Wednesday, 27 September 2017

Thank You बाबा .......

Thank You बाबा .......

देताना जन्म आईने सोसावी कळ
मरण सोपं व्हावं म्हणून बापाची आयुष्यभर धडपड
असेच धडपड करणारे बाबा प्रेमळ आई...... आई बाबा म्हणल, की तुमच्या माझ्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय नुसता शब्द उच्चारला तरी प्रेम, माया, ममता, करुणा, शिस्त, कठोरता, नियमबद्धता, अश्या कितीतरी भावनांचा मिलाप म्हणजे आई -बाबा त्यांच्याविषयी बोलतांना वेळ शब्द इतकंच नाही तर भाषाही अपुरी पडेल. पण आज मी बाबांविषयी बोलणार आहे हो बाबा खरंतर तुमच्याशी बोलणार आहे. काही वर्षापूर्वी मी कॉलेजला बसले असतांना एक मैत्रीण अचानक माझ्या समोर आली आणि मला म्हणाली " पूजा आता आपलं कॉलेज संपेल अग, मला एक कविता लिहून हवी होती तुझ्याकडून देशील ?
मी नेहमीप्रमाणे कुठलाच विचार न करता होकार दिला आणि चटकन तिला विषय विचारला तीन हळूच सांगितलं "बाबा"
कोणतीही मुलगी बाबांविषयी बोलतांना लिहितांना हळवी नाही झाली तर विचारा?
तशी मीही झालेच प्रिंटाऊटच पाठकोर पेज घेतलं पेन होताच हातात जे मनात येईल ते लिहीत गेले

बाबा म्हणजे शिस्त- प्रत्येक वेळी त्यांच्या कृतीतून जाणवणारी.
बाबा म्हणजे- न दिसणार न समजणार असीम प्रेम मी आजारी पडल्यावर त्यांच्या डोळ्यात जाणवणार.
बाबा म्हणजे- विश्वास मुलीला मुलाप्रमाणे वाढवणारा.
बाबा म्हणजे- व्यवस्थितपणा पुस्तकाला कव्हर लावण्यापासून तर बेडवर चादर सुरकुत्या न पडू देता कशी घालावी ते सांगणारा.
बाबा म्हणजे- आदरयुक्त भीती नुसत्या त्यांच्या घराकडे येणाऱ्या बुटांच्या आवाजानेच, पुस्तक घेऊन बसवणारी.
बाबा म्हणजे- सळसळत चैतन्य कधीही कोणत्याच संकटाला न घाबरणार कधीही न डगमगणार.
बाबा म्हणजे- स्वयंसेवक स्वतःच्या स्वार्थाकडे न पाहता समाजहितासाठी जगणारे झटणारे आणि आम्हालाही तशीच सवय लावणारे उत्तम स्वयंसेवक

मी लिहीत होते आणि पेजेस संपत होती. केवळ बाबा म्हणजे या पुढील वाक्यानेच अवघी तीन-चार पेजेस संपली होती.  मग मैत्रिणीला कविता द्याची आठवण झाली आणि जे काही लिहिलं ते असं...  प्रथम माझ्या बाबांसाठी, आणि नंतर जगातल्या सर्वांच्या बाबांसाठी.....

बाबा आज तुमच्याशी थोडं बोलायचं ।।
बाबा आज तुमच्याशी थोडं बोलायचं ।।
खोटं नाही तर सगळं खरं खरं सांगायचंय
आजवर मी कधीच नाही बोलले तुम्हाला
तो प्रत्येक शब्द मला आज सांगायचाय
बाबा आज तुमच्याशी थोडं बोलायचं ।।१।।

बाबा मी आईच्या कुशीत झोपायचे, पण मऊ भात तुम्हीच भरवायचे
दिवसभर आई खेळवायची पण बाबा खेळणी तर तुम्हीच आणून दिलेली असायची
त्या खेळण्यातील एक एक खेळणं बाबा आजही मला आठवतंय
म्हणून बाबा आज थोडं तुमच्याशी बोलायचं।।२।।

बाबा खूप मेहनत केलीत तुम्ही आजपयेंतच्या आयुष्यात
प्रत्येकासाठी सुखाची काळजी प्रत्येकवेळी केलीत तुम्ही
तुम्ही केलेल्या कष्टाचे मोजमाप बाबा कधीच नाही हो होणार
पण तुम्ही दिलेल्या संस्कारांची जाण बाबा आम्ही कधीच नाही विसरणार
त्याच संस्कारांची जाण ठेऊन बाबा आज थोडं बोलायचं ।।३।।

तुमची कर्तव्य पार पाडण्यात बाबा, तुम्ही कधीच नाही हो चुकलात
हो पण त्यावेळी कदाचित आम्हाला वेळ देऊ नाही शकलात
हरकत नाही आता तुम्हाला कामातून वेळ मिळणार आहे
आणि म्हणून बाबा, मी तुमच्याशी खूप खूप बोलणार आहे ।।४।।

पण बाबा तुम्हाला एक विचारू, असं का हो असत
मुलीलाच एक बाबा सोडून दुसऱ्या बाबाला बाबा का हो म्हणावं लागत?
ते दुसरे बाबा माझ्या आयुष्यात येण्याआधीच मला तुमच्याशी खूप बोलायचं
म्हणून बाबा आज तुमच्याशी खूप खूप बोलायचं ।।५।।

बाबा मी तुम्हाला वचन देते, तुमचे संस्कार मी कधीच नाही विसरणार
तुमची मान खाली जाईल, असं काम मी कधीच नाही करणार
विश्वास ठेवा बाबा, तुमची मुलगी कधीच नाही बदलणार
म्हणू बाबा या नंतरचे माझे दिवस, तुमच्या अन माझ्यासाठीचे असणार आहे
अन त्यासाठी मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे असणार आहेत
आशीर्वाद हवे असणार आहेत ।।६।।

पेज संपलं आणि मी कविताही संपवली ओले झालेले माझे डोळे हळूच कोणालाही न दिसता पुसून काढले कविता परत एकदा वाचली मन भरून पावलं
खरंच माझे बाबा हिरो आहेत माझ्यासाठी प्रत्येकाचे असावेत बाबा इतकं करतात आपल्यासाठी पण आपण साधं थँक्यू देखील म्हणत नाही त्यांना ? मी घरी आले बाबांचा हसरा चेहरा पाहिला आणि मनापासून निघणारा थँक्यू शब्ददेखील तोडकामोडका वाटला
बाबा तुम्ही लेख वाचत असाल तर एक सांगेन Thank you बाबा Thank You So Much खरंच बाबा बाप माणूस असतो जगातल्या सर्वच बाबांना मनापासून धन्यवाद...... 

अनामिक (PMJ)

2 comments: