Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस नववा..1/4/2020

माझ्या लहान भाऊ रोज एक नविन पेन्सिल स्केच तयार करतोय...ते पाहात होते अजानक जाणवल ‘पांढरा रंग योग्य ठिकाणी वापरता येणं हेच कसब असतं शेडिंगमधे... पांढरी पेन्सिल नसते, त्यामुळे खोडरबराचा वापर करावा लागतो’, तो मागे एकदा सहज बोलून गेला होता आणि माझ्या मनात मात्र ते वाक्य कायमचं रुतून बसलं होतं.... कसल्यातरी सखोल अर्थाचं मुळ असल्यासारखं! आज मन खूप हेलकावे खात होतं.

आपण वास्तव टाळतोय का? स्वप्नाळू डोळ्यांनी वावरत पीडितांची उपेक्षा करतोय का? पण मी कुढत बसून परिस्थिती सुधारणार आहे का? त्यातून मला आणि माझ्या आजूबाजूच्यांना त्रास होण्याशिवाय काय निष्पन्न होणार आहे? अश्या अनुत्तरीत प्रश्नांची मालिका सुरूच होती आजूबाजूच्या वार्तांनी मन:स्वास्थ्य डळमळीत होत होतं आणि त्याचवेळी जर्मनीचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांच्या आत्महत्येचं वृत्त प्रचंड अस्वस्थ करणारं होतं... आणि त्याचं कारण त्याहूनही जास्त! सर्व जगभर ज्या सैतानानं धुमाकूळ घातला आहे त्या कोरोनासुरापायी देशाची अर्थव्यवस्था बिघडत चालल्याचा मनावर आलेला प्रचंड ताण असह्य होऊन ही काळजाला घरं पाडणारी कृती त्यांच्या हातून घडली. स्वदेशाच्या खालावत चाललेल्या स्थितीनं बेचैन होणं हे एकप्रकारे देशप्रेमच! परंतू त्याला तोंड देण्याचा जो पर्याय त्यांनी निवडला ते ऐकून मन सैरभैर झालं एवढं मात्र खरं!... आणि मग मला आठवल.. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मैने आपको सिर्फ बाहर जाने से मना किया है... पर अंदर झांकने का मौका दिया है!’ संकट तेच आहे.. प्रश्नांची तीव्रता तितकीच आहे.. पण बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आयुष्य गमावण्यापेक्षा ते हाती लागू शकतं इतका मोठा फरक जाणावू लागला. ढासळलेलं मनोबल पुन्हा गोळा होऊ लागलं.

अनपेक्षित लाभलेली स्वस्थता प्रत्येकालाच स्वत:चा शोध घ्यायला भाग पाडतेय एवढं मात्र खरं! करू म्हणून बाजूला ठेवलेल्या, राहात गेलेल्या गोष्टींची आठवण प्रत्येकाला होऊ लागलीये. कुणी चित्र काढतय, कुणी लिखाण करतयं तर कुणी पुस्तके वाचतयं.. थोडक्यात प्रत्येकातल्या विविध कला बाहेर येऊ लागल्यात आणि हे नक्कीच सुखावह आहे. या क्षणी आयुष्यातले प्रश्न संपलेत असं नाही... ते असतात, राहाणारच! मात्र आज त्यातल्याच काही प्रश्नांना थोडं थांब म्हणायची संधी मिळाली आहे आणि काही प्रश्नांची धार बोथट करण्यासाठी जो-तो आपापले पर्याय शोधतो आहे.

हे सगळे पर्याय मला माझ्या भावाच्या वाक्यातलं ‘खोडरबर’ वाटले... मनावरची नकारात्मकता पुसुन आत्ता परिस्थिती काळीज भिरभिरवून टाकणारी आहे, अस्वस्थतेची पेन्सिल होऊन मनाच्या कागदावर वेदनांचे रंग गिरवत राहाणारी आहे... ही गिरगिट झाकून टाकणारा, डोळ्याला सुखावणारा रंग निर्माण करणारी दुसरी कोणतीच पेन्सिल आत्ता उपलब्धच नाहीये. अश्यावेळी ह्या नको असलेल्या अस्वस्थ रंगांचं गडदपण कमी करणारं ‘खोडरबर’ शोधून आपल्याला बिघडतं चित्र आणि त्यातल्या रंगसंगतीतलं संतुलन सांभाळायचं आहे. हे खोडरबर शोधायला बाहेरच्या जगात जाता येणार नाही ही मोठी खीळ आहे. मग हातात उरतं ते फक्त अंतरंग! तिथं डोकावणं भाग पडणं हे आत्ताच्या परिस्थितीचं फलीत आणि तीच नियतीची योजना असावी बहुधा!
चिर विजय की कामना है, राष्ट्र ही आराधना है।
दूर कितना ध्येय अपना, तनिक चिन्ता हम न करते ।
बाहर जाने से मना किया है...
पर अंदर झांकने का मौका दिया है!’
थोड विचार 'करो ना'
अनामिका(PMJ)

No comments:

Post a Comment