Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सतरावा..9/4/2020

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य ....सकाळीच सुर कानावर पडले आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या जुन्या गावातील हनूमान मंदीर आठवले घरासमोरच मंदीर असल्याने खुप धाम धुम असायची ती अदल्यादिवशी सर्व मिळून केलेली मदिराची साफसफाई, मंदीराची रंगरंगोटी, लायटिंग,रांगोळी फुलाच्या माळा आणि मग सकाळी महावीर हनुमानाची पुजा, आरती, प्रसाद मन भरून पावत 

चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते एकूणच हा बजरंगबली जन्मल्याजन्मल्या सूर्याला फळ समजून धरायला काय धावला, द्रोणागिरी काय उचलून आणला, सीतामाईच्या शोधात एकटाच निडरपणे थेट लंकेत काय पोहोचला, लंकेत रावणासमोर शेपटीचं उंचच उंच वेटोळं करून काय बसला आणि मग त्याच शेपटीनं लंकादहन काय केलं, रामासमोर भक्तिचा दाखला देताना छाती फाडून आतल्या प्रभू रामचंद्रांचं त्यांनाच दर्शन काय घडवलं!.. एक ना दोन.. कित्येक कथा त्याच्या बल, बुद्धी, तेजाची महती सांगणाऱ्या! वानरकुळातला असल्यानं त्याचे ते गुब्बुश गाल पण किती छान दिसतात. जेव्हां कधी गदाधारी मारुतिराय आठवतात मन चैतन्यानं भरल्याशिवाय राहात नाही. असं म्हणतात कि हनुमंतराय हे रामनाम धारण करणाऱ्या शंकराचे अकरावे रुद्रावतार मानले जातात, असंही म्हणतात कि प्रभु रामचंद्रांना त्यांच्या कार्यात सहाय्यता करण्यासाठी ह्या रामदूताचा जन्म झाला... विचार केला तर अंतरी एकाकार असलेले हे सगळे भगवंतच! मात्र अजानबाहू, शून्यमंडळ भेदणारे तरीही गोडुले, ‘मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे’ अशी तुर्यावस्था साधलेले तरीही बुद्धिमतां वरिष्ठम्‌, अतुलनीय पराक्रमी, अफाट शक्ती आणि असीम भक्ति दोन्हीं साधलेले मारुतिराय जरा जास्तच जिव्हाळ्याचे! आज चैत्री पौर्णिमा.. हनुमानजयंती... संपूर्ण जगताला ग्रासलेल्या या संकटाचा विनाश करण्यासाठी मारुतिरायांना साकडं घालूया आणि त्याचसोबत ह्या बुद्धिदायकाने दिलेल्या बुद्धीचा वापर करून संकटाचं गांभीर्य ओळखून नियमबद्ध राहूया, मन:स्वास्थ्य राखण्यासाठी ह्या बजरंगबलीसारखी बलोपासनाही अंगिकारुया आणि रामभक्तिरतही होऊया... ह्या सगळ्यातून मिळणारं सामर्थ्य आपल्या धैर्याला बळकटी आणेल, कंटकांना ताळ्यावर आणायला उपयोगी ठरेल त्याचसोबत स्वत:ची जबाबदारी ओळखायला शिकवेल, निष्ठेचं महत्व जाणवून देईल आणि निश्चयाचा महामेरू पेलायची ताकद देईल.
बजरंगबलीच्या आशिर्वादाने बुद्धीचा वापर करून संकटाचं गांभीर्य ओळखून वागुया का? थोडा विचार 'करो ना'
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment