नववे -पुष्प..
विषय-आजी...
खरंतर आजी या नात्याबद्दल विशेष असा अनुभव मला वैयक्तिक नाही. या वटवृक्षाच्या छायेत फारस आलेलं आता मला आठवत नाही. पण त्या नात्याचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया.आजी म्हणजे आईची आई किंवा वडिलांची आई. आजी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर ती कुटुंबातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आधारस्तंभ असते.तिचे प्रेम, तिच्या मायेची ऊब आणि तिने दिलेले मार्गदर्शन आयुष्याला एक नवी दिशा देते. घरात आजीच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते, जी सर्व सदस्यांना एकत्र बांधून ठेवते. आजी म्हणजे कुटुंबाचा अनमोल खजिना. तिचा बटवा म्हणजे..काहीही झालं तरी डॉक्टर ची गरज नाही. तिची कुस म्हणजे दुसरा स्वर्गाच जणू..
नातवाचे रुसवे फुगवे आपल्या जादुई प्रेमाने चुटकी सरशी नाहीसे करणारी व्यक्ती म्हणजे आजी होय.
आजीचे नातवावरचे प्रेम असे म्हटले की संदीप खरे सरांच्या ओळी आठवतात..
काढल्या खस्ता केलेत कष्ट
'तू' म्हणजे त्या सगळ्याची
शेवट गोड असलेली गोष्ट..
नुसतंच कथा पुराण झालं
देव काही दिसला नाही
कुशीत येतो तेव्हा कळतं
कृष्ण काही वेगळा नाही....
इतकं असीम प्रेम फक्त हीच माऊली करू शकते....
आजीच्या अनुभवांतून आणि ज्ञानामुळे नेहमीच योग्य सल्ला मिळतो. ती आपसूक आपल्याला मोठ्यांचा आदर करायला आणि आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कष्ट करायला शिकवते. तिच्याकडून शिकलेले संस्कार आणि तिने दिलेले संस्कार हे आपल्यासाठी खूप अनमोल असतात. आजीच्या कथेमुळे आणि तिच्या आठवणींमुळे कुटुंबाच्या भूतकाळाची आणि परंपरेची जाणीव होते.
तिच्यामुळेच कुटुंबाचे महत्त्व कळले. आजीचा स्पर्श, तिचे आशीर्वाद आणि तिचे प्रेम हे सर्वात मोठे धन असते ते सर्वांच्या वाटेला येतेचं असे नाही. आजोळची आठवण म्हटली की आता कोणाला सहज सांगता येत नाही जसे आपले आईबाबा सांगतात.
वेचीतं अनुभव पिढ्यांचे तिन्ही
अंधुक डोळे गातात गाणी
हट्ट सारे बाटव्यात तिच्या
प्रत्येकासाठी वेगळी नाणी..
लहानां सोबत होते लहान
मोठ्यानं सोबत अगदी मोठी
हास्यात तिच्या विरघळतो काळ
मनात तिच्या हजार मोती..
थरथर पायी गाठी देऊळ
घेत नाव देवाचे ओठी
दुःख टाळण्या आजी माझी
सांज सभेला वाचे पोथी....
आपण सर्व देवीजवळ प्रार्थना करूया हे इतकं सुंदर नातं सर्वांच्या आयुष्यात नक्कीच असू दे.....
जय भवानी....
अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.