Monday, 12 October 2026

'नारी तू नारायणी' तृतीय पुष्प.... 🙏

देवीचे रूप मोहक आणि सुंदर वाटत असले तरी एक गोष्ट खूप महत्वाची ती म्हणजे आपली प्रत्येक देवी देवता ही शस्त्र धारण करणारी आहे. तसेच आपली देवी अष्टभुजा ही देखील आपल्या आठही हातात काही तरी धारण करून आहे त्याच विषयी आपण आता पुढील श्लोकात जाणून घेणार आहोत....

*सुगंधित सुवर्णाभ, सुकोमल सरोज जो, हस्त में धृत देता है पाठ निर्लेप तुम बनो*

कमळ पुष्प जे देवीच्या हातात आहे हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. चिखलात रुजूनही अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि सुगंधी राहण्याचे त्याचे वैशिष्ट्य मानवी जीवनाला मोठी प्रेरणा देते.तशीच एक स्त्री असावी अशीच या मागे शिकवण असावी 

कमळाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. चिखलात आणि साचलेल्या पाण्यात असूनही त्याच्या पाकळ्यांवर चिखल किंवा पाण्याचा एकही थेंब रेंगाळत नाही. त्यामुळे त्याला स्वच्छता आणि अनासक्तीचे प्रतीक मानले जाते.असेच प्रत्येक स्त्री ने वागावे अशीच या मागे शिकवण असावी.

कमळाचा प्रभाव म्हणजे कमळाच्या पानांवर आणि पाकळ्यांवर निसर्गतःच एक मेणासारखा थर असतो. यामुळे पाणी त्यावर न थांबता मोत्यासारखे घसरून जाते. विज्ञानात या गुणधर्माला 'लॉट्स इफेक्ट' म्हणतात.तसेच प्रत्येक स्त्री चे आचरण असावे कोणतीही गोष्ट मनात धरून न ठेवला तिने खुळ्या मनाने जगावे 

कमळ ज्ञानदेवी सरस्वती आणि धनलक्ष्मी यांचे ते आसन आहे. असे हे फुल देवीने हातात धारण केलेले आहे ज्याचे खूप औषधी गुणधर्म हीं आहेत आश्या या फुलाकडून आपण काहीतरी आचरणीय शिकवण घ्यावी आशीच या मागची भावांना असावी म्हणून हे फुल देवीने आपल्या हातात धारण केलेले आहे 

देवीच्या हातात असलेले, सोनेरी तेज पसरवणारे सुगंधी कमळ अनासक्तीची प्रेरणा देते; कमळ चिखलात जन्म घेत असले तरी त्याचा सुगंध आणि सौंदर्य अबाधित राहते. त्याचप्रमाणे, महिला काळजीवाहकांनी (केअरगिव्हर्स) समाजातील दोषांचा किंवा अशुद्धतेचा आपल्यावर परिणाम होऊ न देता, कमळाप्रमाणे अनासक्त वृत्ती बाळगावी आणि त्याच वेळी आपल्या व्यक्तिमत्त्वातून सोनेरी तेजाचे वलय निर्माण करावे. कमळ हे सौम्यतेचेही प्रतीक आहे आणि ते काळजीवाहकांना सौम्य स्वभाव जोपासण्याची प्रेरणा देते—कारण स्त्रीचा सौम्य स्वभावच कौटुंबिक संबंधांचा भक्कम पाया असतो. 
नारी ते नारायणी प्रवासात हीच ती आजची शिकवण ... धन्यवाद 🙏
✍️सौ पुजा जहागीरदार (PMJ)



Sunday, 11 October 2026

'नारी तू नारायणी' प्रथम पुष्प.... 🙏नमस्कार..शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा...दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....🙏


नारी ही कुटुंब, समाज आणि संसाराची पालनपोषण करणारी शक्ती आहे. म्हणूनच आपल्या सांस्कृतित 'स्त्री' ला शक्तीचे प्रतीक मानले जाते. तिचा नेहमीच आदर आणि सन्मान केला जातो  स्त्रीच्या बुद्धिमत्तेला, ज्ञानाला आणि तिच्या त्यागाला उच्च स्थान दिले जाते.नारी तू फक्त एक सामान्य नारी नाहीस तर तुझ्यात अपार शक्ती आहे. "हे स्त्री (नारी), तू थेट श्रीविष्णूची किंवा ईश्वराची शक्ती (नारायणी) आहेस" शारदीय नवरात्री पूजन हे त्याचाच एक भाग आहे.
पण नारी ते नारायणी हा प्रवास खूप सोपा नाही. तो कसा करावा, कसा असावा, हे सांगणारी देखील स्त्री शक्ती देवीच आहे. तिच्या रूपातूनच ती आपल्याला खूप काही शिकवते. प्रत्येक स्त्री कशी असावी तर ती आदिशक्ती देवी 'अष्टभुजा' सारखी असावी....
राष्ट्र सेविका समितीत देखील समाजकार्य करताना प्रत्येक  सेविकेचे प्रेरणास्थान हे देवी अष्टभुजा आहे.

*नमो अष्टभुजे देवि, लक्ष्मी पार्वती शारदे बुद्धिवैभव दो मातर्, हमें दो शक्ति सर्वदे*
हे आदिशक्ती देवी अष्टभुजे, देवी लक्ष्मी, देवी पार्वती, देवी शारदा तू आम्हा सर्वना शक्ती दिलीस पण ती वापरण्याची बुद्धी दे... असा याचा थोडक्यात भावार्थ म्हणजेच.. कोणाकडे कितीही विद्या असू देतं, ती त्या त्या व्यक्तीजवळ राहिली तर त्याचा काही उपयोग होत नाही.
कोणाजवळ कितीही धन असू देतं पण ते कोणत्या मार्गाने कमावले हे महत्वाचे आणि त्याचा वापर कश्यासाठी होतोय तेही महत्वाचे नाहीतर त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे हे देवी तू आम्हाला 'बुद्धीचे वैभव दे' जे सर्वशेष्ट आहे त्यामुळे आम्ही भ्रष्ट होणार नाही पैसा, बुद्धी, आणि शक्ती चा योग्य, नियोजित,अचूक वापर होईल आणि आत्मिक, सामाजित, सार्वजनिक विकास होईल 
नारी ते नारायणी प्रवासात पाहिली शिकवण बुद्धीचे वैभव ही आहे..... धन्यवाद 🙏
✍️सौ पुजा जहागीरदार (PMJ)

'नारी तू नारायणी' द्वितीय पुष्प.... 🙏


*शीलरूपवती नारी तेरी ही प्रतिमा बने, धर्मसंस्कृति रक्षा से धन्य भारत को करें*    

'चरित्रवान स्त्री ही संस्काराचे केंद्र' व अतिशय महत्त्वाचा आणि मुख्य भाग आहे. तसेच ती कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ आहे. स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण कुटुंबाला आणि संस्कृतीला एकत्र ठेवणारा मुख्य दुवा आहे. जर घरातील स्त्री चरित्रवान आणि सुसंस्कारी असेल, तर ती पूर्ण पिढी घडवू शकते.
अशी स्त्री आधुनिक शिक्षण किंवा नोकरी करतांना देखील आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य विकृतींचे किंवा स्वैराचाराचे अनुकरण न करतात स्वतंत्र व स्वैराचार यातील नेमका फरक जणणारी असते.
सदाचारी आणि सुंदर स्त्री ही साक्षात देवीचे रूप असते विचारांची शुद्धता, शौर्य, तेज आणि सहिष्णुता यांच्या संगमातूनच तिच्या सौंदर्याला खरा अर्थ प्राप्त होतो. जी स्त्री अशा प्रकारे सदाचार आणि सौंदर्य यांचा मेळ साधते, ती धर्म व संस्कृतीचे जतन करून राष्ट्राला प्रगती पथावर नेऊ क्षकते.
नारी ते नारायणी प्रवासात दुसरी शिकवण 'हे स्त्री तु शीलरूपवती हो ' धन्यवाद 🙏
✍️सौ पुजा जहागीरदार (PMJ)

Tuesday, 30 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  नववे-पुष्प.. विषय-आजी...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
नववे -पुष्प.. 
विषय-आजी...
खरंतर आजी या नात्याबद्दल विशेष असा अनुभव मला वैयक्तिक नाही. या वटवृक्षाच्या छायेत फारस आलेलं आता मला आठवत नाही. पण त्या नात्याचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया.आजी म्हणजे आईची आई किंवा वडिलांची आई. आजी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर ती कुटुंबातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आधारस्तंभ असते.तिचे प्रेम, तिच्या मायेची ऊब आणि तिने दिलेले मार्गदर्शन आयुष्याला एक नवी दिशा देते. घरात आजीच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते, जी सर्व सदस्यांना एकत्र बांधून ठेवते. आजी म्हणजे कुटुंबाचा अनमोल खजिना. तिचा बटवा म्हणजे..काहीही झालं तरी डॉक्टर ची गरज नाही. तिची कुस म्हणजे दुसरा स्वर्गाच जणू..

नातवाचे रुसवे फुगवे आपल्या जादुई प्रेमाने चुटकी सरशी नाहीसे करणारी व्यक्ती म्हणजे आजी होय.
आजीचे नातवावरचे प्रेम असे म्हटले की संदीप खरे सरांच्या ओळी आठवतात..

काढल्या खस्ता केलेत कष्ट
'तू' म्हणजे त्या सगळ्याची 
शेवट गोड असलेली गोष्ट..

नुसतंच कथा पुराण झालं 
देव काही दिसला नाही 
कुशीत येतो तेव्हा कळतं 
कृष्ण काही वेगळा नाही....
        इतकं असीम प्रेम फक्त हीच माऊली करू शकते....

आजीच्या अनुभवांतून आणि ज्ञानामुळे नेहमीच योग्य सल्ला मिळतो. ती आपसूक आपल्याला मोठ्यांचा आदर करायला आणि आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कष्ट करायला शिकवते. तिच्याकडून शिकलेले संस्कार आणि तिने दिलेले संस्कार हे आपल्यासाठी खूप अनमोल असतात. आजीच्या कथेमुळे आणि तिच्या आठवणींमुळे कुटुंबाच्या भूतकाळाची आणि परंपरेची जाणीव होते.

तिच्यामुळेच कुटुंबाचे महत्त्व कळले. आजीचा स्पर्श, तिचे आशीर्वाद आणि तिचे प्रेम हे सर्वात मोठे धन असते ते सर्वांच्या वाटेला येतेचं असे नाही. आजोळची आठवण म्हटली की आता कोणाला सहज सांगता येत नाही जसे आपले आईबाबा सांगतात.

वेचीतं अनुभव पिढ्यांचे तिन्ही
अंधुक डोळे गातात गाणी
हट्ट सारे बाटव्यात तिच्या 
प्रत्येकासाठी वेगळी नाणी..

लहानां सोबत होते लहान 
मोठ्यानं सोबत अगदी मोठी 
हास्यात तिच्या विरघळतो काळ
मनात तिच्या हजार मोती..

थरथर पायी गाठी देऊळ
घेत नाव देवाचे ओठी 
दुःख टाळण्या आजी माझी 
सांज सभेला वाचे पोथी....
आपण सर्व देवीजवळ प्रार्थना करूया हे इतकं सुंदर नातं सर्वांच्या आयुष्यात नक्कीच असू दे.....
जय भवानी....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.


Sunday, 28 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  आठवे-पुष्प.. विषय-सासू...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
आठवे - पुष्प
विषय - सासू
     नमस्कार तस तर सासू-सूनेच नात: कधीही न उलगडणार कोडया सारखच असत. कालच्या लेखात आपण सूनेची भूमिका समजावून घेतली. आज सासूची समजून घेऊया... (सदर लेख माझ्या सासू लोकांनी मनावर घेऊ नये.🙏 हे लिखाण जगातील सर्व सासूच्या भूमिकेत असणाऱ्या महिलांसाठी आहे.😄)घरात मुलाचं लग्न झालं की आईची सासू कधी होते ते तिलाही कळतं नाही. प्रत्येक घरात सासूचं एक वेगळचं रूप पाहायला मिळत. कुठे ती खाष्ट कठोर, स्वभावाची, तर कुठे चंडीकेचा अवतार जणू, कुठे अगदी मवाळ, गरीब गाय जणू... गंमत पुढे आहे.. यांना सूना मात्र अगदी यांच्या विरुद्ध स्वभावाच्या मिळतात...का कुणास ठाऊक लग्नगाठ जशी स्वर्गात बांधली जाते तशी सासू सूनेची गाठ कुठे बांधली जाते कुणास ठाऊक?..
विशेष असे की, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सुचना नको. असे हे मजेशीर नाते जगावेगळेच असतं.

     खरंतर प्रत्येक सासू ही एकेकाळची सूनच असते. ती या सर्वातून आधी गेलेली असते. अनुभवी असते त्यामुळे आपल्याला संसार करतांना ज्या अडचणी आल्या त्या आपल्या मुलाला-सुनेला येऊ नये असे तिला प्रामाणिकपणे वाटत असते. प्रत्येकवेळी तिचा विचार वाईटच असतो असे नाही त्याउलट बऱ्याचदा तो सकारात्मक असतो. पण समाजाने सासू ही खाष्टचं असं लेबलचं जणू सासू नावाला लावल्यामुळे प्रत्येक सून आपल्या सासूला त्याच त्या चष्म्यातुन पाहत असते आणि मग नात्यांमध्ये खटके उडल्याशिवाय राहत नाही. 
थोडं तीन अन थोडं आपण समजून घ्यायला काय हरकत आहे पण असं होत नाही हे सासू सुनेन जाणलं पाहिजे.   

     सुनेनही सासूच्या छोट्या छोट्या गोष्टी माहेरी न सांगता सासूशी पारदर्शी चर्चा करावी मगच हे नातं खुलंत अन्यथा सासू वाईटच... त्यात आजकालच्या मुलींची तर कथाच वेगळी आहे "सासू सासरे नकोच"... मग सांगा? अनुभवाची शिदोरी येईल कुठून, त्या घरच्या परंपरा, सणवार, त्या घरातला पिढीजात संस्कार आपल्याला कोण सांगणार? पूर्वीपासून चालत आलेल्या कुटुंब व्यवस्थेला काहीतरी अर्थ आहे ना?. तो आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आचारच केले पाहिजे. सगळं आपल्याच मनाने कस होईल? मग कुटूंबात राहणेच नको एकटेच राहूया... यावर येऊन थांबलंय सगळं पण यामुळे खूप अडचणी समस्या निर्माण होत आहेत. ज्या आपण शब्दात सांगू शकत नाही.

खरं सांगू सासूला काही काही नको असते 
फक्त एक सुशील सून लागते.

लेकच जवळची असते लेक चार घटका लागते 
सून मात्र मरेपर्यंत लागते.

माहेरवाशीण लेकीला चार दिवस खाऊ घालते आयुष्यभराची पोळी मात्र बाई सुनेकरताच ठेवते.

परक्याचं धन बोलून लेकीला बाई शंभर वेळा टोकते काहीही झालं तरी आपल्या घरची म्हणत सुनेला नेहमी माफ करते.

घरामधली प्रत्येक गोष्ट बाई लेकीवरच लादते 
मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट तिच्याच कलेने घेते.

लेकीचं बाळंतपण करून बाई लगेच मोकळी होते 
सुनेच्या पोराला मात्र दुधावरच्या सायीप्रमाणे जपते.

कोण म्हणतं सुनेवर सासू अत्याचार करते ? 
सासू स्वतःची जागा सोडते अन ती तर सूनेलाच देते.

     सोपं नसत सासू होणं...आपला संसार सारा दुसऱ्या हाती देणं. म्हणून सासू या नात्याचा आईप्रमाणे आदरच करा बघा संसार सुखाचा होईल..

प्रेम जिथे नात्यापेक्षा मोठं असतं...
समजूतदारपणाच्या छायेत 
"सासू सूनेच" नातं खुळत....
जय भवानी.....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार. 

Saturday, 27 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  सातवे-पुष्प.. विषय-सून...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
सातवे - पुष्प
विषय - सून
  विवाहानंतर खऱ्या अर्थाने नात्यांचे दडपण येते. दोघांपैकी स्त्रीवर ते अधिक असते. वास्तविक प्रत्येकाचे आयुष्य स्वतंत्र असते व ते घडवण्याची प्रत्येकाला संधी असते. ते कसे व्यतीत करायचे? ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न असतो. नात्यांचे ओझे वा दडपण स्त्रियांवर अधिक असते. कारण त्यांना माहेर व सासर दोन्हीकडची नाती जपायची असतात. ती गृहिणी असेल तर ती ते सारे करेलही पण अलीकडे बहुतांश स्त्रिया पूर्ण वेळ गृहिणी नसतात कोणत्या न कोणत्याप्रकारे त्या स्वतःची ओळख तयार करण्याचा, आर्थिक स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण काम व  इतर जबाबदाऱ्यांमुळे ते प्रत्येकीस शक्य होतेच असेही नाही

   स्त्री च्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आणि परीक्षेची वेळच म्हणा ना! ही सूनेची भूमिका असते. त्यात प्रत्येकजण तिला न्याहाळत असतो. विशेष म्हणजे सासरची मंडळी.. मुलीची सून होताच तिला अनेक नात्यांना न्याय दयावा लागतो. त्यात सासू सूनेच नातं फार महत्वाचं मानलं जात. कधीकधी लोक गंमतीन म्हणतात ही, की "मुलामुलीची पत्रिका पाहण्यापेक्षा सासू सूनेची पहा " म्हणजे संसार सुखाचा होईल. कारण या दोन भूमिकेलीत स्रिया जर मिळून मिसळून राहिल्या तर आणि तरच संसार सुखाचा होतो.

   नवीन सुनेला अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. नात्यांशी परिचय करून घेताना, त्यांच्याशी जुळवून घेताना तिची दमछाक होते. ती केंद्रस्थानी असते व तिच्याकडून साऱ्यांच्याच आपापल्या कुवतीनुसार विभिन्न अपेक्षा असतात. वास्तविक ती नवीन घरात येते तेव्हा तिच्या मनातली द्विधा मन:स्थिती, संकोच, गोंधळ थांबवून तिला मानसिक निवांत करायचे सोडून ‘इकडच्या पद्धती, नियम, श्रीमंती, कुलाचार’ इ. सर्व बाबींचे तिच्यावर इतके दडपण आणले जाते की, लग्न करून आपण चुकी केली की काय? असे तिला वाटू लागते. 

    लग्न ठरवतानाच मुलींनी करियरबाबत नवरा मुलगा व त्याच्या कुटुंबाशी स्पष्टपणे बोलले पाहिजे. आधीच्या पिढीला त्या ‘शहाणपणाची’ परवानगी नव्हती पण आज आहे. मुलीची बुद्धिमत्ता, कौशल्य याचे मूल्य जाणणारे अपवादात्मक कुटुंबही असतात पण फार दुर्मिळ. सासरची नाती समंजस असतील तर ठीकच पण नसतील तर तिच्या विवाहित आयुष्यातील सुरुवातीची चार पाच वर्षे ताणतणाव यातच जातात आणि तिच्या प्रगतीलाही खीळ बसते. नाती गोंजारत बसू? की, ध्येयाकडे लक्ष देऊ? अशी दोलायमान परिस्थिती होते. 

   आधी सासरच्यांना माझ्याकडून काय हवे आहे हे तिने समजून घायला हवे. त्यात काहीवेळला खूपच माफक अपेक्षा असतात पण मुली त्याचा उगीचंच बाऊ करतात. म्हणजे उदाहरणं द्यायचं झालाच तर इतरांशी तुलना न करता त्यांना आपल्या संसारात समाधानाने वावरणारी सून हवी असते.दोघांचं आयुष्य बदलतं हे दोघांनी समजून घ्यायला हवं. सासू सासर्यांना मान मिळावा. मुठीत ठेवणारी मुलगी नाही तर आपलंस करणारी सून हवी असते. असं जर का ती मुलगी.. सून वागली आणि तिला तिच्या कुटुंबाची योग्य  साथ मिळाली तर मात्र ती संधीच सोन केल्यावाचून राहत नाही. सर्वाना अभिमाचं वाटेल असं ती वागते. आणि आपल्यातल्या कलागुणांनी सर्वांची मने जिंकून घेते. शेवटी तिला आयुष्यभर त्याच माणसांसोबत राहायचे असते आणि तेच तीच सर्वस्व असतात. 

मुलगा असला देव जरी, आशा कधीच फळत नाही.
सुख दुःखाच्या वादळात, तिची निष्ठा धळत नाही.
अशी सून सावली, सुख स्वप्न मनात असते 
सुनेविना न सावली, प्रत्येक घर उन्हात असते....

नाती टिकवायची असतील तर आपल्या भावना आणि अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त करा. मग बघा आयुष्य सुंदर होईल....जय भवानी 🚩🙏
    अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.

Friday, 26 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  सहावे-पुष्प.. विषय-पत्नी...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
सहावे - पुष्प
विषय - पत्नी
घराला घरपण आणणारी आणि स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने, घराला स्वर्गाहून सुंदर बनवणारी स्त्री..
पत्नी, बायको, कारभारीण, मालकीण, घरधणीन, दारा, भार्या, वल्लभा, धवा, प्राणप्रिया, कांता, सहधर्मचारिणी, अर्धांगी, अर्धांगिनी, सती, त्रिणीता, गृहिणी, प्रणेश्वरी अश्या एक ना अनेक नावांनी संबोधली जाणारी लग्न झालेली स्त्री म्हणजे पत्नी होय. घराची लक्ष्मी, पतीची अर्धांगिनी, आणि कुटुंबाचा आधार असलेली स्त्री होय जिचे आपल्या पतीसोबतच त्याच्या परिवाराशी आयुष्यभराचे नाते जोडले जाते आणि ते ती शेवट पर्यंत नेटानी निभावतेही. 

हिंदू परंपरेत पत्नीला लक्ष्मी चे स्थान दिले जाते जी कुटुंबाचा आधार बनते आणि सर्वाना नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या येण्याने घराचे नंदनवन होते. पतीचे आईवडील, वडिलधारे, नातेवाईक यांचा ती नेहमी आदर करते नव्हे ते ती आपलें कर्तव्य समजते. घरातील सर्वांची आपुलकीने काळजी घेते ही तीला आपली जबाबदारी वाटते. 

प्रेम त्याग आणि परोपकाराच दुसरं नाव म्हणजे पत्नी.
स्वतःच अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते ना अगदी तशीच सासरी विरघळून सासर गोड करणारी साखर म्हणजे पत्नी. 
कौतुक आणि कृतज्ञतेच्या गावी जाण्याचं स्वप्न न पाहता आजन्म यंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी. 
पदरी पडलेल्या आणि नंतर पतीरुपी प्रियंकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रेयसी म्हणजे पत्नी. 
स्वतःच्या जीवनातून नवा जीव घडवणारी विश्वनिर्मिती म्हणजे पत्नी. 
उंबठ्याबाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी. 
माहेरी गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेक म्हणजे पत्नी. 

हे नातं जरी जबाबदारी आणि कर्तव्य यात बांधलेलं असलं तरी जसजसा संसार होत जातो तसतस हे नातं अधिक अधिक खुलत जात आणि खूप सुंदर, गोड होत जात... त्यात खुपसाऱ्या  गंमतीजमती ही होत जातात. हे थोडक्यात सांगणारी ही कविता 

पत्नी जर नसेल तर, राजवाडा पण सुना आहे
पत्नीला नाव ठेवणं, हा गंभीर गुन्हा आहे...

वय कमी असूनसुद्धा, मुलगी समजदार असते 
पत्नी पेक्षा पतीचे वय, म्हणून जास्त असते....

खरं पाहिलं तर तिच्याशिवाय, पानही हालत नाही 
घरातलं कोणतच सुख पत्नीशिवाय खुलत नाही..

तिचा दोष काय तर म्हणे, चांगल्या सवयी लावते 
कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवसरात्र धावते..

नोकरी अन पगाराशिवाय, पतीजवळ आहेचं काय 
तुलनाच जर केली तर सांगा तुम्हाला येत काय..?

चिडत असेल अधून मधून, सहनशीलता संपल्यावर
तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुपल्यावर?

स्वच्छ, सुंदर पवित्र घर, पत्नीमुळेचं असतं 
पती नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं..

पत्नीची टिंगल करून, फिदी फिदी हसू नका
तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर वन बसू नका...

असो थोडी गंमत या नात्याची, मनावर घेऊ नका....
असं सुंदर आणि गोड नातं तुमच्यापण आयुष्यात असू दे..
जय भवानी.....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.