Monday 13 April 2020

थोडा विचार करो ना' लॉकडाउन दिवस पहिला ...24/3/2020

"आज रात 12 बजे से पूरे देश में संपू’र्ण लॉकडाउन होने जा रहा है"

काल हा आवाज ऐकताच मनात धस्स झाल या आधी अस कधीही झाल नव्हत. माहेरी दोन दिवस राहायला आलेली मी आता आणखी काही दिवस माहेरी राहणार हे खरे, पण नवरोबा बिचारा एकटा कसा राहणार या अाणि अश्या अनेक गोष्टांचा विचार करत सकाळ कधी झाली ते कळलच नाही.
आजची सकाळ काही वेगळीच होती सगळे निवांत, चहाचा घोट घेत गप्पा करत बसलेले, कदाचित कुणालाच कसलीच घाई नव्हती, क्षणभर विसाव्यातलं सुखही अनुभवू न शकणारे आपण! आज ह्या संकटाच्या निमित्ताने का होईना जबरदस्तीने तरी काही क्षण स्थिरावलो.. घरातल्या घरातच घडलेल्या सुसंवादाचं नवखेपण अनुभवलं, आज मशिनीसारखं पळून कामाची वेळ गाठायची नव्हती. रोजच्या ताणतणाव, दडपणाचं ओझं वाहाणारं मन रितं होऊन हलकं झालं होतं... छोट्या छोट्या क्षणांतलं छोटंसं सुख अनुभवण्याइतकं झालं होतं.

देशाच्या उंबरठ्यावरून वेगानं आत घुसू पाहाणाऱ्या संकटानं आज अनपेक्षितपणे असा विसावा आपल्या सर्वांच्याच वाट्याला आला होता .मात्र हा विसावा वाट्याला न आलेल्यांची तीव्र आठवण मनात कायम आहेच. आपल्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरपासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यापर्यंतचा एकेकजण, संकटाला घराघरात पोहोचू न देता या संकटाला संपवायचय या ध्येयानं.. महत्वाचे निर्णय घेऊन त्याप्रमाणे यंत्रणा राबवणारे देशाच्या पंतप्रधानांपासून किमानतम श्रेणीतील संपूर्ण कर्मचारीवर्ग, जीवनावश्यक सेवा पुरविणारा प्रत्येकजण... असे आपलेच देशबांधव आपल्या ह्या निवांत क्षाणांतील सुखाला कारणीभूत ठरत आहेत ही भावना मात्र प्रत्येक क्षणी जाणवत होती. ह्या सर्वांना केवळ सुट्टी नाही, विसावा नाहीये इतकंच नाही, तर इतरांसाठी स्वत:च्या जिवाची पर्व न करता हे सारेजण संकटाशी दोन हात करताहेत... त्या धैर्याला खरचं सलाम!

आपण घरात बसून ह्या सर्वासाठी प्रार्थना करूच शकतो आणि त्याही आधी अजिबात घराबाहेर न पडता त्यांना मोठं सहकार्य करू शकतो. खरंच गंमत आहे बघा कि ह्या संकटापासून देश वाचवायचा असेल तर आपल्याला हत्यारं उपसून कुठंही लढाईला जायचंच नाहीये. शांतपणे स्वत:च्या घरट्यात फक्त विसावायचं आहे... खरंतर खूप सोपं आहे, म्हटलं तर खूप कठीणही आहे. मात्र मनावर ताबा ठेवून, आपल्याला सकारात्मकताही सोडायची नाहीये.

संध्याकाळी पाच वाजता सायरन वाजेल आणि लगेच सर्वांनी टाळ्या, थाळ्या वाजवून, घंटानाद, शंखनाद करून संकटाशी सामना करण्यात प्रत्यक्षपणे कार्यरत असणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी... असं कळकळीचं आवाहन आपल्या प्रधानमंत्र्यांनी साऱ्या देशाला केलं होतं. आणि तशीच कृतीही झाली. ह्या गोष्टीची प्रत्यक्ष अनूभूती ही अत्यंत विलक्षण, अलौकिक अशी होती. पाच वाजता सायरन वाजणार म्हणून घड्याळाकडं डोळे लावून बसलेल्या आम्हाला चार पंचावन्न-छपन्नलाच आजूबाजूनं जोरजोरात टाळ्यांचे आवाज, घंटानाद ऐकू येऊ लागले.. आम्हीही मग त्यात सामील झालो. त्याच क्षणी परकी घरे, इमारतीही आपल्या वाटू लागल्या, एकमेकांना न पाहाताही! हेच कदाचित एकतत्व असेल, डोळे घळाघळा कसे आणि का वाहू लागले ह्याचं वर्णन मात्र कदापि शक्य नाही.. त्यावेळी मनात फक्त आणि फक्त कृतज्ञता भरून राहिली होती आणि नकारात्मकता पूर्णवाहून गेली होती. याच क्षणी संकटाला आणखी जवळ यायचं आमंत्रण देणाऱ्या समाजकंटकांविषयी जी प्रचंड चीड, संताप मनात होता तोही या अश्रूंत वाहून गेला आणि त्यांना सद्बुद्धी व्हावी ही प्रार्थनाच मनात उमटली.

संकटाशी झुंजणाऱ्या आपल्या लढवैय्यांसाठी! आपल्यासाठी सकारात्मक राहाणं गरजेचं आहे
अनपेक्षित वाट्याला आलेले हे विसाव्याचे क्षण छोट्याछोट्या सुखांनी पूर्ण भरूया, एरवी वेळ मिळत नाही म्हणून मागं पडलेल्या कलागुणांना उजाळा देऊया. जिवलगांशी दोन शब्दांचा सुखसंवाद साधूया,फोनचं एक बटन दाबून आपण हे करूच शकतो. राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी आपण आता करू शकतो. घरात राहणे हीच कृती देशाला वाचवू शकेल.
सर्वे भवन्तु सुखिन:,सर्वे सन्तु निरामया: !
सर्वे भद्राणि पश्यन्तु,मा कश्चित् दुःखभाग्भवेत् ।।
*अर्थ*- सभी सुखी हो , सभी रोग मुक्त हो , सभी कल्याणकारी देखे, किसी को भी दुःख प्राप्त न हो।

जेव्हा देशाची प्रमुख व्यक्ती तुमची कळकळीने विनंती करते, घरात राहा सांगते. थोडा विचार 'करो ना'..
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment