Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस बारावा..4/4/2020

लहानपणी आई अगदी आग्रहाने श्रीरामनवमीला आम्हा सर्वानां मंदीरात घेवून जायची ते लग्न होईस्तोवर.मु

ख्या म्हणजे घरी आल्यावर रामायनावरील चर्चासत्र रंगायच ....एकदा एका विचारवंताला विचारले गेले की रामायण व महाभारत या मध्ये महत्त्वाचा फरक काय आहे. त्यांनी एका वाक्यात सांगितले की महाभारतात राज्य मिळावे म्हणून भाऊ-भाऊ भांडले तर रामायणात भाऊ-भाऊ मला राज्य नको ते तुझेच आहे, तूच राज्य कर म्हणून भांडत होते. श्रीरामांनी आपल्या प्रेमळ, आपुलकीच्या व निर्मळ स्वभावामुळे प्रजेबरोबरच आपल्या भावांचे आत्यंतिक प्रेम मिळविले होते. चारही भावांमध्ये श्रीराम मोठे होते. हे मोठेपण त्यांनी अधिकारापेक्षा ही कर्तव्य म्हणून अधिक निभावल्याचे त्यांच्या चरित्रातून लक्षात येते. त्यांनी आपल्या तीनही भावांचे नेहमी रक्षण तर केलेच पण ते आनंदी राहतील याची नेहमी काळजी घेतली. लक्ष्मण अधिक काळ श्रीरामाच्या निकट राहिला. अगदी कुमार वयापासून विश्वामित्रांच्या यज्ञ रक्षणार्थ श्रीरामाबरोबर होता. सीता-स्वयंवर, वनवास, रावणयुद्ध ते राज्याभिषेकापर्यंत लक्ष्मण सावलीसारखा रामाबरोबर राहिला. राम-रावण युद्धाच्या वेळी रावणाच्या अमोघ शक्तीने लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर तो मेला असे समजून आता आपणालाही जगण्याचा हक्क नाही असे आर्तस्वरात व्यक्त होणारे राम असोत किंवा वनवासात निघाल्यावर मनात कोणताही किंतू न ठेवता अयोध्येचे राज्य भरताला देवून माता सीतेलाही "भरत मला प्राणापेक्षा ही प्रिय असून तू ही त्याला मुलासारखा मान दे" असे सांगितले. लावणासुराच्या अत्याचाराचा शत्रुघ्नाच्या माध्यमातून निप्पात करून ते राज्य शत्रुघ्नाला दिले.

श्रीरामाच्या जीवनाचा शेवटही बंधु वियोगामुळेच झालेला दिसतो. काही कारणाने लक्ष्मणाला दिलेल्या शिक्षेचे देहत्यागात झालेले पर्यवसान आणि लक्ष्मणानंतर एक क्षणही पृथ्वीतलावर आपले अस्तित्व न ठेवणारे श्रीराम यामुळेच भक्त त्यांना देवत्वापर्यंत घेऊन जातात. बंधू प्रेमातून देवत्व प्राप्त होते याचे उत्तम उदाहरण याशिवाय दुसरे कोणते असू शकते !
आज श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर बाह्य सोपस्कार आठवले पण ती अनुभूती किती श्रीमंत होती हे आता जाणवतंय. कुठंतरी त्या छोटुकल्या मूर्तीशी बांधला गेलेला विश्वासाचा दोर पुढच्या आयुष्यात उंच उडताना आपल्याला खाली आपटू देत नसावा. ह्या मर्यादा पुरुषोत्तमानं स्वत: तर मर्यादा सोडली नाहीच आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा परीघही तो सुरक्षित राखत असावा. एकपत्नी-एकवचनी-एकबाणी सर्वथा असा तो एकतत्वच शिकवत असावा.. ते आम्हा नाठाळांच्या पचनी पडत नाही हा भाग वेगळा! शिंगं पार वर आली तसं एका क्षणी ‘राजा म्हणून तो श्रेष्ठ असेल पण नवरा म्हणून नाही’ वगैरे मुक्ताफळंही उधळली.. मात्र तो आपणा पामरांसारखा सामान्य परिमाणं घेऊन जगणारा नव्हता आणि ना सीतामाईची दृष्टी आमच्यासारखी हीनदीन होती. अवतार घेऊन काहीतरी जीवनमूल्यं प्रस्थापित करायला ही देवमंडळी मानवप्राण्यासारखं हाडामासांचं शरीर घेऊन आली आणि आपली भूमिका बजावून देवलोकी मार्गस्थ झाली. मात्र त्यांचं सांगणं समजून घ्यायलाही त्यांची कृपाच हवी.. ती लाभावी अशी प्रार्थना करूया!

मनात आलं त्याच्या एकतत्वाचा भंग केला जातोय म्हणून तर आज ही वेळ आली नसेल ना आपल्यावर? आज कायद्याच्या निर्बंधानं हे एकतत्व लादलं गेलं आहे आपल्यावर.. नाइलाजास्तव! आणि ते गरजेचं आहे ही जाणीव करून देण्याचं ‘त्यानं’च ठरवलं आहे बहुधा! आज कुणाचीच कुठंच निष्ठा नाही.. म्हणूनच कदाचित सुख-समाधान आणि सुरक्षितताही नाही! प्रत्येकच क्षेत्रात अनंत पर्याय उपलब्ध असल्यानं ‘हा नाही तर तो’ हे तत्व आचरल्यानं पायभूत असायला हवेसे घट्ट बंध बहुतांशी कुठंच नाहीत... अगदी नातेसंबंधांतही! फक्त समोरच्याकडून जास्तीत जास्त फायदा काय करून घेता येईल अशी झापडं लावल्याचीच फळं भोगतोय का आपण? अश्याप्रकारे माजलेल्या प्रचंड अनागोंदीनं आयुष्य भंजाळून जातंय आणि ते आटोक्यात आणायलाच आज ‘त्यानं’ थांबवलं आहे आपल्याला!... थोड थांबूया, विचार करूया..
प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी लीन होणारे आपण
मर्यादा भंग करतोय का? थोडा विचार 'करो ना'
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र कि जय.
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment