Tuesday, 23 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा" तिसरे- पुष्प.. विषय-बहीण..

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
तिसरे पुष्प... 
विषय - बहीण 

अप्रतिम आणि अनोख नातं बहिणीचं. मग ते भावाशी असो वा बहिणीशी खूप सुंदर आणि अनोख. छोटी असो वा मोठी एकतरी बहीण हवीचं! आई वडिलांनखेरीचं जर कोणतं घट्ट नातं असेल तर ते बहिणीचं

आईची सावलीच जणू आणि मोठी असेल तर विचारूच नका तिचा तोरा, दरारा, आईबाबांची खूप लाडकी लेक तिच्याशिवाय घरातलं पान देखील हलत नाही. पण मोठी असूनही मोठं प्रेम अन मोठीच माया देणारी..

मनात ठेवण्याऐवजी मन मोकळं करण्याची..
हक्काची जागा म्हणजे बहीण....

कोणत्याही परिस्थितीत साथ देणारी, वाट दाखवणारी, पाठीशी " मी आहे" असं म्हणत खंभीरपणे उभी राहणारी. आपल्या गुणांचं तोंडभरून कौतुक करणारी. प्रसंगी चूक झालीच तर आईबाबांचा स्वतः ओरडा खाणारी. सांभाळून घेणारी, अवगुणांवर शिताफिने पांघरून घालणारी. बाजू घेऊन भांडायला सदैव तत्पर असणारी. "माझा भाऊ" अशी ओळख करून देतांना तिचा चेहरा अभिमानाने दावरलेले असतो. तीच अख्ख माहेर त्या एका भावात ऐकवटलेल असतं.

नेहमी भांडूनही कधीच न तुटणारं 
न बोलता सर्व काही समजून घेणारं 
एकमेकांची मनापासून काळजी घेणारं 
असं एकमेव नातं  भावा-बहिणीचं!....

लहानपणी सोबत सोबत असतो खूप भांडतो तिच्याशी तिची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू आपलीचं असते. पण मग लांब गेल्यावर तिची खरी माया आणि किंमत जाणवते. बहिणी-बहिणी असू देत नाहीतरी भाऊ-बहीण खरी किंमत दूर गेल्यावरच एकमेकांना कळू लागते. दूर गेल्यावर या नात्याचा गोडवा अधिक वाढू लागतो. म्हणूनच कदाचित आपल्या संस्कृतीत या सुंदर नात्यासाठी दोन खास सण आहेत. राखीपौर्णिमा आणि भाऊबीज ज्यात बहीण आपल्या भावाला आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवते आणि भावाला औक्षण करून त्याला दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना देवाजवळ करते. 
नवरा- बायको यांच्याखेरीच बहिणीचं हे एकच असं नातं आहे जे आपल्याला सदैव साथ देतं आयुष्यभराची.

कुठल्याही नात्यात नसेल एवढी ओढ आहे.
म्हणूनच बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे.

देवा हे सुंदर नातं प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे...
प्रत्येक भावाला आणि बहिणीला एकतरी बहीण असू दे...
आयुष्यभरासाठी......जय भवानी🙏🚩

     अनामिका (PMJ)
✍️सौ पुजा जहागीरदार.


No comments:

Post a Comment