्रद्धाच यासाठी पुरेशी आहे. विचारांमध्ये,वागणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वातच बदल घडवून आणण्याची क्षमता प्रार्थनेत असते.

मनातल्या नाविन्यपूर्ण कल्पनाची, विचारांची, निर्मितीच्या बीजांची मशागत करण्याची शक्ती प्रार्थनेत आहे. प्रार्थना व्यक्तिगत असू शकते किंवा सामुहिक, कशीही केली तरी तिच्यापासून मिळणारी उर्जा संक्रमित होतेच. मना मनांना जोडण्याची, विश्वासाने, आपुलकीने दुसऱ्याच्या भावनांशी समरस होण्याची सुरवात सामुहिक प्रार्थनेतून होते. प्रार्थना माणसाचे साध्य नाही तर त्याच्या हातात असलेले असे साधन आहे की जे समग्र मानवतेच्या कल्याणासाठी हातभार लावेल. मन आणि बुद्धीचा विवेक करण्याचे भान प्रार्थनेमुळे जागे राहते. विवेकाच्या कसोटीवर आपले विचार तपासून घेण्याची क्षमता प्रार्थनेतले शब्द, आशय,भाव वाढवतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि तिच्या मनातला कशावर तरी असलेला विश्वासही वेगळा. माझा या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर विश्वास आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टींचे कुतूहल माझ्या मनात आहे.

कुटुंब, समाज, माणसा माणसातील परस्पर संबंध, मानसिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक अशी त्यांच्यातल्या संबंधातील देवाणघेवाण, त्यातील चढ उतार, सतत बदलत असलेले दिवस, बदलत असलेली परिस्थिती, बदलत्या वेळा, यांच्यातील परस्पर अंतरक्रियांचेही मला प्रचंड कुतूहल आहे. प्रार्थना म्हणजे माझ्या मर्यादा जाणून घेऊन नम्रपणे त्यांचा केलेला स्वीकार आणि माझे जग, माझे आयुष्य सहज, सोपे करणाऱ्या व्यक्ती, वस्तू किंबहूना सर्व चराचरा विषयी बाळगलेली कृतज्ञता...! 
गुरु रवींद्रनाथ टागोरांचीच एक सुंदर रचना

विपत्तीमध्ये माझ्या मदतीला ये ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीत मी भयभीत होवू नये इतकीच माझी इच्छा.
दु:खाने व्यथित झालेल्या माझ्या मनचं 
तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही 
दु:खावर जय मिळवता यावा, इतकीच माझी इच्छा  
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझं बळ मोडून पडू नये इतकीच माझी इच्छा.
जगात माझं नुकसान झालं केवळ फसवणूकच वाट्याला आली तरी मन माझं खंबीर राहावं इतकीच माझी इच्छा.
माझं तारण तू करावंस मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही तरुन जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं इतकीच माझी इच्छा.
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात असावी इतकीच माझी इच्छा.
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझं चेहरा विसरू नये दु:खाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्या अस्तित्वाविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये इतकीच माझी इच्छा.
रोज स्वता:ला सकारात्मक्तेची शिकवण प्रार्थनेतून देवू या का? थोडा विचार 'करो ना'
अनामिका(PMJ)


थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सतरावा..9/4/2020

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य ....सकाळीच सुर कानावर पडले आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या जुन्या गावातील हनूमान मंदीर आठवले घरासमोरच मंदीर असल्याने खुप धाम धुम असायची ती अदल्यादिवशी सर्व मिळून केलेली मदिराची साफसफाई, मंदीराची रंगरंगोटी, लायटिंग,रांगोळी फुलाच्या माळा आणि मग सकाळी महावीर हनुमानाची पुजा, आरती, प्रसाद मन भरून पावत 

चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते एकूणच हा बजरंगबली जन्मल्याजन्मल्या सूर्याला फळ समजून धरायला काय धावला, द्रोणागिरी काय उचलून आणला, सीतामाईच्या शोधात एकटाच निडरपणे थेट लंकेत काय पोहोचला, लंकेत रावणासमोर शेपटीचं उंचच उंच वेटोळं करून काय बसला आणि मग त्याच शेपटीनं लंकादहन काय केलं, रामासमोर भक्तिचा दाखला देताना छाती फाडून आतल्या प्रभू रामचंद्रांचं त्यांनाच दर्शन काय घडवलं!.. एक ना दोन.. कित्येक कथा त्याच्या बल, बुद्धी, तेजाची महती सांगणाऱ्या! वानरकुळातला असल्यानं त्याचे ते गुब्बुश गाल पण किती छान दिसतात. जेव्हां कधी गदाधारी मारुतिराय आठवतात मन चैतन्यानं भरल्याशिवाय राहात नाही. असं म्हणतात कि हनुमंतराय हे रामनाम धारण करणाऱ्या शंकराचे अकरावे रुद्रावतार मानले जातात, असंही म्हणतात कि प्रभु रामचंद्रांना त्यांच्या कार्यात सहाय्यता करण्यासाठी ह्या रामदूताचा जन्म झाला... विचार केला तर अंतरी एकाकार असलेले हे सगळे भगवंतच! मात्र अजानबाहू, शून्यमंडळ भेदणारे तरीही गोडुले, ‘मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे’ अशी तुर्यावस्था साधलेले तरीही बुद्धिमतां वरिष्ठम्‌, अतुलनीय पराक्रमी, अफाट शक्ती आणि असीम भक्ति दोन्हीं साधलेले मारुतिराय जरा जास्तच जिव्हाळ्याचे! आज चैत्री पौर्णिमा.. हनुमानजयंती... संपूर्ण जगताला ग्रासलेल्या या संकटाचा विनाश करण्यासाठी मारुतिरायांना साकडं घालूया आणि त्याचसोबत ह्या बुद्धिदायकाने दिलेल्या बुद्धीचा वापर करून संकटाचं गांभीर्य ओळखून नियमबद्ध राहूया, मन:स्वास्थ्य राखण्यासाठी ह्या बजरंगबलीसारखी बलोपासनाही अंगिकारुया आणि रामभक्तिरतही होऊया... ह्या सगळ्यातून मिळणारं सामर्थ्य आपल्या धैर्याला बळकटी आणेल, कंटकांना ताळ्यावर आणायला उपयोगी ठरेल त्याचसोबत स्वत:ची जबाबदारी ओळखायला शिकवेल, निष्ठेचं महत्व जाणवून देईल आणि निश्चयाचा महामेरू पेलायची ताकद देईल.
बजरंगबलीच्या आशिर्वादाने बुद्धीचा वापर करून संकटाचं गांभीर्य ओळखून वागुया का? थोडा विचार 'करो ना'
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सोळावा..8/4/2020

कोणत्याही संकटात ‘हसणं हे सर्वात उत्तम औषध’ आहे, असं म्हणतात. जीवनात संकटांचं येणं म्हणजे"Part of life" आहे,आणि...त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,बाहेर पडणं म्हणजे"Art of life" आहे..काका कालेलकर उच्‍च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्‍यांची विचारक्षमता प्रत्‍येक विषयात खोल आणि व्‍यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्‍यांच्‍या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्‍यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्‍मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्‍यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्‍यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्‍याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्‍याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्‍हणाले,’’होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्‍हापासून मी नव्‍याने तपासणी केली आहे तेव्‍हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्‍या तपासणीविषयी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा काका म्‍हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्‍हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्‍यामुळे जास्‍त दिवस मुक्काम करतो तेच त्‍याच्‍याशी उलटपक्षी वागले असता म्‍हणजेच घरातल्‍यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्‍यास तो अशा घराचा रस्‍ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्‍य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे. ’’काकांच्‍या नव्‍या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले.

मित्रहो या गोष्टीचे तात्पर्या फार महत्वाचे आहे आजारापेक्षा जास्‍त त्‍याची चिंता तणाव वाढवते. त्‍यामुळे कोणत्‍याही शारीरिक अस्‍वस्‍थतेला सकारात्‍मक विचाराने घेण्‍याचा प्रयत्‍न करा. स्वत:ला आनंदी ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न करा कशात तरी स्वत:ला गुंतवून ठेवा मी सध्याश्या परिस्थितीत आता थोडीशी सुखावले, स्थिरावले आहे. समोर दोनच पर्याय असतात... हतबलतेच्या ताणतणावात जगत मनानं कमकुवत होणं किंवा आपल्याकडून जमतील ते प्रयत्न मन:पूर्वक करून उरलेल्या वेळेत हसत व हसवत राहाणं’... तर तुम्ही काय कराल ?
चिंता चितेसमान असते हसत जगाल की कुढत तुम्ही ठरवाल का? थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ )

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस पंधरावा..7/4/2020

तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना...काल घरातले सगळे दिवे मालवले..कोणी पणती दाराशी ठेवली कोणी मोबाईलचा टॉर्च दाखवला. तर कुणी मेणबती लावली आजूबाजूने उत्साहात आवाज आला "गो करोना गो" भारतमाता की जय!’ वगैरे घोषणा देत होती. हे सगळ पार पडल्यावर आज परत हे का? कशासाठी ? हे प्रश्न तर होतेच पण त्याचबरोबर सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो, व्हिडिओ येऊ लागले... काहींनी अर्थातच दिवेही लावले. पण काहीनी या सगळ्याचा अतिरेक केला खुप दिवे लावून फटाके फोडून, गोधळ करून आता गरज आहे स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची आतापर्यंत आपण घरात राहून ज्याप्रमाणे स्वत:ला नियत्रीत ठेवल तस या पुढेही ठेवायच आहे हेच नियत्रण आपल्याला प्रतिकूल परि‍स्थितीत आनंदी ठेवेल..

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.
तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो.

मला वाटते काल एका जाणिवेनं दीप प्रकाशित करायचा होता.. ह्यात खूप वेगळेपण सामावलेलं होतं. भोवतालची परिस्थिती बिकट आहे, सैन्यानं धडाडीनं वार करून युद्ध जिंकावं असा शत्रू नाही, त्याचा वेग, दिशा, वार कसलाच अंदाज नाही.. ह्या गोष्टी जास्त सतावणाऱ्या आहेत. अश्या परिस्थितीत आपण हातपाय गाळून बसलो तर उठून उभं राहायला उमेद आणणार कुठून!? म्हणून मनानं खंबीर राहाणं अत्यावश्यक होऊन बसलं आहे. त्यासाठीच ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ असावा का? ही कृती करायला लावण्यामागचा उद्देशही हाच असावा बहूतेक..
हातपाय गाळून बसायच की उठून उभं राहायच
प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आपणच आनंदी ठेवायच का ? थोडा विचार 'करो ना'..
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस चौदावा..6/4/2020

भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''

विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते. हेच काय ते या कथेचे तात्‍पर्य...

मित्रहो आपल्यालाही असचं काहीस करायचयं या संकटसमयी बर्याचदा आपल्याला राग येईल, संताप येईल,घरात बसुन बसुन कंटाळा येईल. सारखी चिडचिड होईल घरात बसाव लागत, नियम पाळावे लागतांय म्हणून अक्षरक्ष: कोणालातरी चार शिव्या घालाव्या वाटतील. पण मिर्तहो योग्य-अयोग्यतेच्या शंकाकुशंका ‘सांगोवांगी’वर नव्हे तर माणुसकीच्या कसोट्यांवर तपासून पाहू... अंतर स्वच्छ, निर्मळ झाल्याचं जाणवेलच... तीच भावना घेऊन एकात्मभावानं उभे राहू.. मग कोणत्याही संकटाची बिशाद नाही आपल्याला हरवण्याची..

आज नऊ वाजता घरातले लाईट बंद करून एक पणती/मेणबत्ती/दिवा उंबऱ्याशी किंवा बाल्कनीमधे लावायचा आहे. आजूबाजूचं सगळं दृष्टीआड करण्यासाठी संपूर्ण अंधार करून फक्त उजळलेल्या दिव्याच्या वातीकडे पाहू... आपल्याही अंतरात एक ज्योत उजळवू या .. तिच्या साक्षीनं आपल्यासाठी, देशासाठी जीव तोडून झटणाऱ्या आपल्या बांधवांसाठी कृतज्ञतेने प्रार्थना करूया....
एक दीप से सहस्त्र दीप जगमगा उठे ..कोटि कण्ठ एक स्वर में मातृगान गा उठे ....वंदे मातृभूमि, वंन्दे ...
विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते. हे माहीत असूनही, संयम ढळू द्यायचा का? थोडा विचार 'करो ना'....
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस तेरावा ..5/4/2020

आज एक गोष्ट वाचनात आली. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका राजाला मूल नव्हते. तो राजा म्हातारा झाला होता. त्यामुळे त्याच्या नंतर राज्याचा वारस कोण असेल याची चिंता त्याला लागली होती. राजा विचार करत होता कोण उत्तराधिकारी असेल. त्याने उत्तराधिकारी निवडण्यासाठी एक पद्धत ठरवली. राजाने घोषणा केली की, एके दिवशी संध्याकाळी एका विशिष्ट वेळी त्याला जो कोणी भेटेल त्याला आपल्या राज्याचा हिस्सा देईल. या पद्धतीने तुम्हाला जो भेटेल त्या व्यक्तीला राज्याचा हिस्सा कसा काय दिला जाऊ शकतो या घोषणेमुळे प्रधानमंत्री आणि त्याच्या दरबारातील अनेक मंत्री नाराज झाले. अशा पद्धतीने तर राज्य हे विखुरले जाईल अशी त्यांची भावना होती. राजाची घोषणा त्यांना अव्यवहारिक वाटत होती. पण, सर्वांना राजाच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी राजावर विश्वास ठेवला.

ठरलेल्या दिवशी राजाने त्याच्या महलाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जत्रा, नाच-गाण्याचे कार्यक्रम आणि भोजन, मद्याची व्यवस्था केली. मनोरंजनासाठी सर्व सोय त्या भागात केली. त्या दिवशी राजाला भेटायला जे लोकं आली होती ती जाताना त्या कार्यक्रमात गुंतली. काही लोक नाच-गाणं बघू लागले तर काही मद्य पिऊ लागले. काही लोक तर इतके हरवून गेले की राजाला भेटायचं विसरूनच गेले, पण काही युवक असे होते की त्यांनी या गोष्टींकडे पाहिलं पण नाही. ते सरळ महालाकडे निघाले. त्यातला एक तरुण हा सरळ महालाच्या दरवाजाकडे गेला तिथं द्वारपालाने त्याला रोखलं.

त्या तरुणाने द्वारपालाला धक्का देऊन तो सरळ महालात घुसला. तो राजाला योग्य त्या वेळेतच भेटण्याचं ध्येय घेऊन आला होता. महालात त्याला राजा समोरच दिसला. राजाने त्याचे स्वागत स्वत:हून केले आणि म्हणाला, माझ्या राज्यात अशीही व्यक्ती आहे जो प्रलोभनांमध्ये अडकून न पडता आपल्या ध्येयावर ठाम राहिला. राजा म्हणाला, तू माझा उत्तराधिकारी बनण्याच्या योग्यतेचा आहेस. यामुळे तुला पूर्ण राज्य मिळेल. जोपर्यंत बाकीचे लोक दरवाजापर्यंत पोहोचले तोपर्यंत राजाने दिलेली वेळ निघून गेली होती, द्वाररपालांनी त्यांना परत पाठवून दिले.
या गोष्टीतुन बोध असा - कोणत्याही कामात तोच यशस्वी होतो जो आपल्या ध्येयावर ठाम राहतो आणि वाटेत येणाऱ्या संकटांचा सामना करतो, तसेच छोट्या-मोठ्या प्रलोभनांकडे दुर्लक्ष करतो.

आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करूया.. जीवनावश्यक वस्तू कणभरही वाया न घालवता अगदी जपून वापरूया, घरात म्हणजे घरातच राहूया, एकाच्या तरी मुखी एक छोटा घास पडेल इतपत हातभार यंत्रणेला लावायचं कुटुंबातल्या प्रत्येकानं ठरवूया आणि पारही पाडूया. कुठल्यातरी माध्यमातून हे कर्तव्य बजावणं अजिबातच कठीण नाही. इच्छा असेल तर जरासं शोधलं कि मार्ग सापडतोच.. फक्त हा मार्ग घरात बसून फोन, इंटरनेट अश्या माधमांतून जाणून घेऊया आणि आपल्या आजूबाजूलाच जर कोणी असेल तर योग्य ती काळजी घेऊन थेटच मदत पोचवूया. मन:स्वास्थ्य राखूया, प्रार्थना करूया,आपल्याकडून नियम न तोडता जे करता येईल ते सगळं करूया.
संकटाचा सामना करण्यासाठी ध्येय गाठण्यासाठी
लक्ष केंद्रित करतोय का? थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस बारावा..4/4/2020

लहानपणी आई अगदी आग्रहाने श्रीरामनवमीला आम्हा सर्वानां मंदीरात घेवून जायची ते लग्न होईस्तोवर.मु

ख्या म्हणजे घरी आल्यावर रामायनावरील चर्चासत्र रंगायच ....एकदा एका विचारवंताला विचारले गेले की रामायण व महाभारत या मध्ये महत्त्वाचा फरक काय आहे. त्यांनी एका वाक्यात सांगितले की महाभारतात राज्य मिळावे म्हणून भाऊ-भाऊ भांडले तर रामायणात भाऊ-भाऊ मला राज्य नको ते तुझेच आहे, तूच राज्य कर म्हणून भांडत होते. श्रीरामांनी आपल्या प्रेमळ, आपुलकीच्या व निर्मळ स्वभावामुळे प्रजेबरोबरच आपल्या भावांचे आत्यंतिक प्रेम मिळविले होते. चारही भावांमध्ये श्रीराम मोठे होते. हे मोठेपण त्यांनी अधिकारापेक्षा ही कर्तव्य म्हणून अधिक निभावल्याचे त्यांच्या चरित्रातून लक्षात येते. त्यांनी आपल्या तीनही भावांचे नेहमी रक्षण तर केलेच पण ते आनंदी राहतील याची नेहमी काळजी घेतली. लक्ष्मण अधिक काळ श्रीरामाच्या निकट राहिला. अगदी कुमार वयापासून विश्वामित्रांच्या यज्ञ रक्षणार्थ श्रीरामाबरोबर होता. सीता-स्वयंवर, वनवास, रावणयुद्ध ते राज्याभिषेकापर्यंत लक्ष्मण सावलीसारखा रामाबरोबर राहिला. राम-रावण युद्धाच्या वेळी रावणाच्या अमोघ शक्तीने लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर तो मेला असे समजून आता आपणालाही जगण्याचा हक्क नाही असे आर्तस्वरात व्यक्त होणारे राम असोत किंवा वनवासात निघाल्यावर मनात कोणताही किंतू न ठेवता अयोध्येचे राज्य भरताला देवून माता सीतेलाही "भरत मला प्राणापेक्षा ही प्रिय असून तू ही त्याला मुलासारखा मान दे" असे सांगितले. लावणासुराच्या अत्याचाराचा शत्रुघ्नाच्या माध्यमातून निप्पात करून ते राज्य शत्रुघ्नाला दिले.

श्रीरामाच्या जीवनाचा शेवटही बंधु वियोगामुळेच झालेला दिसतो. काही कारणाने लक्ष्मणाला दिलेल्या शिक्षेचे देहत्यागात झालेले पर्यवसान आणि लक्ष्मणानंतर एक क्षणही पृथ्वीतलावर आपले अस्तित्व न ठेवणारे श्रीराम यामुळेच भक्त त्यांना देवत्वापर्यंत घेऊन जातात. बंधू प्रेमातून देवत्व प्राप्त होते याचे उत्तम उदाहरण याशिवाय दुसरे कोणते असू शकते !
आज श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर बाह्य सोपस्कार आठवले पण ती अनुभूती किती श्रीमंत होती हे आता जाणवतंय. कुठंतरी त्या छोटुकल्या मूर्तीशी बांधला गेलेला विश्वासाचा दोर पुढच्या आयुष्यात उंच उडताना आपल्याला खाली आपटू देत नसावा. ह्या मर्यादा पुरुषोत्तमानं स्वत: तर मर्यादा सोडली नाहीच आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा परीघही तो सुरक्षित राखत असावा. एकपत्नी-एकवचनी-एकबाणी सर्वथा असा तो एकतत्वच शिकवत असावा.. ते आम्हा नाठाळांच्या पचनी पडत नाही हा भाग वेगळा! शिंगं पार वर आली तसं एका क्षणी ‘राजा म्हणून तो श्रेष्ठ असेल पण नवरा म्हणून नाही’ वगैरे मुक्ताफळंही उधळली.. मात्र तो आपणा पामरांसारखा सामान्य परिमाणं घेऊन जगणारा नव्हता आणि ना सीतामाईची दृष्टी आमच्यासारखी हीनदीन होती. अवतार घेऊन काहीतरी जीवनमूल्यं प्रस्थापित करायला ही देवमंडळी मानवप्राण्यासारखं हाडामासांचं शरीर घेऊन आली आणि आपली भूमिका बजावून देवलोकी मार्गस्थ झाली. मात्र त्यांचं सांगणं समजून घ्यायलाही त्यांची कृपाच हवी.. ती लाभावी अशी प्रार्थना करूया!

मनात आलं त्याच्या एकतत्वाचा भंग केला जातोय म्हणून तर आज ही वेळ आली नसेल ना आपल्यावर? आज कायद्याच्या निर्बंधानं हे एकतत्व लादलं गेलं आहे आपल्यावर.. नाइलाजास्तव! आणि ते गरजेचं आहे ही जाणीव करून देण्याचं ‘त्यानं’च ठरवलं आहे बहुधा! आज कुणाचीच कुठंच निष्ठा नाही.. म्हणूनच कदाचित सुख-समाधान आणि सुरक्षितताही नाही! प्रत्येकच क्षेत्रात अनंत पर्याय उपलब्ध असल्यानं ‘हा नाही तर तो’ हे तत्व आचरल्यानं पायभूत असायला हवेसे घट्ट बंध बहुतांशी कुठंच नाहीत... अगदी नातेसंबंधांतही! फक्त समोरच्याकडून जास्तीत जास्त फायदा काय करून घेता येईल अशी झापडं लावल्याचीच फळं भोगतोय का आपण? अश्याप्रकारे माजलेल्या प्रचंड अनागोंदीनं आयुष्य भंजाळून जातंय आणि ते आटोक्यात आणायलाच आज ‘त्यानं’ थांबवलं आहे आपल्याला!... थोड थांबूया, विचार करूया..
प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी लीन होणारे आपण
मर्यादा भंग करतोय का? थोडा विचार 'करो ना'
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र कि जय.
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस अकरावा..3/4/2020

आज सकाळीचं आपल्या पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यावर अनेकाच्या मनात अनेक प्रश्न नक्कीच आले असतील हे का? कशासाठी? तस मिडीयीवर दिसू ही लागल पण खर सांगु मित्रहों इतकं करण्यापेक्षा थोडी श्रद्धा ठेवली आपल्या राजावर तर काय बिघडल. खरं तर ह्या गोष्टीमागचा अर्थ मलाही कळलेला नाही, 'सांगतेय म्हणून करायचं, जास्ती प्रश्न विचारायचे नाहीत’ असं कधीतरी आपल्याला सुनावलं गेलेलं वाक्य आठवलं आणि ‘करून बघायला काय जातंय, त्यांनी सांगितलं आहे तर काहीतरी उद्देश असणारच त्यात!’ मी पर्याय शोधला. थोड्या वेळानं अनेक मत-मतांतरं विश्लेषणासोबत येऊ लागली. कुणी आकड्यांचं गणित मांडलं, कुणी तापमानाचं मांडलं, कुणी त्याकालावधीत सॅटलाईटचा उपयोग करून त्यावेळी काहीतरी जाणून घ्यायला मदत होईल, हा धोरणीपणा त्यामागं असल्याचं मत मांडलं, कुणी ह्या प्रस्तावाला लोकांचा किती पाठिंबा मिळतो त्यावरून पुढील धोरण सरकारला आखता येईल असा आडाखा बांधला, कुणी उर्जातत्वाशी ह्याचा संबंध जोडला. खोटं कशाला बोलू, मला तर मोदीजी शिवरायांच्या रुपात दिसू लागले आणि वाटलं, ह्या अंधाराचा फायदा घेऊन देशद्रोह्यांचा कडेलोट करून त्यांनी गनिमी कावा साधावा. झालेल्या अनेक तर्कवितर्कांपैकी कुठल्याच क्षेत्रातला काहीच अभ्यास नसल्यानं मी त्याचं खरं-खोटं विश्लेषण करू शकत नाही.

एक क्षणभर मात्र बाकी सगळा विचार बाजूला ठेवून डोळे मिटून मी दिव्याची प्रज्वलित ज्योत डोळ्यांसमोर आणली आणि मी माझ्या बाळाला घेवून ‘शुभं करोती कल्याणम्‌ आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते’ म्हणू लागली. अाणि एकदम लहानपण आठवल तिन्हीसांजेच्या वेळी हातपाय स्वच्छ धुवून देवाजवळ लावल्या गेलेल्या दिव्याला नमस्कार करून बेंबीच्या देठापासून ओरडत हा श्लोक म्हणणारी मी, माझे भाऊ, कधी वाड्यातल्या सगळ्या मुलाींनी मिळून अंगणात एकत्रित म्हटलेली गाणी असं सगळं डोळ्यांपुढं आलं. आज हे आयुष्यातून हरवत चाललं आहे. अचानक त्या क्षणांच्या अनुभूतीसाठी मन आसुसून गेलं. त्या पाठोपाठ आपण किंवा घरातलं कुणी आजारी असताना हातात चिमूटभर अंगारा घेऊन रामरक्षा, भीमरूपी म्हणून झाल्यावर तो अंगारा स्वत: आपल्या कपाळी लावतानां आई-बाबा-आजी-आजोबा-आत्या-मावशी-काका-मामा सगळे दिसले आणि आपली लेकरं लहान असताना एखाद्या हळव्या क्षणी आपणही त्याच भक्तिभावानं हे सगळं केल्याचं अचानक स्मरलं. ह्या प्रत्येकवेळी डॉक्टरांकडून औषध आणण्यात कधीच हरकत नसायची. ते औषध शरीरावर परिणामकारक उपचार करायचंच .मात्र त्यासोबत मनाची बळकटी राखण्याचे हे उपायही हमखास केले जायचे... त्यातही हयगय नसायची. आजही आपली लेकरं अचानक आजारी पडली तर मुलांपेक्षा आपलं स्वत:चं मनोबल राखण्यासाठी हा उपाय हटकून आठवल्याशिवाय आणि मग आपण तो केल्याशिवाय राहात नाहीच. अश्या नाजूक क्षणांमधेच ह्या गोष्टींची आठवण तीव्रतेने होते, महत्व जास्ती पटतं.

विश्वासानं आपण ही गोष्ट करूया. प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ, तर्क कळलाच पाहिजे असं कुठं आहे... एखादी गोष्ट वडीलधारं माणुस सांगतंय म्हणून श्रद्धाभावानं करून बघूया! बाकी काहीच नाही तरी स्वत:च्या मनाची ताकद वाढवण्यासाठी... संपूर्ण देशातल्या करोडो लोकांनी एकाच वेळी एकच कृती केल्यावरचा एकात्मभाव अनुभवण्यासाठी! भाषणात त्यांनी सांगितललेलं -
उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्य लोकेषु न किञ्चिदपि दुर्लभम् ॥.... हे सुभाषित प्रमाण मानून आपल्यातील उत्साह जिवंत ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी हे करून बघूया... ‘ही लढाई जिंकायचीच आहे’ हा दृढसंकल्प मनात धरून! आपल्या मनातील उत्साह टिकून राहिला तर आपल्याला ही लढाई जिंकणं अशक्य नाही ही धारणा बळकट होण्याची आज सर्वसामान्य व्यक्तीला खूप गरज आहे. त्यासाठी करूया... त्यामागचा उद्देश, कारण, धोरण कळलं किंवा नाही कळलं तरी, ही गोष्ट तर्कसंगत वाटली किंवा नाही वाटली तरीही... संपूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं करूया...
दृढसंकल्प मनात आहे. लढाई जिंकायचीच आहे.
त्यासाठी उत्साह टिकून राहावा म्हणून मी काही करतोय का ? थोडा विचार 'करो ना'....
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस दहावा..2/4/2020

कदा साधणेविण ना शक्ती मोठी उभी साधना ठाकण्या सज्ज कोटी..

कृतीची मतीची तशी भावनांची करा साधना तिच किल्ली यशाची...

कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही त्यासाठी त्या गोष्टीची साधना करावी लागते. सतत आपल्या कृतीत. मनात त्याच त्या गोष्टीचा विचार असावा लागतो. विचारांना कृतीची जोड जर मिळाली तर आणि तर तरच कार्य सिध्धी होते. तेव्हाच यश मिळते.

लहानपणी बाबा नेहमी आम्हाला सांगायचे यशस्वी व्हायच असेल तर बोलू नका. विचार,आचरण, कृती तीन सुत्र जपा प्रगती कराल अशी जी कोणी रोखु शकणार नाही असो...
एका क्षणी आजच्या वास्तवातल्या घनगंभीर भयरंगाचा एक तरंग उमटला आणि मन अडखळलं. हा तरंग स्वाभाविक, साहजिक होता. आपण थांब म्हणून त्याची वलयं थांबणार नाहीत. त्यासाठी विशेष प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गरज आहे. ह्याबाबतीत अग्रेसर असणारी मंडळी आठवली आणि आपणही आपल्या कुवतीनुसार खारीचा वाटा उचलूयाच ही उमेद नव्यानं जागली. देशातलं अग्रेसर नेतृत्व असेल, रतन टाटांसारखं आभाळाएवढं दातृत्व असेल, रुग्णांनाच देव मानून घरदार विसरून त्यांच्या सेवेत रंगलेले वैद्यकीय क्षेत्रातील एकेकाचं अफाट कर्तृत्व असेल, इतर अनेक आधारभूत यंत्रणांमधल्या एकेका जिवाची प्रयत्नांची शिकस्त असेल... ह्या सगळ्या गोष्टींनी बेरंगाचा धोका स्वत: पत्करत आपल्याला सौभाग्यरंगात रंगतं ठेवलं आहे. आता त्यांच्या उत्तुंग पराक्रमाचा बेरंग होऊ न देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची...
सगळे सुखी सुरक्षित राहू या काळजी घेवू या...

विचार,आचरण, कृती तीन सुत्र जपूया प्रगती करुया
थोडा विचार 'करो ना'
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस नववा..1/4/2020

माझ्या लहान भाऊ रोज एक नविन पेन्सिल स्केच तयार करतोय...ते पाहात होते अजानक जाणवल ‘पांढरा रंग योग्य ठिकाणी वापरता येणं हेच कसब असतं शेडिंगमधे... पांढरी पेन्सिल नसते, त्यामुळे खोडरबराचा वापर करावा लागतो’, तो मागे एकदा सहज बोलून गेला होता आणि माझ्या मनात मात्र ते वाक्य कायमचं रुतून बसलं होतं.... कसल्यातरी सखोल अर्थाचं मुळ असल्यासारखं! आज मन खूप हेलकावे खात होतं.

आपण वास्तव टाळतोय का? स्वप्नाळू डोळ्यांनी वावरत पीडितांची उपेक्षा करतोय का? पण मी कुढत बसून परिस्थिती सुधारणार आहे का? त्यातून मला आणि माझ्या आजूबाजूच्यांना त्रास होण्याशिवाय काय निष्पन्न होणार आहे? अश्या अनुत्तरीत प्रश्नांची मालिका सुरूच होती आजूबाजूच्या वार्तांनी मन:स्वास्थ्य डळमळीत होत होतं आणि त्याचवेळी जर्मनीचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांच्या आत्महत्येचं वृत्त प्रचंड अस्वस्थ करणारं होतं... आणि त्याचं कारण त्याहूनही जास्त! सर्व जगभर ज्या सैतानानं धुमाकूळ घातला आहे त्या कोरोनासुरापायी देशाची अर्थव्यवस्था बिघडत चालल्याचा मनावर आलेला प्रचंड ताण असह्य होऊन ही काळजाला घरं पाडणारी कृती त्यांच्या हातून घडली. स्वदेशाच्या खालावत चाललेल्या स्थितीनं बेचैन होणं हे एकप्रकारे देशप्रेमच! परंतू त्याला तोंड देण्याचा जो पर्याय त्यांनी निवडला ते ऐकून मन सैरभैर झालं एवढं मात्र खरं!... आणि मग मला आठवल.. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मैने आपको सिर्फ बाहर जाने से मना किया है... पर अंदर झांकने का मौका दिया है!’ संकट तेच आहे.. प्रश्नांची तीव्रता तितकीच आहे.. पण बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आयुष्य गमावण्यापेक्षा ते हाती लागू शकतं इतका मोठा फरक जाणावू लागला. ढासळलेलं मनोबल पुन्हा गोळा होऊ लागलं.

अनपेक्षित लाभलेली स्वस्थता प्रत्येकालाच स्वत:चा शोध घ्यायला भाग पाडतेय एवढं मात्र खरं! करू म्हणून बाजूला ठेवलेल्या, राहात गेलेल्या गोष्टींची आठवण प्रत्येकाला होऊ लागलीये. कुणी चित्र काढतय, कुणी लिखाण करतयं तर कुणी पुस्तके वाचतयं.. थोडक्यात प्रत्येकातल्या विविध कला बाहेर येऊ लागल्यात आणि हे नक्कीच सुखावह आहे. या क्षणी आयुष्यातले प्रश्न संपलेत असं नाही... ते असतात, राहाणारच! मात्र आज त्यातल्याच काही प्रश्नांना थोडं थांब म्हणायची संधी मिळाली आहे आणि काही प्रश्नांची धार बोथट करण्यासाठी जो-तो आपापले पर्याय शोधतो आहे.

हे सगळे पर्याय मला माझ्या भावाच्या वाक्यातलं ‘खोडरबर’ वाटले... मनावरची नकारात्मकता पुसुन आत्ता परिस्थिती काळीज भिरभिरवून टाकणारी आहे, अस्वस्थतेची पेन्सिल होऊन मनाच्या कागदावर वेदनांचे रंग गिरवत राहाणारी आहे... ही गिरगिट झाकून टाकणारा, डोळ्याला सुखावणारा रंग निर्माण करणारी दुसरी कोणतीच पेन्सिल आत्ता उपलब्धच नाहीये. अश्यावेळी ह्या नको असलेल्या अस्वस्थ रंगांचं गडदपण कमी करणारं ‘खोडरबर’ शोधून आपल्याला बिघडतं चित्र आणि त्यातल्या रंगसंगतीतलं संतुलन सांभाळायचं आहे. हे खोडरबर शोधायला बाहेरच्या जगात जाता येणार नाही ही मोठी खीळ आहे. मग हातात उरतं ते फक्त अंतरंग! तिथं डोकावणं भाग पडणं हे आत्ताच्या परिस्थितीचं फलीत आणि तीच नियतीची योजना असावी बहुधा!
चिर विजय की कामना है, राष्ट्र ही आराधना है।
दूर कितना ध्येय अपना, तनिक चिन्ता हम न करते ।
बाहर जाने से मना किया है...
पर अंदर झांकने का मौका दिया है!’
थोड विचार 'करो ना'
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस आठवा ..31/3/2020

बड़े दौर गुजरे हैं जिंदगी के,ह दौर भी गुजर जायेगा..

थाम लो अपने पांव को घरों में.. ये मंज़र भी थम जाएगा...बहुतांशी लोकांना देशावर आलेल्या संकटाचं गांभीर्य कळू लागलंय.. तुलनेमधे वाढत्या प्रमाणावर आपण शहाण्यासारखे वागतोय.. अनेक विदेशांतील हृदयद्रावक कहाण्या ऐकून कदाचित त्यातून काही बोधही घेतोय... त्यामुळं काही कालावधीनं का होईना संकटावर परतून वार करण्याची शक्यता निर्माण होऊ पाहातेय.. आणि आपण असेच संवेदनशीलतेनं वागत राहिलो तर त्यानंतरच्या सुखसमृद्धीच्या आगमनाचा संकेत तर ह्या काऊंच्या गलक्याने दिला नसेल! असेल.. कदाचित तसंच असेल! आता ते सत्यात उतरवण्यासाठी आपण परिस्थितीचं गांभीर्य आणखी आणखी समजून घेऊया, नियमबद्ध राहाण्याचं महत्व ओळखूया, आपल्या पिलांना घरट्यात एकाकी सोडून आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या बांधवांची कदर करूया आणि लवकरात लवकर जिंकूया... 

आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या बांधवांची कदर करूया थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सातवा ..30/3/2020

आज एक कथा आठवली नेहमी तुम्ही-आम्ही एेकलेली आटपाट नगर होतं. तिथला राजा मोठा शिवभक्त होता म्हणून त्याच्या मनात आलं कि महादेवाच्या मंदिराचा गाभारा दुधानं भरावा. त्यानं दवंडी पिटली कि, गावातल्या सर्वांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवळाच्या देवळात अभिषेकाला यावं. सर्वांना धाक पडला, राजाज्ञेनं घाबरून कुणीही घरात थेंबभरही दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुला-बाळांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेऊन गाभाऱ्यात वाहिलं. मात्र गाभारा भरला नाही. राजा खट्टू होऊन परतला. दुपारी मात्र अजब गोष्ट घडली. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं, मुला-बाळांना खाऊ घातलं, लेकी-सुनांना न्हाऊ-माखू घातलं, गाई-वासरांना चारा घातला. थोडक्यात घरातल्या सगळ्यांचा आत्मा थंड केला आणि मग आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंधफूल, तांदळाचे चार दाणे, बेलाचं पान आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली. तिनं मनोभावे महादेवाची पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं आणि प्रार्थना केली, ‘हे महादेवा, नंदिकेश्वरा! राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही, तो माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी भक्तिभावानं अर्पण करतेय त्याचा स्वीकार कर.’ नंतर तिनं सोबतचं खुलभर दूध शंकराला वाहिलं आणि माघारी आली. इकडं चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर देवळाचा गाभारा भरून गेला. गुरवानं हे पाहाताच राजाला कळवलं, परंतू हे कसं घडलं ह्याचा काही थांग लागला नाही, दोन सोमवार असंच घडलं.

शेवटी तिसऱ्या सोमवारी राज स्वत: देवळाबाहेर थांबला. दुपारी म्हातरीनं दूध वाहिल्यावर गाभारा भरलेला पाहाताच त्यानं तिला अडवलं आणि हे घडण्याचं कारण विचारलं. म्हातारी घाबरल्यावर त्यानं तिला अभयवचन दिलं. मग तिनं सांगितलं, ‘हे नरेशा, तुझ्या आज्ञेनं काय घडलं!?.. तर वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांची हाय माथी आली. हे देवाला कसं आवडेल? म्हणून त्याचा गाभारा भरला नाही.’ मग राजानं ह्यावरचा उपाय विचारला. ती म्हणाली, ‘मुला-वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंदी, समाधानी राहावं म्हणजे देव संतुष्ट होईल. त्याचा गाभारा भरेल.’ राजानं तिच्या सांगण्यानुसार पुन्हा दवंडी दिली. गावातल्या सर्वांनी मुला-बाळांना, गाई-वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. राजानं स्वत: महादेवाची पूजा केली आणि हात जोडून डोळे मिटून मनोभावे प्रार्थना केली. नंतर डोळे उघडून पाहातात तो देवाचा गाभारा काठोकाठ भरून गेला होता. राजाला खूप आनंद झाला. त्यानं म्हातारीला इनाम दिलं आणि लेकी-सुनांसोबत ती आणखी समाधानात नांदू लागली. तसं तुम्ही-आम्ही नांदू. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

आज अचानक ही कहाणी आठवली. आपण सगळ्यांनीच ती कधी ना कधी वाचलेली आहेच. पण आज त्यातून वेगळं काहीतरी सापडलं. वाटलं, ह्या परिस्थितीत घाबरून न जाता आपलं मन:स्वस्थ्य टिकवून ठेवणं, घरात सुख-शांती-समाधान नांदतं ठेवणं आणि त्याचसोबत आपल्या कुवतीनुसार जमेल तेवढं गरजवंतातच देव पाहून त्याला भक्तिभावानं अर्पण करणं हा आपला स्वधर्म आपण पाळूया. अश्या आचार-विचारांची साखळी संपूर्ण व्यवस्था सुस्थितीत ठेवायला नक्कीच मदत करेल. आपण कोणत्याही परिस्थितीत आपली उमेद हरवून बसता कामा नये. नाहीतर झुंझणाऱ्यांच्या पायांत बळ कसं आणि कुठून यायचं. आधी निष्ठेनं स्वधर्माचं आचरण करूया म्हणजे आपली मनोदेवता प्रसन्न राहील, मनोबल, उमेद टिकून राहील आणि मग आपण आपल्याकडून केलेला खुलभर दुधाचा अभिषेक, मूठभर मदत फार मोठी भूमिका बजावेल. शिवाय क्षणभर डोळे मिटून, ‘देवा, प्रत्येकाच्या मुखी अन्नाचा कण पडू दे’ अशी प्रार्थना तर दिवसातून कितीही वेळा आपण करू शकतोच कि! आपली खरी खंत हीच आहे कि आपण स्वत: काही करू शकत नाही, आपल्या हातात काही नाही. मग ज्याच्या हाती ' ते आहे त्यालाच तर विनवायला हवं आपण! तेवढं करूया... करूयाच!
क्षणभर डोळे मिटून, ‘देवा, प्रत्येकाच्या मुखी अन्नाचा कण पडू दे’ अशी प्रार्थना करूया
थोडा विचार 'करो ना'..
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सहावा ..29/3/2020

सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता नियम धुडकावून लावत बेदरकारपणे काहीजण मोकाट वावरत आहेत.. स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. ते आता थांबायला हवं... नाहीतर विनाश अटळ आहे. मित्रहो, थोडं थांबूया... उंबरठ्याच्या आत शांतपणे बसूया, बालपणीच्या सुरम्य काळात मनानं मनसोक्त बागडून सुख लुटून आणूया, आपल्या मुलांना आपल्या काळचं फक्त तोंडी वर्णन सांगायचो ते दूरदर्शनच्या माध्यमातून का होईना पुन्हा अनुभवूया.. त्यातल्या निरागसतेची मुलांनाही ओळख करून देऊया... गेलाबाजार आपण तरी स्वस्थ चित्त होऊया. ही मातृभूमी दुसरं काय मागतेय आपल्याकडे!?... आपण सुखानं, स्वस्थतेत चार भिंतीत उंबरठ्याच्या आत काही दिवस घालवणंच ना?.. तेवढं करूया! घरात जे काही असेल त्यात भागवूया.. बाहेर पडणं पूर्ण टाळूया. उद्या मोकळ्या आकाशात स्वच्छंद विहरायचं असेल तर आज हे करायलाच हवं... परिस्थिती भयानकतेच्या दिशेनं वळू लागलीये तिला परत खेचून सुरक्षित क्षेत्रात त्वरेनं आणूया... आहे तिथंच थोडं थांबूया! मोठी झेप घेण्यासाठी आधी दोन पावलं मागं येत स्थिर व्हवं लागतं तसे हे क्षण समजूया. काहीच उरलं नाही तर आपल्याला करायलाही काहीच उरणार नाही.. तेव्हां वेळीच स्वत:ला आवर घालूया! थोडं थांबूया... आनंदाच्या जुन्या थांब्यांवर क्षणभर विसावूया... ताजेतवाने होऊया... चैतन्यमय होऊया... त्यातून सकारात्मकता कमावूया... 

मिळालेले क्षण असे सार्थकी लावूया आणि आपल्यासाठी झिजणाऱ्या जिवांना आणि राष्ट्राला वाचवूया?
थोडा विचार 'करो ना'...
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस पाचवा..28/3/2020

आज सहज सकाळी रांगोळी काढतांना मनात आलं प्रसंन्न पहाट, सुंदर निसर्ग, मोकळा गार वारा त्यात अंगणात पडलेला सडा आणि त्याचा सुगंध त्यात काढत असलेली रांगोळी शंख, गोपद्म, कमळ, ओम,स्वस्तिक, समई ईतरही अनेक निसर्गानं भरभरून जे दान आपल्याला दिलं आहे त्याची ही प्रतीकं रेखून आपण त्याप्रती अपार कृतज्ञता व्यक्त करणं हा त्यामागचा खरा हेतू अक्षरश: मोहित करणारा आहे. सध्या उपलब्ध पर्यायांमधे बहुतांशी गोष्टींचं सवडीशास्त्र तर झालंच आहे शिवाय ह्या गोष्टींविषयी फार विचार करायला, त्याचा अर्थ समजून घ्यायलाही कुणाला वेळ नाही. आज मात्र खरंतर आपत्तीमुळं हाती आपसूक आलेल्या भरपूर वेळामुळं मन केवढा मोठा फेरफटका मारून आलं, फ्लॅटसमोरच्या छोट्याश्या जागेत छोटंसं चैत्रांगण काढताना बालपणाच्या त्या सुंदर आठवणींमधे मनसोक्त बागडलं, सैरावैरा धावलं... आणि तिथून परतताना एका क्षणी मात्र ते अडखळलं. वाटलं...

आज आयुष्यातून हा भावच तर हरवून गेलेला नाही!? त्याचीच फळं तर मानवप्राणी भोगत नाहीये ना!? व्यवहारी जगात काटेकोरपणे पै-पैचा हिशोब ठेवणारे आपण निसर्गानं फुकट प्रदान केलेली अमाप, अनमोल संपत्ती ना राखतो ना त्याविषयी साधा कृतज्ञभाव जपतो. मग ती संपत्ती लाभावी तरी कशी? आजच्या कठीणसमयी हा विचार पाठ सोडता सोडेना! तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे देव भावाचा भुकेला
दास सेवकांचा झाला।... अश्या भावाच्या भुकेल्या देवाला... निसर्गदेवतेला, आपण ज्यातून निर्मिलेले आहोत त्या पंचतत्वांच्या देवतांना आपण भुकेलेच तर ठेवत नाहीये ना? मग निसर्गाचा प्रकोप टळावा तरी कसा? नुकताच कोरड्या दुष्काळापाठोपाठ ओला दुष्काळही आपण आनुभवला... त्यातून अजून पुरेसे सावरतोय, न सावरतोय तोवर ही आपत्ती! ह्या आपत्तीची बीजं थोडी वेगळी आहेत... पण देश-विदेशांच्या सीमा पुसून टाकल्या तर हीसुद्धा मानवनिर्मित, निसर्गावर कुरघोडी करू पाहाणाऱ्या मानवाच्या मस्तवाल प्रवृत्तीमुळंच ओढवलेली आपत्ती आहे हे निर्विवाद!

बरं... आपत्ती ओढवली आहे, त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी काही बंधनं पाळणं आज अत्यावश्यक होऊन बसलं आहे. पण अंतरीचा हरवलेला भाव इथंही आपली पाठ सोडत नाही आणि त्याची जुळी भावंडं अहंकार व बेफिकिरीही मागोमाग धावत येत असल्याने आपण आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतो आहोत.. पर्यायानं देशाला अस्मानी संकटात ढकलतो आहोत. देशात जिथं-जिथं आवश्यक ते निर्बंध न पाळता मस्तवाल मनुष्यप्राणी मोकाट सुटला आहे तिथं ह्या आपत्तीनं गंभीर स्वरुप धारण केल्याच्या वार्ता आहेत. कधी जागे होणार आपण? कधी आपल्या कोषातून बाहेर पडणार? कधी आत्मकेंद्रितपण सोडणार? काळजाची हाक ऐकण्याएवढे संवेदनशील कधी होणार? आपली जबाबदारी कधी ओळखणार? कि कसलाच धरबंध न राखता प्रलयाचा प्रवाह बळकट करत राहाणार? ह्यानं काही साधणं तर दूरच.. आहे ते उरलंसुरलंही गमावून बसू आपण! स्मरण ठेवूया कि, आपण कधीच स्वयंभू नसतो, दृश्य स्वरूपातले आपले शिल्पकार आपल्या डोळ्याला दिसत असतात, मात्र अदृश्य स्वरूपातही अनेकजण आपलं आयुष्य सावरत असतात. जाणवून घेणाऱ्याला हे जाणवल्याशिवाय राहात नाही. आज अजून आपल्या उंबऱ्याशी ही आपत्ती गंभीर स्वरूपात पोचलेली नाही त्याचं कारण आपल्याला अश्याच अनेक अदृश्य हातांनी अलगद उचलून धरलं आहे.. त्या आपत्तीचा हात आपल्यापर्यंत पोचू नये म्हणून! ह्यासाठी आपण त्याचं कृतज्ञ राहावं तेवढं थोडं आहे. ही कृतज्ञताही नाहीच जमली तर किमान तटस्थ, शांत न राहून, मोकाट फिरून त्यांचा भार तरी वाढवायला नको. ह्या सर्व यंत्रणांनी, त्यातल्या प्रत्येक जिवानं आपलं आयुष्य पणाला लावून आपल्याला अलगद उंच उचलून धरलं आहे.. पण आपणच तिथून खालच्या संकटात उडी घ्यायला निघालो तर आपल्याला कोण आणि कसं वाचवू शकणार!? अश्या वर्तनानं आपण तर खाईत लोटले जाऊच.. सोबत आपल्या भोवतालचे चारजण घेऊन जाऊ आणि आपल्याला पेलून धरणाऱ्यांचीही फळी कमकुवत करून सगळाच डोलारा ढासळवून टाकू! गांभिर्यानं विचार करायची वेळ आली आहे... तो प्रत्येकाकडूनच घडावा आणि अंमलातही आणला जावा!
आपत्तीनं गंभीर स्वरुप धारण केल्याच्या वार्ता आहेत. कधी जागे होणार आपण? थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस चौथा..27/3/2020

लॉकडाउन च्या काही दिवस आधी मी एक चित्र प्रदर्शनी पहिली. त्यात प्रत्येक चित्राला एक शिर्षक दिले होते एका माणसाचे चित्र होते ते त्यात त्याचे अंग पुर्ण घट्ट वस्रांनी झाकलेले होते डोक्यावर लांबसडक केस आणि त्याच्या पायाला पंख लावलेले होते. त्याला पकडायचे असेल तर त्याचे केस पकडले पाहीजेत अस होत नाहीतर तो पायाला लावलेल्या पंखानी केव्हा उडून जाईल हे सागता येत नव्हत या चित्रातच शिर्षक होत संधी!

अचानक आपल्या पुढे आलेल्या संधीला आपण झटकन पकडू शकलो नाही तर ती पुन्हा कधीच आपल्या वाटेला येत नाही हा चित्रबोध त्याचक्षणी माझ्या मनात ठसला. आपल्या जिवन प्रवासात मोलाचे दगड येतात. आपण किती चाललो हे ते सांगतात. पण ते आपल्या मुक्कामापर्यत येत नाहीत त्यासाठी आपल्यालाच चालावं लागतं. संधी म्हणजे निराश माणसाला भेटलेली हिंमत होय...संधी नवा रस्ता दाखवते. नवी दिशा देते योग्य संधीची निवड करून आपल्या जिवनाचा विकास करण्यातच खरा पुरूषार्थ लपलेला आहे...

आज आपल्यावर जे जागतीक संकट आलयं आहे ते आपण बदलू शकणार नाहीच आहे, पण जगन्नियंत्यानं आत्ता आपल्याला त्यातुन तारण्यासाठी एक संधी दिली आहे. त्यात आपल्याला फक्त शांत, स्वस्थ राहाण्याची जबाबदारी दिली आहे आणि ती ‘तैसीच’ आपण पार पाडली तर संकट निवारणाऱ्यांच्या प्रयत्नांना अर्थ आणि धार प्राप्त होईल. तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त ‘तैसेची’ न राहाता ‘चित्ती समाधानही असू दिले’ तर अगदी दुधात साखरच! आजच्या सुखाच्या फक्त दोन क्षणांनी ह्याची जाणीव मला करून दिली. ही सकारात्मकता आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्मिली गेली आणि त्याच सकारात्मकतेनं मिळालेल्या चार क्षणांत सौंदर्य शोधत आपण शांत, स्वस्थ राहिलो, आपल्या मनातलं नाठाळपण निपटत राहिलो तर त्या नाठाळ संकटाची काय बिशाद की ते आपल्या उंबऱ्यात येईल!? उलट आपल्या सकारात्मक प्रयत्नांचे प्रचंड ऊर्जास्त्रोत आपल्या लढवैय्यांचे बाहू बळकट करतील आणि अरिष्टाला लवकरात लवकर नामशेष करतील.
अाणि संधीच सोनं होईल. आणि आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू .....
समाधानी राहुन संधीच सोन करूया का?
थोड विचार 'करो ना'
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस तीसरा..26/3/2020

गुढी नभात उंचवू, स्वराष्ट्र शक्ती वाढवू ।

भारती मनामनात राष्ट्रतेज जागवू ।।हिंदूनुतनवर्षाभिनंदन !

चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपळ सकाळी अभ्यंगस्नान करतो व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करतो.
गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालतो. तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करतो. तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधतो व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करतो. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. 

पण मित्रहो दुर्दवाने आजचा गुढीपाडवा खुप वेगळा आहे. आपल्यासाठीच नाही तर संपुर्ण जगासाठी ही परिक्षेची घडी आहे .आज जणू प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनी आपली कठोर परीक्षा आरंभली आहे. एक पताका आपणा सर्वांच्या हाती सुपूर्द केली आहे आणि एकवीस दिवस ती डोळ्यांत तेल घालून राखायची आहे. बळकट मनोबलानं तिला पेलायचं काम आपणा सर्वांना मिळून करायचं आहे. एकाचा जरी तोल ढळला तरी सगळेच ढासळतील अशी अवस्था आहे. एकवीस दिवस हे कर्तव्य निष्ठेनं निभावलं तर मात्र ही पताका विजयपताका होऊन जाईल आणि आपण सगळे मिळून हे नक्कीच करू शकतो

ज्या दिवशी आपण हे करू त्यादिवशी जिंकायच्या दृढ निश्चयाच्या टणकदार स्तंभावर आपल्या करोंडोंच्या प्रार्थनेच्या सुमधूर रंगीबेरंगी साखऱ्या होऊन करोडो साखरमाळा त्या गुढीशी रुळलेल्या असतील, आपल्या करोडोंच्या मनातल्या ह्या संकटजन्य ताणतणावांचा निचरा होऊन त्यातूनच शुद्धीकरणप्रिय कडुनिंबाच्या डहाळ्या उगवतील, आपल्या करोडोंच्या मनातल्या कृतज्ञतेच्या सुवासिक सुमनमाळा होऊन गुढीची शोभा वाढवतील, या कठीण परीक्षेच्या काळात नियमांत राहूनही आपण एखाद्या गरजूसाठी केलेली छोटीशी मदत सद्‌सद्‌विवेकाचं अन्‌ दातृत्वाचं प्रतीक होऊन गडूचं रूप घेईल, आपणा करोडोंच्या एकात्मतेचं, एकजुटीचं सुगंधी चंदन, स्वत:च्या जिवाची बाजी लावून आपणा करोडोंसाठी अहोरात्र झटणाऱ्या जिवांच्या सेवाभावाच्या मांगल्यात रंगलेलं हळदी-कुंकू आणि आपल्या करोडोंच्या निग्रह, निर्धाराचे झुळझुळीत महावस्त्र त्या गुढीची शान ठरेल. अश्या अभूतपूर्व गुढीचे पाईक आणि तिच्या पूजनाचे साक्षीदार आपल्याला व्हायचंय ही खूणगाठ मनाशी बांधूया... डोळ्यांत मावणार नाही इतक्या उंचीवर ह्या गुढीची पताका नेऊया... सहजा सहजी कुणी धक्का लावू शकणार नाही इतकी घट्टपणे ती रोवूया... आणि... जिंकूया...
हो आपण नक्कीच जिंकूया....
एकविस दिवस कर्तव्य पालन करून
विजयपताका घट्टपणे रोवूयात का?
थोडा विचार 'करो ना'
अनामिका (PMJ)

थोडा विचार करो ना' लॉकडाउन दिवस दुसरा..25/3/2020

देश-धरमपर मिटनेवाला शेर शिवाका छावा था ।महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था ॥धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज तिथीनुसार बलिदानदिन ! विनम्र अभिवादन !

१. जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा
२. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा
३. आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा , त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला
४. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा
५. उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
६. इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा
७. धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा
८. बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा करणारा
९. शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा
१०. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
११. देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
१२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा
१३. सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
१४. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
१५. स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा
१६. 'राष्ट्र’ जिवंत ठेवण्यासाठी साध्या कल्पनेनेही थरकाप उडेल असा अमानुष छळ... ह्या सच्च्या योद्ध्याने तोंडातून ब्रसुद्धा न काढता हसत हसत झेलला.
कठीण परीक्षेच्या क्षणांमधे आधार शोधत असताना अशी आदर्श व्यक्तीमत्वेच आपल्याला योग्य वाटा दाखवत असतात. अश्या अनेक वीरांच्या भूमीत आपण जन्म घेतला ह्याचं समाधान मानण्याचा आजचा दिवस!

आज आपल्यावरचा प्रसंग ह्यापेक्षा कितीतरी सोपा आहे. परीक्षा द्यायला लावणारा आहे. सुखसोयींनी भरलेल्या घरात आपल्याला फक्त शांत बसायचं आहे. मृत्यूला हसत हसत आलिंगण देणारे थोर क्रांतिकारक आपण आठवू या .. स्वातंत्रवीर सावरकरांनी राष्ट्रासाठी अकरा वर्षे अंदमानाच्या काळकोठडीत शत्रूचा छळ सोसत कशी काढली असतील असा नुसता विचार जरी मनात आणला तरी घरातून बाहेर पडणारं आपलं पाऊल नक्कीच थबकेल. आपल्या घराच्या उंबरठ्यालाच आपली मर्यादा मानून ती न ओलांडण्याचं व्रत घेऊन आपण ह्या संकटाशी चाललेला मुकाबला यशस्वी करूया. शासनयंत्रणेनं वेळेत पावलं उचलून युद्धपातळीवर काम सुरू केलं आहेच... आपण नियमभंग करून त्यांची ताकद व वेळ आपल्यावरच्या कार्यवाहीत खर्च होणार नाही इतकंच सांभाळूया!
त्यांच्यावरचा ताण वाढवायचं बेजबाबदार कृत्य नको. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड साठा नको.
नियमांचे भान राखूया! सुचनांचे पालन करून, आपला खारीचा वाटा उचलूया! निरोगी राहुया.....
निरोगी राहुन, नियमांचे, सुचनांचे पालन करूया
आपला खारीचा वाटा उचलूया का?
थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)