Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस अकरावा..3/4/2020

आज सकाळीचं आपल्या पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यावर अनेकाच्या मनात अनेक प्रश्न नक्कीच आले असतील हे का? कशासाठी? तस मिडीयीवर दिसू ही लागल पण खर सांगु मित्रहों इतकं करण्यापेक्षा थोडी श्रद्धा ठेवली आपल्या राजावर तर काय बिघडल. खरं तर ह्या गोष्टीमागचा अर्थ मलाही कळलेला नाही, 'सांगतेय म्हणून करायचं, जास्ती प्रश्न विचारायचे नाहीत’ असं कधीतरी आपल्याला सुनावलं गेलेलं वाक्य आठवलं आणि ‘करून बघायला काय जातंय, त्यांनी सांगितलं आहे तर काहीतरी उद्देश असणारच त्यात!’ मी पर्याय शोधला. थोड्या वेळानं अनेक मत-मतांतरं विश्लेषणासोबत येऊ लागली. कुणी आकड्यांचं गणित मांडलं, कुणी तापमानाचं मांडलं, कुणी त्याकालावधीत सॅटलाईटचा उपयोग करून त्यावेळी काहीतरी जाणून घ्यायला मदत होईल, हा धोरणीपणा त्यामागं असल्याचं मत मांडलं, कुणी ह्या प्रस्तावाला लोकांचा किती पाठिंबा मिळतो त्यावरून पुढील धोरण सरकारला आखता येईल असा आडाखा बांधला, कुणी उर्जातत्वाशी ह्याचा संबंध जोडला. खोटं कशाला बोलू, मला तर मोदीजी शिवरायांच्या रुपात दिसू लागले आणि वाटलं, ह्या अंधाराचा फायदा घेऊन देशद्रोह्यांचा कडेलोट करून त्यांनी गनिमी कावा साधावा. झालेल्या अनेक तर्कवितर्कांपैकी कुठल्याच क्षेत्रातला काहीच अभ्यास नसल्यानं मी त्याचं खरं-खोटं विश्लेषण करू शकत नाही.

एक क्षणभर मात्र बाकी सगळा विचार बाजूला ठेवून डोळे मिटून मी दिव्याची प्रज्वलित ज्योत डोळ्यांसमोर आणली आणि मी माझ्या बाळाला घेवून ‘शुभं करोती कल्याणम्‌ आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते’ म्हणू लागली. अाणि एकदम लहानपण आठवल तिन्हीसांजेच्या वेळी हातपाय स्वच्छ धुवून देवाजवळ लावल्या गेलेल्या दिव्याला नमस्कार करून बेंबीच्या देठापासून ओरडत हा श्लोक म्हणणारी मी, माझे भाऊ, कधी वाड्यातल्या सगळ्या मुलाींनी मिळून अंगणात एकत्रित म्हटलेली गाणी असं सगळं डोळ्यांपुढं आलं. आज हे आयुष्यातून हरवत चाललं आहे. अचानक त्या क्षणांच्या अनुभूतीसाठी मन आसुसून गेलं. त्या पाठोपाठ आपण किंवा घरातलं कुणी आजारी असताना हातात चिमूटभर अंगारा घेऊन रामरक्षा, भीमरूपी म्हणून झाल्यावर तो अंगारा स्वत: आपल्या कपाळी लावतानां आई-बाबा-आजी-आजोबा-आत्या-मावशी-काका-मामा सगळे दिसले आणि आपली लेकरं लहान असताना एखाद्या हळव्या क्षणी आपणही त्याच भक्तिभावानं हे सगळं केल्याचं अचानक स्मरलं. ह्या प्रत्येकवेळी डॉक्टरांकडून औषध आणण्यात कधीच हरकत नसायची. ते औषध शरीरावर परिणामकारक उपचार करायचंच .मात्र त्यासोबत मनाची बळकटी राखण्याचे हे उपायही हमखास केले जायचे... त्यातही हयगय नसायची. आजही आपली लेकरं अचानक आजारी पडली तर मुलांपेक्षा आपलं स्वत:चं मनोबल राखण्यासाठी हा उपाय हटकून आठवल्याशिवाय आणि मग आपण तो केल्याशिवाय राहात नाहीच. अश्या नाजूक क्षणांमधेच ह्या गोष्टींची आठवण तीव्रतेने होते, महत्व जास्ती पटतं.

विश्वासानं आपण ही गोष्ट करूया. प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ, तर्क कळलाच पाहिजे असं कुठं आहे... एखादी गोष्ट वडीलधारं माणुस सांगतंय म्हणून श्रद्धाभावानं करून बघूया! बाकी काहीच नाही तरी स्वत:च्या मनाची ताकद वाढवण्यासाठी... संपूर्ण देशातल्या करोडो लोकांनी एकाच वेळी एकच कृती केल्यावरचा एकात्मभाव अनुभवण्यासाठी! भाषणात त्यांनी सांगितललेलं -
उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्य लोकेषु न किञ्चिदपि दुर्लभम् ॥.... हे सुभाषित प्रमाण मानून आपल्यातील उत्साह जिवंत ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी हे करून बघूया... ‘ही लढाई जिंकायचीच आहे’ हा दृढसंकल्प मनात धरून! आपल्या मनातील उत्साह टिकून राहिला तर आपल्याला ही लढाई जिंकणं अशक्य नाही ही धारणा बळकट होण्याची आज सर्वसामान्य व्यक्तीला खूप गरज आहे. त्यासाठी करूया... त्यामागचा उद्देश, कारण, धोरण कळलं किंवा नाही कळलं तरी, ही गोष्ट तर्कसंगत वाटली किंवा नाही वाटली तरीही... संपूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं करूया...
दृढसंकल्प मनात आहे. लढाई जिंकायचीच आहे.
त्यासाठी उत्साह टिकून राहावा म्हणून मी काही करतोय का ? थोडा विचार 'करो ना'....
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment