Thursday 24 May 2018

नात्यांना वेळ देऊ या ...

काही दिवसापूर्वीच आपण
'यशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग' हा लेख वाचला आहे त्याच आशयाने हा लेख ...
नात्यांना वेळ देऊ या ...
"कदर करना सिख लो.
ना जिंदगी वापस आती है...
ना जिंदगी में आये हुये लोग....
कई बार तबियत दवा लेने से नहीं,
हाल पूछने से भी ठीक हो जाती है"

हो पण तुम्ही कसे आहात हे विचारायला थोडा वेळ द्यावा लागेल ना? पण काय करणार.. तो वेळच नाही हल्ली कोणाकडे, कोणाशी साधी ओळख करायची म्हटलं तरी Whats app, Facebook चा साहारा घेणारे आपण कधीकधी Messages ला reply सुधा देवू शकत नाही. सरळ सांगुन मोकळे होतो busy now ज्या तुमच्या जिवाभावाच्या कुटुंबासाठी तुम्ही कमावता, दिवस रात्र कष्ट करता, त्यानांच Messages करता busy now .....? कशी जागा निर्माण कराल आपल्याविषयी आपल्याच माणसात ...?

‘जगह छिनी नही, बनाई जाती है....’. कित्ती खरेय हे? विचार केला तर ध्यानात येईल आपल्या. लहानपणी धृव बाळाची गोष्ट ऐकत असताना फार रडू येई. सावत्र आईने वडिलांच्या मांडीवरून खाली खेचलं का असेना, मात्र धृव बाळाचे वडील काहीच का बोलले नाहीत? हा प्रश्न कित्येक दिवस मनात होताच. मात्र त्यानंतर त्याने स्वत:साठी मिळवलेलं अढळपद जास्त आकर्षित करू लागलं. मनात या जागे विषयी काय काय सुरू राहिले विचार..!

समाजशास्त्रातही अर्जित आणि अर्पित दर्जा हे दोन प्रकार असतातच. मात्र मिळालेला दर्जा राखून ठेवणे हेही महत्वाचे आहे. आपण आपल्या हाताने एखादी जागा गमावून बसतो आणि मग त्याबद्दल हळहळत राहतो. जागा मग ते एखादे पद असू देत किंवा कुणाच्या मनात असू देत, ती तयार करायला फार वेळ लागतो. मात्र घालवायला काही क्षणच पुरतात. प्रश्न असतो विश्वसनीयतेचा. गंमत अशी असते की, आपण जे निकष सामान्य नात्यांना लावतो तेच निकष लोकप्रतीनिधीना मात्र लावत नाही. असो. आपण सारेच सुज्ञ आहोत यावर बोलूच नये.

नाती एक तर रुजत नाहीत सहज..आणि रुजली तरी त्यांना नेमाने अवधानाचे खत पाणी घालावेच लागते. ते नाही मिळाले तर फार काळ तग धरणार नाहीतच ती. भावनांचा ओलावा, अवधानाचे खत आणि नेमाने विचारपूस .....! इतक्या सध्या गोष्टी आहेत. आपण बरेचदा ते करू शकत नाही. आपण हौसेने बाग राखतो, तिच्याकडे लक्ष देतो. निगराणी करतो. मात्र त्याच हौसेने; जिव्हाळ्याने माणूस राखू शकत नाही. हे काय असावे बरे? मालिकेचा एखादा भाग सुटला तर रिपीट टेलिकास्ट बघून अपडेट राहणारे आपण एखादा प्रसंग मिस झाला तर त्याच ओढीने पुन्हा जाऊन भेट घेत नाही आपल्याच लोकांची. जरा अनुत्साहाच दाखवतो. यातून काय सिद्ध होत असते याची कल्पना करता येईलच आपल्याला!
जग फार जवळ येतंय. ग्लोबलायझेशनच्या गप्पा मारतोय आपण मात्र माणसाला असलेली आणि वाढलेली संवादाची ओढ..गरज मात्र पुरवू शकलो नाहीये. प्राणांतिक ओढीने जीव पाखडून कुठे माया लावावी आणि आणि तिची जाणीव किंवा मोलच कळू नये समोरच्याला....हे दुर्दैवच.

अशा वेळी खरेच वाटते की, आपले आपण एक अढळपद तयार करावे जिथवर कोणीच पोचणार नाही आपल्याला ढकलून द्यायला...! जिवंत माणसे म्हणजे मोबाइल नाहीत. किंवा ऑपरेटिंग सिस्टिमही नाहीत की नवीन इंट्रोड्यूस झाल्यावर जुने टाकून द्यायला. हे लवकर कळले नाही तर एकटे रहायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. फार काही करावं लागत नाहीच. मात्र एकदा माणूस निघून गेलं की परत कितीही हाका मारा ते परतणार नाही. तेव्हा आपली माणसे जपूया. त्यांची काळजी घेऊ या..तेव्हा नात्यांना वेळ द्या! आपल्या लोकांना वेळ द्या.....!
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment