Saturday, 27 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  सातवे-पुष्प.. विषय-सून...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
सातवे - पुष्प
विषय - सून
  विवाहानंतर खऱ्या अर्थाने नात्यांचे दडपण येते. दोघांपैकी स्त्रीवर ते अधिक असते. वास्तविक प्रत्येकाचे आयुष्य स्वतंत्र असते व ते घडवण्याची प्रत्येकाला संधी असते. ते कसे व्यतीत करायचे? ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न असतो. नात्यांचे ओझे वा दडपण स्त्रियांवर अधिक असते. कारण त्यांना माहेर व सासर दोन्हीकडची नाती जपायची असतात. ती गृहिणी असेल तर ती ते सारे करेलही पण अलीकडे बहुतांश स्त्रिया पूर्ण वेळ गृहिणी नसतात कोणत्या न कोणत्याप्रकारे त्या स्वतःची ओळख तयार करण्याचा, आर्थिक स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण काम व  इतर जबाबदाऱ्यांमुळे ते प्रत्येकीस शक्य होतेच असेही नाही

   स्त्री च्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आणि परीक्षेची वेळच म्हणा ना! ही सूनेची भूमिका असते. त्यात प्रत्येकजण तिला न्याहाळत असतो. विशेष म्हणजे सासरची मंडळी.. मुलीची सून होताच तिला अनेक नात्यांना न्याय दयावा लागतो. त्यात सासू सूनेच नातं फार महत्वाचं मानलं जात. कधीकधी लोक गंमतीन म्हणतात ही, की "मुलामुलीची पत्रिका पाहण्यापेक्षा सासू सूनेची पहा " म्हणजे संसार सुखाचा होईल. कारण या दोन भूमिकेलीत स्रिया जर मिळून मिसळून राहिल्या तर आणि तरच संसार सुखाचा होतो.

   नवीन सुनेला अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. नात्यांशी परिचय करून घेताना, त्यांच्याशी जुळवून घेताना तिची दमछाक होते. ती केंद्रस्थानी असते व तिच्याकडून साऱ्यांच्याच आपापल्या कुवतीनुसार विभिन्न अपेक्षा असतात. वास्तविक ती नवीन घरात येते तेव्हा तिच्या मनातली द्विधा मन:स्थिती, संकोच, गोंधळ थांबवून तिला मानसिक निवांत करायचे सोडून ‘इकडच्या पद्धती, नियम, श्रीमंती, कुलाचार’ इ. सर्व बाबींचे तिच्यावर इतके दडपण आणले जाते की, लग्न करून आपण चुकी केली की काय? असे तिला वाटू लागते. 

    लग्न ठरवतानाच मुलींनी करियरबाबत नवरा मुलगा व त्याच्या कुटुंबाशी स्पष्टपणे बोलले पाहिजे. आधीच्या पिढीला त्या ‘शहाणपणाची’ परवानगी नव्हती पण आज आहे. मुलीची बुद्धिमत्ता, कौशल्य याचे मूल्य जाणणारे अपवादात्मक कुटुंबही असतात पण फार दुर्मिळ. सासरची नाती समंजस असतील तर ठीकच पण नसतील तर तिच्या विवाहित आयुष्यातील सुरुवातीची चार पाच वर्षे ताणतणाव यातच जातात आणि तिच्या प्रगतीलाही खीळ बसते. नाती गोंजारत बसू? की, ध्येयाकडे लक्ष देऊ? अशी दोलायमान परिस्थिती होते. 

   आधी सासरच्यांना माझ्याकडून काय हवे आहे हे तिने समजून घायला हवे. त्यात काहीवेळला खूपच माफक अपेक्षा असतात पण मुली त्याचा उगीचंच बाऊ करतात. म्हणजे उदाहरणं द्यायचं झालाच तर इतरांशी तुलना न करता त्यांना आपल्या संसारात समाधानाने वावरणारी सून हवी असते.दोघांचं आयुष्य बदलतं हे दोघांनी समजून घ्यायला हवं. सासू सासर्यांना मान मिळावा. मुठीत ठेवणारी मुलगी नाही तर आपलंस करणारी सून हवी असते. असं जर का ती मुलगी.. सून वागली आणि तिला तिच्या कुटुंबाची योग्य  साथ मिळाली तर मात्र ती संधीच सोन केल्यावाचून राहत नाही. सर्वाना अभिमाचं वाटेल असं ती वागते. आणि आपल्यातल्या कलागुणांनी सर्वांची मने जिंकून घेते. शेवटी तिला आयुष्यभर त्याच माणसांसोबत राहायचे असते आणि तेच तीच सर्वस्व असतात. 

मुलगा असला देव जरी, आशा कधीच फळत नाही.
सुख दुःखाच्या वादळात, तिची निष्ठा धळत नाही.
अशी सून सावली, सुख स्वप्न मनात असते 
सुनेविना न सावली, प्रत्येक घर उन्हात असते....

नाती टिकवायची असतील तर आपल्या भावना आणि अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त करा. मग बघा आयुष्य सुंदर होईल....जय भवानी 🚩🙏
    अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.

No comments:

Post a Comment