Thursday, 25 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  पाचवे-पुष्प.. विषय-प्रेयसी...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
पाचवे- पुष्प
विषय - प्रेयसी 
प्रेयसी हा शब्द प्रेमातील स्त्री साठी वापरला जातो. पण मुळात तो तिचा एक गुण आहे. "कश्यावरही प्रेम करणारी स्त्री म्हणजे प्रेयसी होय." मग ती व्यक्ती असो, वस्तू असो नाहीतरी कृती असो. मुळातच ती प्रेमळ, मायाळू, अती जीव लावणारी, जवळकी साधणारी, आपुलकी असणारी जिव्हाळा असणारी असते. प्रेयसी हा प्रत्येक स्त्री मधील एक सुंदर गुण आहे ज्याने ती प्रत्येकाला स्वतःशी बांधून ठेवते. थोडक्यात प्रेयसी म्हणजे प्रेम लावणारी स्त्री मग ती आई, पत्नी, मुलगी, बायको, आजी, मावशी, काकू, आत्या, मामी, सासू सून कुणीही असू शकते.

मग प्रेम म्हणजे काय?  तर प्रेम म्हणजे उत्साह, सळसळत  चैतन्य, दुसऱ्याला स्वीकारण्याची क्षमता, वासल्या, ममता, सकारात्मकता, शांत वृत्ती, एकाग्रता, आनंद, समाधान, निरागसता, निरपेक्षता, आत्म्याचा पवित्र हक्क, सुवर्ण पवित्र बंधन जे कर्तव्य आणि सत्याला जोडत. डोळ्यांना दिसत नाही पण आतून असतं.
प्रेम लाभो प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी....

प्रेम संशयमुक्त, त्यागयुक्त असतं 
समाजाच्या सहानुभूतीवर ते अवलंबून नसतं 
प्रेम कायम उमलत असतं उपजत असतं 
प्रेमाशिवाय जीवन स्मशान असतं 
फुलपाखराच फुलावर असतं 
आईच बाळावर असतं 
निसर्गाचा - माणसांवर असतं 
सावित्रीच - सत्यवानावर असतं 

हमे तुमसे प्यार कितना ये हम नाही जानते 
मगर जी नही सकते तुम्हारे बिना.....
हे गाणं प्रेमाच्या व्याखेत कधीच बसत नाही त्यात व्याकुळता आहे, वासना आहे, लोभ आहे, हव्यास आहे म्हणजे प्रेम नाही. 

आज काळ बदला आहे आणि प्रेमाची व्याख्याही खूप बदलत जातेय... आपण विचारच करू शकत नाही इतकी... एकदा एक राधा कृष्णाची फ्रेम बघून एका लेखिकेला एका छोटया मुलाने प्रश्न विचारला "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" त्या एकदम दचकल्या. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या त्यांच्या उत्तरावर शांत न बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!". "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" आणि नंतर त्यांनी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं.
मात्र त्या दिवसापासून त्यांना चैन पडत नव्हती. ज्यांनी 'भागवत' ग्रंथ वाचला, ऐकला आहे आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावर अभ्यास केला आहे अशा अनेक जणांना त्यांनी एक प्रश्न विचारला - "श्रीकृष्णांनी गोकुळ सोडले तेव्हा त्यांचे वय काय होते आणि रासक्रिडा ही त्याच्या आधीची ना?" यावर सगळ्यांकडून त्यांना असे उत्तर मिळाले की श्रीकृष्णांच आयुष्य साधारण १२० ते १२५ वर्षांचे होते. त्यातील ८ ते १० वर्षांचे असेपर्यंत ते गोकुळ आणि वृंदावन मध्ये होते. साधारण वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी कंसाचा वध केला. गोप-गोपींबरोबरची रासक्रिडा ही त्याच्या आधीचीच. रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला. ८व्या वर्षी गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी रासक्रिडा कधीही केली नाही"यावरून ही गोष्ट तर नक्की की श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर खेळायचे तेव्हा त्यांचं वय साधारण ८ पेक्षा कमी होतं आणि इतर गोपी या निश्चितच तरूणी होत्या. गोपींचं श्रीकृष्णवर खूप प्रेम होतं हे जे म्हणतात ते प्रेम 'भक्त-देव' या अर्थानी होतं.

आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' य नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून त्यांनी खात्रीनी सांगितले की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले  ते असे होते...

१. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.

२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.

३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!

4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते !!

एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेव्हा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -
'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '
आज अनेक नाटक, चित्रपट, गाणी, मालिका यात सर्रास दाखवलं जातं की श्रीकृष्ण बनलेला पुरूष (मोठ्या वयाचा) इतर गोपींची (त्याच्याच वयाच्या) छेड काढत आहे. वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे. श्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. व आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.

असो पण राधेसारखी प्रेयसी आपणा सर्वांच्या आयुष्यात नक्कीच येवो. जय भवानी 
     अनामिका (PMJ)
सौ. पुजा जहागीरदार.

No comments:

Post a Comment