Thursday, 28 September 2017

सप्तसूर .........

  सप्तसूर  .........
    एक धागा सुखाचा', 'एकवार पंखावरूनी', 'जीवनात ही घडी', 'ऐरणीच्या देवा तुला', 'मानसीचा चित्रकार', 'सूर तेच छेडीता', 'हे चिंचेचे झाड', 'धुंदी कळ्यांना', 'स्वप्नात रंगले मी', 'मला लागली कुणाची उचकी', 'गोमू संगतीनं', 'फिटे अंधाराचे जाळे' ही आणि याहीपेक्षा खूप खुपसारी सुंदर सुंदर गाणी आपण ऐकतो, म्हणतो आणि जीवनाचा खूप आनंद घेतो पण हि गाणी ज्या सात सुरांतून आलीत त्या भारतीय संगीतात सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत आपण कधीही विचार केलाय? संगीतात सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं 'केसराचा पाऊस' ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं .....

    मोर षड्ज सुरात तर चातक ऋषभात ... बकरा गांघार तर कोकीळ पंचम बोलतो. बेडूक व क्रौंच मध्यम, धैवत तर हत्ती नाकातून निषाद स्वराचं उच्चारण करतो .... असा त्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे ...
सृष्टीतील पशु पक्ष्यांकडूनच माणसाला सूर अवगत झाला असावा …. आम्रमंजिरी पाहून कुहूकुहू करणारा कोकिळ , ढगांना पाहून आनंदून जाणारा पपीहरा ह्यांच्यापासून तो आपल्या भावना सुरांत व्यक्त करायला शिकला असावा …

" कोकिळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले "
" अम्बुवा कि डाली पे बोले रे कोयलिया "
" बोले रे पपीहरा, पपीहरा "
" बदल घिर घिर आये , पापी पपीहरा गये "
" सा रे ग म प ध नी सा "

    सुरांची दुनिया. सातंच सूर .... तरीही केवढं प्रचंड सामर्थ्य आहे या सप्तसुरांमध्ये. प्रत्येक सुराचा बाज वेगळा, पोत वेगळा. पण जे काही आहे ते सारं फक्त जणु ह्या सात सुरांमध्येच एकवटलंय. अवघं ब्रह्मांडच समावलंय ह्या सप्तस्वरांमध्ये.
Sound is a form of energy आणि म्हणुनच हे सूर जेव्हा संगीत सम्राट तानसेनच्या कंठातून येतात तेव्हा विझलेले दिवे देखील परत पेटतात.
"झगमग झगमग दिया जलाओ "
तानसेनचा मल्हार राग ऐकायला आकाशात कृष्णमेघांची दाटी होते आणि भारावुन जावुन ते अवेळी बरसु लागतात.
" गरजत बरसत सावन आयो रे "

    असा हा सारा ह्या सात सुरांचा प्रभाव. कधी सूर आश्वासक बनुन आपल्या मनाला आधार देतात ... मनाचं मरगळलेपण घालवुन नवचैतन्य निर्माण करतात ... जेव्हा एखादीचं मन उदास, निराश असतं तेव्हा तिची मैत्रीण तिची समजुत काढताना तिला सांगते
" जब दिल को सतावे गम ,
तु छेड सखी सरगम ,
बडा जोर है सात सुरों में
बहते आंसु जाते हैं थम
तु छेड सखी सरगम "

हे सूर जेव्हा आतून, अगदी आतून येतात तेव्हा मनाची तार छेडतात …. आणि अश्रूंच्या रूपाने डोळ्यांवाटे ओघळतात
" है सबसे मधुर वो गीत जिसे
हम दर्द के सूर में गाते है
जब हद से गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं "

मनातील प्रत्येक भावना सुरांवाटे व्यक्त होत असते ….
कधी सूर छेडले असता छानसे गीत उमटते
" सूर तेच छेडिता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे "

सूर जेव्हा गीतांशी हात मिळवणी करतात तेव्हा जन्मतं संगीत.
"तेरे सूर और मेरे गीत
दोनों मिलकर बनेगी प्रीत"

गीत मनाचे दरवाजे उघडतं तर संगीत सरळ आत्म्यालाच जावुन भिडतं ....
आत्म्याला आत्म्याची ओळख पटते आणि दोघांचे सुर जुळतात. जीवाशिवाचं मिलन होतं ...
" तु जो मेरे सूर में सूर मिलाये
तो जिंदगी हो जाये सफल "

आणि जिथे सूर जुळतात तिथे मग भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही ….
" सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले "

    कधी एखाद्या एकट्या संध्याकाळी, तिन्हीसांजेला अवचित ऐकू आलेली एखादी सुरावट त्या साऱ्या आठवणी जिवंत करतात , दोघांना एकत्र पाहून कुजबुजणाऱ्या वेली, खाणाखुणा करणारी पाने, सारे सारे आता स्तब्ध झालेले असतात … तारे उदास असतात अन वारा देखील उसासे देत असतो
" स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे "

पण जर ह्याच सुरांनी आपल्याशी कायमची फारकत घ्यायचं ठरवलं तर ? जगण्याचा उद्देशच नाहीसा होईल . आयुष्य भकास , अर्थहीन होईल ...
" सुर ना सजे क्या गाऊ मैं
सुर के बीना जीवन सुना"

अशी गत होईल आपली.
सूर आपल्याला आयुष्य रसिकतेने जगायला शिकवतात, कल्पनेची भरारी घ्यायला शिकवतात , ईश्वराच्या सान्निध्यात घेवुन जातात ….
" संगीत मन को पंख लगाये
गीतों से रिमझिम रस बरसाये
स्वर की साघना परमेश्वर की" ......

ह्या सप्तस्वरांनी आपलं जिवन किती समृद्ध केलंय नाही. जो सुरांच्या दुनियेत रमतो, जगतो तोच 'त्याला' खर्‍या अर्थाने जाणतो. अमृत प्राप्ती साठी फार काही नाही फक्त सुरांच्या सान्निध्यात राहणं गरजेच आहे ….


No comments:

Post a Comment