Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सातवा ..30/3/2020

आज एक कथा आठवली नेहमी तुम्ही-आम्ही एेकलेली आटपाट नगर होतं. तिथला राजा मोठा शिवभक्त होता म्हणून त्याच्या मनात आलं कि महादेवाच्या मंदिराचा गाभारा दुधानं भरावा. त्यानं दवंडी पिटली कि, गावातल्या सर्वांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवळाच्या देवळात अभिषेकाला यावं. सर्वांना धाक पडला, राजाज्ञेनं घाबरून कुणीही घरात थेंबभरही दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुला-बाळांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेऊन गाभाऱ्यात वाहिलं. मात्र गाभारा भरला नाही. राजा खट्टू होऊन परतला. दुपारी मात्र अजब गोष्ट घडली. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं, मुला-बाळांना खाऊ घातलं, लेकी-सुनांना न्हाऊ-माखू घातलं, गाई-वासरांना चारा घातला. थोडक्यात घरातल्या सगळ्यांचा आत्मा थंड केला आणि मग आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंधफूल, तांदळाचे चार दाणे, बेलाचं पान आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली. तिनं मनोभावे महादेवाची पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं आणि प्रार्थना केली, ‘हे महादेवा, नंदिकेश्वरा! राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही, तो माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी भक्तिभावानं अर्पण करतेय त्याचा स्वीकार कर.’ नंतर तिनं सोबतचं खुलभर दूध शंकराला वाहिलं आणि माघारी आली. इकडं चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर देवळाचा गाभारा भरून गेला. गुरवानं हे पाहाताच राजाला कळवलं, परंतू हे कसं घडलं ह्याचा काही थांग लागला नाही, दोन सोमवार असंच घडलं.

शेवटी तिसऱ्या सोमवारी राज स्वत: देवळाबाहेर थांबला. दुपारी म्हातरीनं दूध वाहिल्यावर गाभारा भरलेला पाहाताच त्यानं तिला अडवलं आणि हे घडण्याचं कारण विचारलं. म्हातारी घाबरल्यावर त्यानं तिला अभयवचन दिलं. मग तिनं सांगितलं, ‘हे नरेशा, तुझ्या आज्ञेनं काय घडलं!?.. तर वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांची हाय माथी आली. हे देवाला कसं आवडेल? म्हणून त्याचा गाभारा भरला नाही.’ मग राजानं ह्यावरचा उपाय विचारला. ती म्हणाली, ‘मुला-वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंदी, समाधानी राहावं म्हणजे देव संतुष्ट होईल. त्याचा गाभारा भरेल.’ राजानं तिच्या सांगण्यानुसार पुन्हा दवंडी दिली. गावातल्या सर्वांनी मुला-बाळांना, गाई-वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. राजानं स्वत: महादेवाची पूजा केली आणि हात जोडून डोळे मिटून मनोभावे प्रार्थना केली. नंतर डोळे उघडून पाहातात तो देवाचा गाभारा काठोकाठ भरून गेला होता. राजाला खूप आनंद झाला. त्यानं म्हातारीला इनाम दिलं आणि लेकी-सुनांसोबत ती आणखी समाधानात नांदू लागली. तसं तुम्ही-आम्ही नांदू. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

आज अचानक ही कहाणी आठवली. आपण सगळ्यांनीच ती कधी ना कधी वाचलेली आहेच. पण आज त्यातून वेगळं काहीतरी सापडलं. वाटलं, ह्या परिस्थितीत घाबरून न जाता आपलं मन:स्वस्थ्य टिकवून ठेवणं, घरात सुख-शांती-समाधान नांदतं ठेवणं आणि त्याचसोबत आपल्या कुवतीनुसार जमेल तेवढं गरजवंतातच देव पाहून त्याला भक्तिभावानं अर्पण करणं हा आपला स्वधर्म आपण पाळूया. अश्या आचार-विचारांची साखळी संपूर्ण व्यवस्था सुस्थितीत ठेवायला नक्कीच मदत करेल. आपण कोणत्याही परिस्थितीत आपली उमेद हरवून बसता कामा नये. नाहीतर झुंझणाऱ्यांच्या पायांत बळ कसं आणि कुठून यायचं. आधी निष्ठेनं स्वधर्माचं आचरण करूया म्हणजे आपली मनोदेवता प्रसन्न राहील, मनोबल, उमेद टिकून राहील आणि मग आपण आपल्याकडून केलेला खुलभर दुधाचा अभिषेक, मूठभर मदत फार मोठी भूमिका बजावेल. शिवाय क्षणभर डोळे मिटून, ‘देवा, प्रत्येकाच्या मुखी अन्नाचा कण पडू दे’ अशी प्रार्थना तर दिवसातून कितीही वेळा आपण करू शकतोच कि! आपली खरी खंत हीच आहे कि आपण स्वत: काही करू शकत नाही, आपल्या हातात काही नाही. मग ज्याच्या हाती ' ते आहे त्यालाच तर विनवायला हवं आपण! तेवढं करूया... करूयाच!
क्षणभर डोळे मिटून, ‘देवा, प्रत्येकाच्या मुखी अन्नाचा कण पडू दे’ अशी प्रार्थना करूया
थोडा विचार 'करो ना'..
अनामिका(PMJ)

No comments:

Post a Comment