सहावे - पुष्प
विषय - पत्नी
घराला घरपण आणणारी आणि स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने, घराला स्वर्गाहून सुंदर बनवणारी स्त्री..
पत्नी, बायको, कारभारीण, मालकीण, घरधणीन, दारा, भार्या, वल्लभा, धवा, प्राणप्रिया, कांता, सहधर्मचारिणी, अर्धांगी, अर्धांगिनी, सती, त्रिणीता, गृहिणी, प्रणेश्वरी अश्या एक ना अनेक नावांनी संबोधली जाणारी लग्न झालेली स्त्री म्हणजे पत्नी होय. घराची लक्ष्मी, पतीची अर्धांगिनी, आणि कुटुंबाचा आधार असलेली स्त्री होय जिचे आपल्या पतीसोबतच त्याच्या परिवाराशी आयुष्यभराचे नाते जोडले जाते आणि ते ती शेवट पर्यंत नेटानी निभावतेही.
हिंदू परंपरेत पत्नीला लक्ष्मी चे स्थान दिले जाते जी कुटुंबाचा आधार बनते आणि सर्वाना नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या येण्याने घराचे नंदनवन होते. पतीचे आईवडील, वडिलधारे, नातेवाईक यांचा ती नेहमी आदर करते नव्हे ते ती आपलें कर्तव्य समजते. घरातील सर्वांची आपुलकीने काळजी घेते ही तीला आपली जबाबदारी वाटते.
प्रेम त्याग आणि परोपकाराच दुसरं नाव म्हणजे पत्नी.
स्वतःच अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते ना अगदी तशीच सासरी विरघळून सासर गोड करणारी साखर म्हणजे पत्नी.
कौतुक आणि कृतज्ञतेच्या गावी जाण्याचं स्वप्न न पाहता आजन्म यंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी.
पदरी पडलेल्या आणि नंतर पतीरुपी प्रियंकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रेयसी म्हणजे पत्नी.
स्वतःच्या जीवनातून नवा जीव घडवणारी विश्वनिर्मिती म्हणजे पत्नी.
उंबठ्याबाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी.
माहेरी गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेक म्हणजे पत्नी.
हे नातं जरी जबाबदारी आणि कर्तव्य यात बांधलेलं असलं तरी जसजसा संसार होत जातो तसतस हे नातं अधिक अधिक खुलत जात आणि खूप सुंदर, गोड होत जात... त्यात खुपसाऱ्या गंमतीजमती ही होत जातात. हे थोडक्यात सांगणारी ही कविता
पत्नी जर नसेल तर, राजवाडा पण सुना आहे
पत्नीला नाव ठेवणं, हा गंभीर गुन्हा आहे...
वय कमी असूनसुद्धा, मुलगी समजदार असते
पत्नी पेक्षा पतीचे वय, म्हणून जास्त असते....
खरं पाहिलं तर तिच्याशिवाय, पानही हालत नाही
घरातलं कोणतच सुख पत्नीशिवाय खुलत नाही..
तिचा दोष काय तर म्हणे, चांगल्या सवयी लावते
कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवसरात्र धावते..
नोकरी अन पगाराशिवाय, पतीजवळ आहेचं काय
तुलनाच जर केली तर सांगा तुम्हाला येत काय..?
चिडत असेल अधून मधून, सहनशीलता संपल्यावर
तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुपल्यावर?
स्वच्छ, सुंदर पवित्र घर, पत्नीमुळेचं असतं
पती नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं..
पत्नीची टिंगल करून, फिदी फिदी हसू नका
तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर वन बसू नका...
असो थोडी गंमत या नात्याची, मनावर घेऊ नका....
असं सुंदर आणि गोड नातं तुमच्यापण आयुष्यात असू दे..
जय भवानी.....
अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.
No comments:
Post a Comment