Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस पंधरावा..7/4/2020

तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना...काल घरातले सगळे दिवे मालवले..कोणी पणती दाराशी ठेवली कोणी मोबाईलचा टॉर्च दाखवला. तर कुणी मेणबती लावली आजूबाजूने उत्साहात आवाज आला "गो करोना गो" भारतमाता की जय!’ वगैरे घोषणा देत होती. हे सगळ पार पडल्यावर आज परत हे का? कशासाठी ? हे प्रश्न तर होतेच पण त्याचबरोबर सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो, व्हिडिओ येऊ लागले... काहींनी अर्थातच दिवेही लावले. पण काहीनी या सगळ्याचा अतिरेक केला खुप दिवे लावून फटाके फोडून, गोधळ करून आता गरज आहे स्वत:वर नियंत्रण ठेवण्याची आतापर्यंत आपण घरात राहून ज्याप्रमाणे स्वत:ला नियत्रीत ठेवल तस या पुढेही ठेवायच आहे हेच नियत्रण आपल्याला प्रतिकूल परि‍स्थितीत आनंदी ठेवेल..

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.
तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो.

मला वाटते काल एका जाणिवेनं दीप प्रकाशित करायचा होता.. ह्यात खूप वेगळेपण सामावलेलं होतं. भोवतालची परिस्थिती बिकट आहे, सैन्यानं धडाडीनं वार करून युद्ध जिंकावं असा शत्रू नाही, त्याचा वेग, दिशा, वार कसलाच अंदाज नाही.. ह्या गोष्टी जास्त सतावणाऱ्या आहेत. अश्या परिस्थितीत आपण हातपाय गाळून बसलो तर उठून उभं राहायला उमेद आणणार कुठून!? म्हणून मनानं खंबीर राहाणं अत्यावश्यक होऊन बसलं आहे. त्यासाठीच ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ असावा का? ही कृती करायला लावण्यामागचा उद्देशही हाच असावा बहूतेक..
हातपाय गाळून बसायच की उठून उभं राहायच
प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आपणच आनंदी ठेवायच का ? थोडा विचार 'करो ना'..
अनामिका(PMJ)

No comments:

Post a Comment