Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस अठरावा..10/4/2020

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया! .....रोज सघ्यांकाळी मी माझ्या बाळाला घेऊन शुभकरोती म्हणते त्याचा जन्म झाल्यापासुन अगदी पाचव्या दिवसापासुन मी त्याला घेऊन शुभकरोती म्हणते. आज आठ महिन्यात मला कधीही आठवत नाही बाळाने शुभकरोती म्हणतानां मला त्रास दिला. चुळबुळ केली, रडला..कधीच नाही उलट तो तितका वेळ नेमाने शांत प्रार्थना ऐकतो..कदाचित त्याला प्रसंन्न वाटत असावं मला वाटत प्रार्थना म्हणजे स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी मिळालेली संधी. जरा वेळ शांत,स्तब्ध बसून मन एकाग्र करून नियमित म्हटली गेलेली एखादी प्रार्थना आपल्या मन आणि शरीरावरचा ताण हलका करू शकते.  प्रार्थना ही मनाची शक्ती आहे. मनावरचा ताण-तणाव हलका करून मनातले विचार सुसंगत करण्याची प्रेरणा आपल्याला प्रार्थनेतून मिळू शकते....  प्रार्थना म्हणजे जीवनाच्या सुसंस्कुत बाजूंचा जाणीवपूर्वक घेतलेला वेध आणि बोध.

मनावर सतत ताण-तणावा चे ओझे घेऊन आज आपण सगळेच जगत आहोत. त्यापासून सुटका मिळवण्याचे प्रत्येकाचे आपापले वेगळे मार्ग आहेत. मनातल्या ताणाचे योग्य नियोजन केले नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मन शरीर आणि चित्त वृत्तींचे संतुलन, निरोगीपणा  आपण गमावून बसतो. आपली विविध व्याधींशी सामना करणारी प्रतिकार क्षमता खिळखिळी होते आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध मनोशारीरिक आजारांचे मूळ मात्र मनावर असलेल्या आणि टाळू न शकलेल्या ताणात असते.  
सततच्या चिडचिड्या स्वभावामुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखावतो आणि त्या आपल्यापासून दूर निघून गेल्या हे ही आपल्याला सहन करणे शक्य होत नाही. एकूण काय आपला अभिमन्यू होतो, ताणाच्या चक्रव्यूहात परत मागे फिरण्याची वाट हरवलेला. या ताणतणावाचे नियोजन करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या मार्गाने करत असतोच.

आपल्या मनाची हाक ऐकण्यासाठी आपण स्वतःलाच दिलेला एक छोटासा अवसर. स्वतःचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न. संवेदनशील मनाची संवेदनशीलता सतत जागी असावी म्हणून मनाची केलेली जडणघडण. आपल्यातल्या बऱ्या-वाईट वृत्ती प्रवृत्तींचे संपूर्ण समर्पण करण्यासाठी मनाला मिळालेली प्रेरणा,सकारात्मक उर्जेचा मानसिक स्त्रोत म्हणजे प्रार्थना. आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांचा निचरा करण्याची खूप मोठी शक्ती प्रार्थनेत आहे. आस्तिक असण्याशी किंवा नसण्याशी तिचा काही संबंध नाही,चांगल्या विचारांवर, चांगल्या वागणुकीवर असलेली श्रद्धाच यासाठी पुरेशी आहे. विचारांमध्ये,वागणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वातच बदल घडवून आणण्याची क्षमता प्रार्थनेत असते.

मनातल्या नाविन्यपूर्ण कल्पनाची, विचारांची, निर्मितीच्या बीजांची मशागत करण्याची शक्ती प्रार्थनेत आहे. प्रार्थना व्यक्तिगत असू शकते किंवा सामुहिक, कशीही केली तरी तिच्यापासून मिळणारी उर्जा संक्रमित होतेच. मना मनांना जोडण्याची, विश्वासाने, आपुलकीने दुसऱ्याच्या भावनांशी समरस होण्याची सुरवात सामुहिक प्रार्थनेतून होते. प्रार्थना माणसाचे साध्य नाही तर त्याच्या हातात असलेले असे साधन आहे की जे समग्र मानवतेच्या कल्याणासाठी हातभार लावेल. मन आणि बुद्धीचा विवेक करण्याचे भान प्रार्थनेमुळे जागे राहते. विवेकाच्या कसोटीवर आपले विचार तपासून घेण्याची क्षमता प्रार्थनेतले शब्द, आशय,भाव वाढवतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि तिच्या मनातला कशावर तरी असलेला विश्वासही वेगळा. माझा या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर विश्वास आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टींचे कुतूहल माझ्या मनात आहे.

कुटुंब, समाज, माणसा माणसातील परस्पर संबंध, मानसिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक अशी त्यांच्यातल्या संबंधातील देवाणघेवाण, त्यातील चढ उतार, सतत बदलत असलेले दिवस, बदलत असलेली परिस्थिती, बदलत्या वेळा, यांच्यातील परस्पर अंतरक्रियांचेही मला प्रचंड कुतूहल आहे. प्रार्थना म्हणजे माझ्या मर्यादा जाणून घेऊन नम्रपणे त्यांचा केलेला स्वीकार आणि माझे जग, माझे आयुष्य सहज, सोपे करणाऱ्या व्यक्ती, वस्तू किंबहूना सर्व चराचरा विषयी बाळगलेली कृतज्ञता...! 
गुरु रवींद्रनाथ टागोरांचीच एक सुंदर रचना

विपत्तीमध्ये माझ्या मदतीला ये ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीत मी भयभीत होवू नये इतकीच माझी इच्छा.
दु:खाने व्यथित झालेल्या माझ्या मनचं 
तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही 
दु:खावर जय मिळवता यावा, इतकीच माझी इच्छा  
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझं बळ मोडून पडू नये इतकीच माझी इच्छा.
जगात माझं नुकसान झालं केवळ फसवणूकच वाट्याला आली तरी मन माझं खंबीर राहावं इतकीच माझी इच्छा.
माझं तारण तू करावंस मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही तरुन जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं इतकीच माझी इच्छा.
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात असावी इतकीच माझी इच्छा.
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझं चेहरा विसरू नये दु:खाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्या अस्तित्वाविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये इतकीच माझी इच्छा.
रोज स्वता:ला सकारात्मक्तेची शिकवण प्रार्थनेतून देवू या का? थोडा विचार 'करो ना'
अनामिका(PMJ)


No comments:

Post a Comment