Monday, 25 September 2017

खोड्या करायला वय हवय कश्याला......

 खोड्या करायला वय हवय कश्याला......
    खोड्या करायला वय हवाय कश्याला असं म्हणणारे लोक फार कमी मिळतात आजकाल तुमचं वय काय हो? असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते? मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे... काही तरीच काय? पण माझे ऐका, आता मान्य कराचच हे. तुम्ही कितीही म्हणालात तरी हे अगदी खरंय. तेच लहान मूल ज्याला कधी कधी फार खोड्या कराव्याशा वाटतात.

   कित्येकदा मला असे वाटलंय की एकदा तरी खूप जोरात ओरडून आरोळ्या ठोकाव्यात. उगाचच... काही कारण नसताना. का कुणास ठाऊक, पण वाटते. खूप मोठ्याने गाणं म्हणावं मला आवडेल तेवढं आणि तितका वेळ सध्या हि हौस मी माझ्या खोलीतच भागवून घेते ती पण खूप हळू आवाजात. मला आठवतंय दुपारच्यावेळी आई च्या चोरून बदाम गल्लीतले खुपसारे बदाम तोडायचे अगदी कच्चेसुद्धा आणि चोरी पकडल्या गेल्यावर मी नाही म्हणतं उगाचच इकडे तिकडे सैरावैरा धावत सुटायचे. आहे ना गंमत?

   कधी आपल्याला वाटतेच ना रस्त्यात उगाचच एखाद्या गाडीला ’कट’ मारावा. अचानक कुणी मधे आले आणि मूड चांगला असला की आपण ओ काका, अंग ए मावशी जरा समोर पाहा, ओ अप्पा जरा हळू असे खोडकर शब्द वापरतो. चौकातल्या पोलीसभाऊंची ची ढेरी फारच गरगरीत दिसते आणि त्यावर हळूच हात फिरवावासा वाटतो. कुणी तंबाखू चोळत उभा असला तर खालून हाताला धक्का मारावासा वाटतो.

   अजूनही किती तरी वेळा आपण कुणी बसायच्या आधी त्याची खुर्ची हळूच ओढून बाजूला करतो. खूप दिवसांनी कुणाला भेटून सरप्राईज द्यायचे असेल तर मागून जाऊन त्याचे/तिचे डोळे गच्च झाकतो अथवा "भॉ" करतो. कुणाला खाली बसताना पाहिले की च्युइंगम ठेवावेसे वाटते ना तुम्हांला.

   मी पाहिलंय कॉलेजला असताना खूप वेळा बसमध्ये सीटच्या मधून खाली येणाऱ्या मुलींच्या ओढणीने काही आगाऊ मूल स्वतःचे बूट पुसण्याचे उद्योग करायचे. किंवा शेजारी उभा असलेला माणूस तिकडे तोंड करुन उभा असेल तर हळूच त्याच्या शर्टच्या कापडाची क्वालिटी पाहून घ्यायचे.

   कधी मनात आले की आपण उगाच हॉटेलमध्ये टिश्यू पेपरचे विमान, होडी असले काही बाही बनवतो आणि मग वेटर आपल्याकडे ’जरा हाललंय’ अशा नजरेने पाहतो. काही लोकांना कितीही गंभीर सिनेमा असला तरी पॉपकॉर्नची पिशवी फोडल्याशिवाय पैसे वसूल झाल्यासारखे वाटतच नाही. चित्रपट संपल्यावर कॉरिडॉरमधून बाहेर पडताना लोक इतके गप्प गप्प का असतात हे तर मला अजूनही कोडे उलगडले नाही. अशा वेळी मला ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी काडी लावून खो-खो हसावेसे वाटते. बागेत गेले की कधी उगाचच झोक्यावर बसावेसे वाटते किंबहुना अशा लोकांसाठीच ’खेळणी फक्त लहान मुलांसाठी आहेत’ असे फलक लावलेले असावेत. मग आपण हिरवळीवर लोळून हौस पूर्ण करुन घेतो. बागेतला फुगेवाला फुगा फुगवत असताना त्याला गुपचुप टाचणी मारावीशी वाटते. माझी आईतर नवीन फुगे आणून स्वतः ते फुगवून फोडते खूप मजा येते तिला त्यात.

   मानवाला सततच्या आपल्या या बालसवयींची काळजी खूप प्राचीन काळापासून पडली असावी. म्हणूनच आपल्या लग्नात नवऱ्या मुलाचे कान पिळणे, बूट पळवणे, हळद खेळणे, वरमाईच्या डोक्यावर कुरड्या फोडणे  असे प्रकार शास्त्रसंमत आहेत. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सो कॉल्ड पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या गेममध्ये पण थोडा का होईना बालिशपणाचा अंश असतो. अगदी उच्च सुपरब्रॅंडच्या जाहिराती सुद्धा कित्येकदा या बालिशपणाभोवतीच घुटमळत असतात. किंबहुना अशाच जाहिराती खूप दिवस लक्षात राहतात. विश्वास नसेल तर करते आणि मनात म्हणते आठवा. टेलिव्हिजन क्षेत्राने तर आपली ही गोष्ट केव्हाच ओळखली आहे, म्हणून तर आजकाल कित्येक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी लहान मुलांवर टाकली आहे.

   लहान मुलांमध्येच आपला जीव रमतो ना अजूनही? जगरहाटीच्या रॅटरेसमधून घरी गेल्यावर आपण घरात किंवा शेजारी लहान मूल असेल तर त्याच्या बरोबर मूल होऊन खेळतोच ना? मी तरी खेळते, आणि मला लहान व्हावेसे वाटते. पण त्या आमच्या शेजारच्या लहान मुलीला  मोठे व्हावेसे वाटते. मला ऑफिसला जाताना विचारते, "ताई मला तुझ्यासारखं होता येईल का?" मी स्वतःशीच हसते. तिला बाय करते.  आणि मनात म्हणते "मला तुझ्यासारखं जगता येईल का?" मला सांगा कितीही आपण मोठे झालो तरी आपल्या जगण्याला त्या बालपणाची सर येईल का ? आपत्याला लागलेली लहापणीची कोणतीतरी सवय मरेस्तोवर जाईल का? चॅनल सर्फ करताना कार्टून फिल्म्स दिसल्यावर आपण थबकतोच ना? किती तरी वेळा कुणाशी तरी मिस कॉलचा खेळ खेळत बसतो.  तोही या पोरकटपणापायीच. मी तर आजवर अशा अगणित खोड्या केल्या आहेत, अजूनही करत आहे आणि पुढेही करत राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
आपण करता का हो अशा खोड्या? आणि करत असाल तर काय करता ते नक्की कळवा....
अनामिक (PMJ)

No comments:

Post a Comment