Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस पाचवा..28/3/2020

आज सहज सकाळी रांगोळी काढतांना मनात आलं प्रसंन्न पहाट, सुंदर निसर्ग, मोकळा गार वारा त्यात अंगणात पडलेला सडा आणि त्याचा सुगंध त्यात काढत असलेली रांगोळी शंख, गोपद्म, कमळ, ओम,स्वस्तिक, समई ईतरही अनेक निसर्गानं भरभरून जे दान आपल्याला दिलं आहे त्याची ही प्रतीकं रेखून आपण त्याप्रती अपार कृतज्ञता व्यक्त करणं हा त्यामागचा खरा हेतू अक्षरश: मोहित करणारा आहे. सध्या उपलब्ध पर्यायांमधे बहुतांशी गोष्टींचं सवडीशास्त्र तर झालंच आहे शिवाय ह्या गोष्टींविषयी फार विचार करायला, त्याचा अर्थ समजून घ्यायलाही कुणाला वेळ नाही. आज मात्र खरंतर आपत्तीमुळं हाती आपसूक आलेल्या भरपूर वेळामुळं मन केवढा मोठा फेरफटका मारून आलं, फ्लॅटसमोरच्या छोट्याश्या जागेत छोटंसं चैत्रांगण काढताना बालपणाच्या त्या सुंदर आठवणींमधे मनसोक्त बागडलं, सैरावैरा धावलं... आणि तिथून परतताना एका क्षणी मात्र ते अडखळलं. वाटलं...

आज आयुष्यातून हा भावच तर हरवून गेलेला नाही!? त्याचीच फळं तर मानवप्राणी भोगत नाहीये ना!? व्यवहारी जगात काटेकोरपणे पै-पैचा हिशोब ठेवणारे आपण निसर्गानं फुकट प्रदान केलेली अमाप, अनमोल संपत्ती ना राखतो ना त्याविषयी साधा कृतज्ञभाव जपतो. मग ती संपत्ती लाभावी तरी कशी? आजच्या कठीणसमयी हा विचार पाठ सोडता सोडेना! तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे देव भावाचा भुकेला
दास सेवकांचा झाला।... अश्या भावाच्या भुकेल्या देवाला... निसर्गदेवतेला, आपण ज्यातून निर्मिलेले आहोत त्या पंचतत्वांच्या देवतांना आपण भुकेलेच तर ठेवत नाहीये ना? मग निसर्गाचा प्रकोप टळावा तरी कसा? नुकताच कोरड्या दुष्काळापाठोपाठ ओला दुष्काळही आपण आनुभवला... त्यातून अजून पुरेसे सावरतोय, न सावरतोय तोवर ही आपत्ती! ह्या आपत्तीची बीजं थोडी वेगळी आहेत... पण देश-विदेशांच्या सीमा पुसून टाकल्या तर हीसुद्धा मानवनिर्मित, निसर्गावर कुरघोडी करू पाहाणाऱ्या मानवाच्या मस्तवाल प्रवृत्तीमुळंच ओढवलेली आपत्ती आहे हे निर्विवाद!

बरं... आपत्ती ओढवली आहे, त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी काही बंधनं पाळणं आज अत्यावश्यक होऊन बसलं आहे. पण अंतरीचा हरवलेला भाव इथंही आपली पाठ सोडत नाही आणि त्याची जुळी भावंडं अहंकार व बेफिकिरीही मागोमाग धावत येत असल्याने आपण आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतो आहोत.. पर्यायानं देशाला अस्मानी संकटात ढकलतो आहोत. देशात जिथं-जिथं आवश्यक ते निर्बंध न पाळता मस्तवाल मनुष्यप्राणी मोकाट सुटला आहे तिथं ह्या आपत्तीनं गंभीर स्वरुप धारण केल्याच्या वार्ता आहेत. कधी जागे होणार आपण? कधी आपल्या कोषातून बाहेर पडणार? कधी आत्मकेंद्रितपण सोडणार? काळजाची हाक ऐकण्याएवढे संवेदनशील कधी होणार? आपली जबाबदारी कधी ओळखणार? कि कसलाच धरबंध न राखता प्रलयाचा प्रवाह बळकट करत राहाणार? ह्यानं काही साधणं तर दूरच.. आहे ते उरलंसुरलंही गमावून बसू आपण! स्मरण ठेवूया कि, आपण कधीच स्वयंभू नसतो, दृश्य स्वरूपातले आपले शिल्पकार आपल्या डोळ्याला दिसत असतात, मात्र अदृश्य स्वरूपातही अनेकजण आपलं आयुष्य सावरत असतात. जाणवून घेणाऱ्याला हे जाणवल्याशिवाय राहात नाही. आज अजून आपल्या उंबऱ्याशी ही आपत्ती गंभीर स्वरूपात पोचलेली नाही त्याचं कारण आपल्याला अश्याच अनेक अदृश्य हातांनी अलगद उचलून धरलं आहे.. त्या आपत्तीचा हात आपल्यापर्यंत पोचू नये म्हणून! ह्यासाठी आपण त्याचं कृतज्ञ राहावं तेवढं थोडं आहे. ही कृतज्ञताही नाहीच जमली तर किमान तटस्थ, शांत न राहून, मोकाट फिरून त्यांचा भार तरी वाढवायला नको. ह्या सर्व यंत्रणांनी, त्यातल्या प्रत्येक जिवानं आपलं आयुष्य पणाला लावून आपल्याला अलगद उंच उचलून धरलं आहे.. पण आपणच तिथून खालच्या संकटात उडी घ्यायला निघालो तर आपल्याला कोण आणि कसं वाचवू शकणार!? अश्या वर्तनानं आपण तर खाईत लोटले जाऊच.. सोबत आपल्या भोवतालचे चारजण घेऊन जाऊ आणि आपल्याला पेलून धरणाऱ्यांचीही फळी कमकुवत करून सगळाच डोलारा ढासळवून टाकू! गांभिर्यानं विचार करायची वेळ आली आहे... तो प्रत्येकाकडूनच घडावा आणि अंमलातही आणला जावा!
आपत्तीनं गंभीर स्वरुप धारण केल्याच्या वार्ता आहेत. कधी जागे होणार आपण? थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment