Thursday 25 July 2019

वाचक मी वाचन विसरलो.......

वाचक आणि वाचन खरंच कमी झालंय? झालं असेल तर त्याची कारणे कोणती ? आणि ते वाढण्याची जबाबदारी कोणाची? वाचक आणि वाचन वाढवण्यासाठी काय योजना असू शकतात?

वाचक आणि वाचन कमी झाले आहेत हे जरी खरे असले तरी, त्यामागे करणेही तशीच आहेत. जसे मोबाइल वापरण्याचे वाढते प्रमाण, एखाद्या गोष्टीचा वापर कसा करायचा हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसेच मोबाईलचे चांगले आणि वाईट, उपयोगही असतात.

आणखीन एक कारण म्हणजे आपले हे धावते जग. ज्यामध्ये आपल्याला आपल्यासाठीच वेळ उरलेला नाही. वाचन म्हणजे फावल्या वेळातला टाईमपास नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. तीही एक कला आहे. त्यासाठी आपलं मन एकाग्र करून संपूर्ण लक्ष त्या वाचनामध्ये ओतावं लागतं. आजच्या आपल्या या धावपळीच्या आयुष्यात तेवढा वेळ मिळणं कदाचित अशक्यच आहे.

त्यात भर म्हणून की काय, आपल्या आजच्या पिढीला वाचनाची आवड म्हणजे काय तेच ठाऊक नाही. आजच्या फास्टफूड च्या जगात जसं आपल्याला सगळं झटपट हवं असतं, तशीच प्रत्येक गोष्ट मिळावी अशी अपेक्षा असते. एखादी गोष्ट मेहनत करून थोडा वेळ देऊन मिळवल्यावर त्या गोष्टीचा आनंद वेगळाच असतो हे आम्हाला ठाऊक च नाही.

वाचनाच्या बाबतीतही तसेच असते, थोडा वेळ देऊन त्या गोष्टीची खरी मजा घेता येते. जर एखाद्या व्यक्तीला खरंच ही आवड जोपासावी असे वाटत असेल तर त्यासाठी ती व्यक्ती वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करते. जसे की स्मार्टफोनच्या साहाय्याने अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपल्याला पुस्तक विकत न घेता देखील ते वाचणे अगदी सहज सोप्पे आहे. जसे की एखाद्या पुस्तकाची ऑडिओ फाईल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ती ऐकता येते. बाजारात किंडल नावाचं एक साधनसंच (गॅजेट) उपलब्ध आहे. त्यामार्फत आपण वेगवेगळी पुस्तके एकाच गॅजेटमध्ये वाचता येतात.

कदाचित याच कारणांमुळे पुस्तक विकत घेण्याऐवजी ते मोबाईलमध्ये वा एखाद्या एपमध्ये वाचणे जास्त सोईचे वाटते. कदाचित ते योग्यही असू शकते. याचे कारण काळाप्रमाणे बदलणे सगळ्यांसाठीच फायद्याचे आहे.

वाचक आणि वाचन जर वाढवायचे असेल तर त्याची संपूर्णतः जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीची आहे. कोणत्याही मार्गाने असो, वाचन करणे हे महत्वाचे आहे. कोणत्याही पद्धतीने असो जुन्या किंवा नवीन, वाचनाची आवड निर्माण होणे हे महत्वाचे आहे.

वाचनाची आवड कमी होण्याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्या भाषेवरील प्रेम. ती भाषा जाणून घेण्यासाठी त्याबद्दल वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी त्याबद्दल प्रेम असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच आजच्या पिढीला मिळणारा कमी-जास्त प्रमाणातला वेळ व त्याचे नियोजन कसे करावे, कोणत्या गोष्टींमध्ये आपला वेळ गुंतवावा हेच कळेनासे झाले आहे. मग तो वेळ ते मोबाईल, टीव्ही, इंटरनेट या सगळ्या गोष्टींमध्ये वाया घालवतात.

जर ते त्यांचा वेळ या सगळ्या गोष्टींबरोबर जास्त घालवत असतील तर त्याच गोष्टीच्या साहाय्याने त्यांची वाचनाची आवड वाढवायला हवी.