Thursday, 22 October 2026

'नारी तू नारायणी' पाचवे पुष्प.... 🙏


शील चारित्र्य की होवे आभा प्रसृत पावनी।
अग्निकुण्ड इसीसे है प्रदीप्त धृत हाथ में।।५।।
त्रिशूल है लिया मातर् दुष्ट संहार हेतु से।
खड्ग देवि लिया है जो सज्जनत्राण बुद्धि से।।६।।

देवीच्या हातात असलेला प्रज्वलित अग्निपात्र (होमकुंड) या गोष्टीची प्रेरणा देतो की, स्त्रियांच्या पवित्र चारित्र्याची कीर्ती जगात सर्वत्र पसरत राहावी. ज्याप्रमाणे अग्नी तपश्चर्येद्वारे प्रकाश प्रदान करतो, त्याचप्रमाणे स्त्रियांनाही तपश्चर्या करावी लागते. अग्नीमध्ये शुद्ध करण्याची आणि प्रकाश देण्याची क्षमता असते; स्त्रियांचे चारित्र्यही अशाच तपश्चर्येने युक्त असावे. याव्यतिरिक्त, अग्निपात्राचे चार कोपरे हे मानवी जीवनातील चार पुरुषार्थांचे—धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष—प्रतीक आहेत. ते आपल्याला जीवनातील चार अवस्थांचीही आठवण करून देतात, ज्या आहेत: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.यज्ञकुंडात अर्पण केल्या जाणाऱ्या पवित्र आहुती केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर आपल्या मनालाही शुद्ध करतात. आहुती देताना 'स्वाहा' हा शब्द उच्चारला जातो, ज्यातून आत्मसमर्पणाची भावना जागृत होते. प्रत्येक आहुतीनंतर 'इदं न मम' (हे माझे नाही) असे म्हटले जाते. यज्ञकुंड 'महिलांना ' (महिला /भक्तांना) या जाणीवेने प्रेरित करतो की, आपल्याकडे जे काही आहे, ते सर्व राष्ट्राचे आहे, स्वतःचे नाही. अग्नीचा नैसर्गिक प्रवास ऊर्ध्वगामी असतो; त्याच्या वर उठणाऱ्या ज्वाळा सेविकांना सदैव उच्च ध्येयांच्या दिशेने प्रयत्नशील राहण्यास आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यास प्रोत्साहित करतात.

देवी दुष्टांचा विनाश करण्यासाठी त्रिशूळ आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी तलवार धारण करते. जरी माता ही करुणा आणि वात्सल्याचे मूर्तिमंत रूप असली, तरी ती दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सत्पुरुषांचे रक्षण करण्यासाठी शस्त्रेही धारण करते. जेव्हा जेव्हा दुष्टांनी अन्यायकारक कृत्ये केली आहेत, तेव्हा देवीने त्यांचा विनाश करण्यासाठी विविध रूपे धारण केली आहेत; हे तिच्या भक्तांसाठी एक प्रेरणास्थान आहे, जेणेकरून ते स्वतःला सक्षम बनवू शकतील आणि अन्यायाविरुद्ध व चुकीच्या कृत्यांविरुद्ध ठामपणे उभे राहू शकतील.
धन्यवाद 🙏


Monday, 19 October 2026

'नारी तू नारायणी' चतुर्थ पुष्प.... 🙏


गीता प्रदीप जो देता विश्व को ज्ञानचेतना।
कर में स्थित है तेरे स्नेहले अम्ब मंगले।।४।।

ज्ञान माणसाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्याची दृष्टी देते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान असणे हा पाया मानला जातो.
कितीही मोठे पद किंवा जबाबदारी असली, तरी जर व्यक्ती कर्तव्यदक्ष नसेल, तर त्या कामाला काही अर्थ उरत नाही. समाज आणि प्रशासकीय व्यवस्थेत शिस्त टिकवून ठेवण्यासाठी कर्तव्य दक्षता अत्यंत आवश्यक आहे.

कर्तव्याशिवाय ज्ञान व्यर्थ: जर तुमच्याकडे अफाट ज्ञान असेल, पण ते योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरण्याची सक्रियता (कर्तव्य दक्षता) नसेल, तर त्या ज्ञानाचा समाजाला किंवा स्वतःला काहीही उपयोग होत नाही.

थोडक्यात सांगायचे तर, जेव्हा 'ज्ञान' (काय आणि कसे करायचे याची समज) आणि 'कर्तव्य दक्षता' (ते काम सर्वोत्तम पद्धतीने करण्याची निष्ठा) एकत्र येतात, तेव्हाच व्यक्तीच्या हातून आदर्श आणि यशस्वी कार्य घडते. 

हे माते—मातृप्रेम, वात्सल्य आणि परोपकारी भावनेने परिपूर्ण असलेल्या माते—तुमच्या हातात असलेला 'गीता'रूपी दिवा ज्ञान आणि चैतन्याच्या प्रकाशाने संपूर्ण जगाला उजळून टाकते. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या ज्ञानाद्वारे, रणांगणावर मोहाने ग्रासलेल्या अर्जुनाला मार्गदर्शन केले आणि त्याला फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्यपथावर चालण्याची प्रेरणा दिली, त्याचप्रमाणे सर्व महिलांना देखील आपापल्या कर्तव्यपथावर दृढ राहोत....

Monday, 12 October 2026

'नारी तू नारायणी' तृतीय पुष्प.... 🙏

देवीचे रूप मोहक आणि सुंदर वाटत असले तरी एक गोष्ट खूप महत्वाची ती म्हणजे आपली प्रत्येक देवी देवता ही शस्त्र धारण करणारी आहे. तसेच आपली देवी अष्टभुजा ही देखील आपल्या आठही हातात काही तरी धारण करून आहे त्याच विषयी आपण आता पुढील श्लोकात जाणून घेणार आहोत....

*सुगंधित सुवर्णाभ, सुकोमल सरोज जो, हस्त में धृत देता है पाठ निर्लेप तुम बनो*

कमळ पुष्प जे देवीच्या हातात आहे हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. चिखलात रुजूनही अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि सुगंधी राहण्याचे त्याचे वैशिष्ट्य मानवी जीवनाला मोठी प्रेरणा देते.तशीच एक स्त्री असावी अशीच या मागे शिकवण असावी 

कमळाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. चिखलात आणि साचलेल्या पाण्यात असूनही त्याच्या पाकळ्यांवर चिखल किंवा पाण्याचा एकही थेंब रेंगाळत नाही. त्यामुळे त्याला स्वच्छता आणि अनासक्तीचे प्रतीक मानले जाते.असेच प्रत्येक स्त्री ने वागावे अशीच या मागे शिकवण असावी.

कमळाचा प्रभाव म्हणजे कमळाच्या पानांवर आणि पाकळ्यांवर निसर्गतःच एक मेणासारखा थर असतो. यामुळे पाणी त्यावर न थांबता मोत्यासारखे घसरून जाते. विज्ञानात या गुणधर्माला 'लॉट्स इफेक्ट' म्हणतात.तसेच प्रत्येक स्त्री चे आचरण असावे कोणतीही गोष्ट मनात धरून न ठेवला तिने खुळ्या मनाने जगावे 

कमळ ज्ञानदेवी सरस्वती आणि धनलक्ष्मी यांचे ते आसन आहे. असे हे फुल देवीने हातात धारण केलेले आहे ज्याचे खूप औषधी गुणधर्म हीं आहेत आश्या या फुलाकडून आपण काहीतरी आचरणीय शिकवण घ्यावी आशीच या मागची भावांना असावी म्हणून हे फुल देवीने आपल्या हातात धारण केलेले आहे 

देवीच्या हातात असलेले, सोनेरी तेज पसरवणारे सुगंधी कमळ अनासक्तीची प्रेरणा देते; कमळ चिखलात जन्म घेत असले तरी त्याचा सुगंध आणि सौंदर्य अबाधित राहते. त्याचप्रमाणे, महिला काळजीवाहकांनी (केअरगिव्हर्स) समाजातील दोषांचा किंवा अशुद्धतेचा आपल्यावर परिणाम होऊ न देता, कमळाप्रमाणे अनासक्त वृत्ती बाळगावी आणि त्याच वेळी आपल्या व्यक्तिमत्त्वातून सोनेरी तेजाचे वलय निर्माण करावे. कमळ हे सौम्यतेचेही प्रतीक आहे आणि ते काळजीवाहकांना सौम्य स्वभाव जोपासण्याची प्रेरणा देते—कारण स्त्रीचा सौम्य स्वभावच कौटुंबिक संबंधांचा भक्कम पाया असतो. 
नारी ते नारायणी प्रवासात हीच ती आजची शिकवण ... धन्यवाद 🙏
✍️सौ पुजा जहागीरदार (PMJ)



Sunday, 11 October 2026

'नारी तू नारायणी' प्रथम पुष्प.... 🙏नमस्कार..शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा...दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....🙏


नारी ही कुटुंब, समाज आणि संसाराची पालनपोषण करणारी शक्ती आहे. म्हणूनच आपल्या सांस्कृतित 'स्त्री' ला शक्तीचे प्रतीक मानले जाते. तिचा नेहमीच आदर आणि सन्मान केला जातो  स्त्रीच्या बुद्धिमत्तेला, ज्ञानाला आणि तिच्या त्यागाला उच्च स्थान दिले जाते.नारी तू फक्त एक सामान्य नारी नाहीस तर तुझ्यात अपार शक्ती आहे. "हे स्त्री (नारी), तू थेट श्रीविष्णूची किंवा ईश्वराची शक्ती (नारायणी) आहेस" शारदीय नवरात्री पूजन हे त्याचाच एक भाग आहे.
पण नारी ते नारायणी हा प्रवास खूप सोपा नाही. तो कसा करावा, कसा असावा, हे सांगणारी देखील स्त्री शक्ती देवीच आहे. तिच्या रूपातूनच ती आपल्याला खूप काही शिकवते. प्रत्येक स्त्री कशी असावी तर ती आदिशक्ती देवी 'अष्टभुजा' सारखी असावी....
राष्ट्र सेविका समितीत देखील समाजकार्य करताना प्रत्येक  सेविकेचे प्रेरणास्थान हे देवी अष्टभुजा आहे.

*नमो अष्टभुजे देवि, लक्ष्मी पार्वती शारदे बुद्धिवैभव दो मातर्, हमें दो शक्ति सर्वदे*
हे आदिशक्ती देवी अष्टभुजे, देवी लक्ष्मी, देवी पार्वती, देवी शारदा तू आम्हा सर्वना शक्ती दिलीस पण ती वापरण्याची बुद्धी दे... असा याचा थोडक्यात भावार्थ म्हणजेच.. कोणाकडे कितीही विद्या असू देतं, ती त्या त्या व्यक्तीजवळ राहिली तर त्याचा काही उपयोग होत नाही.
कोणाजवळ कितीही धन असू देतं पण ते कोणत्या मार्गाने कमावले हे महत्वाचे आणि त्याचा वापर कश्यासाठी होतोय तेही महत्वाचे नाहीतर त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे हे देवी तू आम्हाला 'बुद्धीचे वैभव दे' जे सर्वशेष्ट आहे त्यामुळे आम्ही भ्रष्ट होणार नाही पैसा, बुद्धी, आणि शक्ती चा योग्य, नियोजित,अचूक वापर होईल आणि आत्मिक, सामाजित, सार्वजनिक विकास होईल 
नारी ते नारायणी प्रवासात पाहिली शिकवण बुद्धीचे वैभव ही आहे..... धन्यवाद 🙏
✍️सौ पुजा जहागीरदार (PMJ)

'नारी तू नारायणी' द्वितीय पुष्प.... 🙏


*शीलरूपवती नारी तेरी ही प्रतिमा बने, धर्मसंस्कृति रक्षा से धन्य भारत को करें*    

'चरित्रवान स्त्री ही संस्काराचे केंद्र' व अतिशय महत्त्वाचा आणि मुख्य भाग आहे. तसेच ती कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ आहे. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण कुटुंबाला आणि संस्कृतीला एकत्र ठेवणारा मुख्य दुवा आहे. जर घरातील स्त्री चरित्रवान आणि सुसंस्कारी असेल, तर ती पूर्ण पिढी घडवू शकते.
अशी स्त्री आधुनिक शिक्षण किंवा नोकरी करतांना देखील आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य विकृतींचे किंवा स्वैराचाराचे अनुकरण न करतात स्वतंत्र व स्वैराचार यातील नेमका फरक जणणारी असते.
सदाचारी आणि सुंदर स्त्री ही साक्षात देवीचे रूप असते विचारांची शुद्धता, शौर्य, तेज आणि सहिष्णुता यांच्या संगमातूनच तिच्या सौंदर्याला खरा अर्थ प्राप्त होतो. जी स्त्री अशा प्रकारे सदाचार आणि सौंदर्य यांचा मेळ साधते, ती धर्म व संस्कृतीचे जतन करून राष्ट्राला प्रगती पथावर नेऊ क्षकते.
नारी ते नारायणी प्रवासात दुसरी शिकवण 'हे स्त्री तु शीलरूपवती हो ' धन्यवाद 🙏
✍️सौ पुजा जहागीरदार (PMJ)

Tuesday, 30 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  नववे-पुष्प.. विषय-आजी...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
नववे -पुष्प.. 
विषय-आजी...
खरंतर आजी या नात्याबद्दल विशेष असा अनुभव मला वैयक्तिक नाही. या वटवृक्षाच्या छायेत फारस आलेलं आता मला आठवत नाही. पण त्या नात्याचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया.आजी म्हणजे आईची आई किंवा वडिलांची आई. आजी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर ती कुटुंबातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आधारस्तंभ असते.तिचे प्रेम, तिच्या मायेची ऊब आणि तिने दिलेले मार्गदर्शन आयुष्याला एक नवी दिशा देते. घरात आजीच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते, जी सर्व सदस्यांना एकत्र बांधून ठेवते. आजी म्हणजे कुटुंबाचा अनमोल खजिना. तिचा बटवा म्हणजे..काहीही झालं तरी डॉक्टर ची गरज नाही. तिची कुस म्हणजे दुसरा स्वर्गाच जणू..

नातवाचे रुसवे फुगवे आपल्या जादुई प्रेमाने चुटकी सरशी नाहीसे करणारी व्यक्ती म्हणजे आजी होय.
आजीचे नातवावरचे प्रेम असे म्हटले की संदीप खरे सरांच्या ओळी आठवतात..

काढल्या खस्ता केलेत कष्ट
'तू' म्हणजे त्या सगळ्याची 
शेवट गोड असलेली गोष्ट..

नुसतंच कथा पुराण झालं 
देव काही दिसला नाही 
कुशीत येतो तेव्हा कळतं 
कृष्ण काही वेगळा नाही....
        इतकं असीम प्रेम फक्त हीच माऊली करू शकते....

आजीच्या अनुभवांतून आणि ज्ञानामुळे नेहमीच योग्य सल्ला मिळतो. ती आपसूक आपल्याला मोठ्यांचा आदर करायला आणि आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कष्ट करायला शिकवते. तिच्याकडून शिकलेले संस्कार आणि तिने दिलेले संस्कार हे आपल्यासाठी खूप अनमोल असतात. आजीच्या कथेमुळे आणि तिच्या आठवणींमुळे कुटुंबाच्या भूतकाळाची आणि परंपरेची जाणीव होते.

तिच्यामुळेच कुटुंबाचे महत्त्व कळले. आजीचा स्पर्श, तिचे आशीर्वाद आणि तिचे प्रेम हे सर्वात मोठे धन असते ते सर्वांच्या वाटेला येतेचं असे नाही. आजोळची आठवण म्हटली की आता कोणाला सहज सांगता येत नाही जसे आपले आईबाबा सांगतात.

वेचीतं अनुभव पिढ्यांचे तिन्ही
अंधुक डोळे गातात गाणी
हट्ट सारे बाटव्यात तिच्या 
प्रत्येकासाठी वेगळी नाणी..

लहानां सोबत होते लहान 
मोठ्यानं सोबत अगदी मोठी 
हास्यात तिच्या विरघळतो काळ
मनात तिच्या हजार मोती..

थरथर पायी गाठी देऊळ
घेत नाव देवाचे ओठी 
दुःख टाळण्या आजी माझी 
सांज सभेला वाचे पोथी....
आपण सर्व देवीजवळ प्रार्थना करूया हे इतकं सुंदर नातं सर्वांच्या आयुष्यात नक्कीच असू दे.....
जय भवानी....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.


Sunday, 28 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  आठवे-पुष्प.. विषय-सासू...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
आठवे - पुष्प
विषय - सासू
     नमस्कार तस तर सासू-सूनेच नात: कधीही न उलगडणार कोडया सारखच असत. कालच्या लेखात आपण सूनेची भूमिका समजावून घेतली. आज सासूची समजून घेऊया... (सदर लेख माझ्या सासू लोकांनी मनावर घेऊ नये.🙏 हे लिखाण जगातील सर्व सासूच्या भूमिकेत असणाऱ्या महिलांसाठी आहे.😄)घरात मुलाचं लग्न झालं की आईची सासू कधी होते ते तिलाही कळतं नाही. प्रत्येक घरात सासूचं एक वेगळचं रूप पाहायला मिळत. कुठे ती खाष्ट कठोर, स्वभावाची, तर कुठे चंडीकेचा अवतार जणू, कुठे अगदी मवाळ, गरीब गाय जणू... गंमत पुढे आहे.. यांना सूना मात्र अगदी यांच्या विरुद्ध स्वभावाच्या मिळतात...का कुणास ठाऊक लग्नगाठ जशी स्वर्गात बांधली जाते तशी सासू सूनेची गाठ कुठे बांधली जाते कुणास ठाऊक?..
विशेष असे की, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सुचना नको. असे हे मजेशीर नाते जगावेगळेच असतं.

     खरंतर प्रत्येक सासू ही एकेकाळची सूनच असते. ती या सर्वातून आधी गेलेली असते. अनुभवी असते त्यामुळे आपल्याला संसार करतांना ज्या अडचणी आल्या त्या आपल्या मुलाला-सुनेला येऊ नये असे तिला प्रामाणिकपणे वाटत असते. प्रत्येकवेळी तिचा विचार वाईटच असतो असे नाही त्याउलट बऱ्याचदा तो सकारात्मक असतो. पण समाजाने सासू ही खाष्टचं असं लेबलचं जणू सासू नावाला लावल्यामुळे प्रत्येक सून आपल्या सासूला त्याच त्या चष्म्यातुन पाहत असते आणि मग नात्यांमध्ये खटके उडल्याशिवाय राहत नाही. 
थोडं तीन अन थोडं आपण समजून घ्यायला काय हरकत आहे पण असं होत नाही हे सासू सुनेन जाणलं पाहिजे.   

     सुनेनही सासूच्या छोट्या छोट्या गोष्टी माहेरी न सांगता सासूशी पारदर्शी चर्चा करावी मगच हे नातं खुलंत अन्यथा सासू वाईटच... त्यात आजकालच्या मुलींची तर कथाच वेगळी आहे "सासू सासरे नकोच"... मग सांगा? अनुभवाची शिदोरी येईल कुठून, त्या घरच्या परंपरा, सणवार, त्या घरातला पिढीजात संस्कार आपल्याला कोण सांगणार? पूर्वीपासून चालत आलेल्या कुटुंब व्यवस्थेला काहीतरी अर्थ आहे ना?. तो आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आचारच केले पाहिजे. सगळं आपल्याच मनाने कस होईल? मग कुटूंबात राहणेच नको एकटेच राहूया... यावर येऊन थांबलंय सगळं पण यामुळे खूप अडचणी समस्या निर्माण होत आहेत. ज्या आपण शब्दात सांगू शकत नाही.

खरं सांगू सासूला काही काही नको असते 
फक्त एक सुशील सून लागते.

लेकच जवळची असते लेक चार घटका लागते 
सून मात्र मरेपर्यंत लागते.

माहेरवाशीण लेकीला चार दिवस खाऊ घालते आयुष्यभराची पोळी मात्र बाई सुनेकरताच ठेवते.

परक्याचं धन बोलून लेकीला बाई शंभर वेळा टोकते काहीही झालं तरी आपल्या घरची म्हणत सुनेला नेहमी माफ करते.

घरामधली प्रत्येक गोष्ट बाई लेकीवरच लादते 
मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट तिच्याच कलेने घेते.

लेकीचं बाळंतपण करून बाई लगेच मोकळी होते 
सुनेच्या पोराला मात्र दुधावरच्या सायीप्रमाणे जपते.

कोण म्हणतं सुनेवर सासू अत्याचार करते ? 
सासू स्वतःची जागा सोडते अन ती तर सूनेलाच देते.

     सोपं नसत सासू होणं...आपला संसार सारा दुसऱ्या हाती देणं. म्हणून सासू या नात्याचा आईप्रमाणे आदरच करा बघा संसार सुखाचा होईल..

प्रेम जिथे नात्यापेक्षा मोठं असतं...
समजूतदारपणाच्या छायेत 
"सासू सूनेच" नातं खुळत....
जय भवानी.....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.