Monday, 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस आठवा ..31/3/2020

बड़े दौर गुजरे हैं जिंदगी के,ह दौर भी गुजर जायेगा..

थाम लो अपने पांव को घरों में.. ये मंज़र भी थम जाएगा...बहुतांशी लोकांना देशावर आलेल्या संकटाचं गांभीर्य कळू लागलंय.. तुलनेमधे वाढत्या प्रमाणावर आपण शहाण्यासारखे वागतोय.. अनेक विदेशांतील हृदयद्रावक कहाण्या ऐकून कदाचित त्यातून काही बोधही घेतोय... त्यामुळं काही कालावधीनं का होईना संकटावर परतून वार करण्याची शक्यता निर्माण होऊ पाहातेय.. आणि आपण असेच संवेदनशीलतेनं वागत राहिलो तर त्यानंतरच्या सुखसमृद्धीच्या आगमनाचा संकेत तर ह्या काऊंच्या गलक्याने दिला नसेल! असेल.. कदाचित तसंच असेल! आता ते सत्यात उतरवण्यासाठी आपण परिस्थितीचं गांभीर्य आणखी आणखी समजून घेऊया, नियमबद्ध राहाण्याचं महत्व ओळखूया, आपल्या पिलांना घरट्यात एकाकी सोडून आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या बांधवांची कदर करूया आणि लवकरात लवकर जिंकूया... 

आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या बांधवांची कदर करूया थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सातवा ..30/3/2020

आज एक कथा आठवली नेहमी तुम्ही-आम्ही एेकलेली आटपाट नगर होतं. तिथला राजा मोठा शिवभक्त होता म्हणून त्याच्या मनात आलं कि महादेवाच्या मंदिराचा गाभारा दुधानं भरावा. त्यानं दवंडी पिटली कि, गावातल्या सर्वांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवळाच्या देवळात अभिषेकाला यावं. सर्वांना धाक पडला, राजाज्ञेनं घाबरून कुणीही घरात थेंबभरही दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुला-बाळांना दिलं नाही. सगळं दूध देवळात नेऊन गाभाऱ्यात वाहिलं. मात्र गाभारा भरला नाही. राजा खट्टू होऊन परतला. दुपारी मात्र अजब गोष्ट घडली. एक म्हातारी बाई होती. तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं, मुला-बाळांना खाऊ घातलं, लेकी-सुनांना न्हाऊ-माखू घातलं, गाई-वासरांना चारा घातला. थोडक्यात घरातल्या सगळ्यांचा आत्मा थंड केला आणि मग आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडंसं गंधफूल, तांदळाचे चार दाणे, बेलाचं पान आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली. तिनं मनोभावे महादेवाची पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं आणि प्रार्थना केली, ‘हे महादेवा, नंदिकेश्वरा! राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही, तो माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी भक्तिभावानं अर्पण करतेय त्याचा स्वीकार कर.’ नंतर तिनं सोबतचं खुलभर दूध शंकराला वाहिलं आणि माघारी आली. इकडं चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर देवळाचा गाभारा भरून गेला. गुरवानं हे पाहाताच राजाला कळवलं, परंतू हे कसं घडलं ह्याचा काही थांग लागला नाही, दोन सोमवार असंच घडलं.

शेवटी तिसऱ्या सोमवारी राज स्वत: देवळाबाहेर थांबला. दुपारी म्हातरीनं दूध वाहिल्यावर गाभारा भरलेला पाहाताच त्यानं तिला अडवलं आणि हे घडण्याचं कारण विचारलं. म्हातारी घाबरल्यावर त्यानं तिला अभयवचन दिलं. मग तिनं सांगितलं, ‘हे नरेशा, तुझ्या आज्ञेनं काय घडलं!?.. तर वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांची हाय माथी आली. हे देवाला कसं आवडेल? म्हणून त्याचा गाभारा भरला नाही.’ मग राजानं ह्यावरचा उपाय विचारला. ती म्हणाली, ‘मुला-वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंदी, समाधानी राहावं म्हणजे देव संतुष्ट होईल. त्याचा गाभारा भरेल.’ राजानं तिच्या सांगण्यानुसार पुन्हा दवंडी दिली. गावातल्या सर्वांनी मुला-बाळांना, गाई-वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. राजानं स्वत: महादेवाची पूजा केली आणि हात जोडून डोळे मिटून मनोभावे प्रार्थना केली. नंतर डोळे उघडून पाहातात तो देवाचा गाभारा काठोकाठ भरून गेला होता. राजाला खूप आनंद झाला. त्यानं म्हातारीला इनाम दिलं आणि लेकी-सुनांसोबत ती आणखी समाधानात नांदू लागली. तसं तुम्ही-आम्ही नांदू. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

आज अचानक ही कहाणी आठवली. आपण सगळ्यांनीच ती कधी ना कधी वाचलेली आहेच. पण आज त्यातून वेगळं काहीतरी सापडलं. वाटलं, ह्या परिस्थितीत घाबरून न जाता आपलं मन:स्वस्थ्य टिकवून ठेवणं, घरात सुख-शांती-समाधान नांदतं ठेवणं आणि त्याचसोबत आपल्या कुवतीनुसार जमेल तेवढं गरजवंतातच देव पाहून त्याला भक्तिभावानं अर्पण करणं हा आपला स्वधर्म आपण पाळूया. अश्या आचार-विचारांची साखळी संपूर्ण व्यवस्था सुस्थितीत ठेवायला नक्कीच मदत करेल. आपण कोणत्याही परिस्थितीत आपली उमेद हरवून बसता कामा नये. नाहीतर झुंझणाऱ्यांच्या पायांत बळ कसं आणि कुठून यायचं. आधी निष्ठेनं स्वधर्माचं आचरण करूया म्हणजे आपली मनोदेवता प्रसन्न राहील, मनोबल, उमेद टिकून राहील आणि मग आपण आपल्याकडून केलेला खुलभर दुधाचा अभिषेक, मूठभर मदत फार मोठी भूमिका बजावेल. शिवाय क्षणभर डोळे मिटून, ‘देवा, प्रत्येकाच्या मुखी अन्नाचा कण पडू दे’ अशी प्रार्थना तर दिवसातून कितीही वेळा आपण करू शकतोच कि! आपली खरी खंत हीच आहे कि आपण स्वत: काही करू शकत नाही, आपल्या हातात काही नाही. मग ज्याच्या हाती ' ते आहे त्यालाच तर विनवायला हवं आपण! तेवढं करूया... करूयाच!
क्षणभर डोळे मिटून, ‘देवा, प्रत्येकाच्या मुखी अन्नाचा कण पडू दे’ अशी प्रार्थना करूया
थोडा विचार 'करो ना'..
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस सहावा ..29/3/2020

सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता नियम धुडकावून लावत बेदरकारपणे काहीजण मोकाट वावरत आहेत.. स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. ते आता थांबायला हवं... नाहीतर विनाश अटळ आहे. मित्रहो, थोडं थांबूया... उंबरठ्याच्या आत शांतपणे बसूया, बालपणीच्या सुरम्य काळात मनानं मनसोक्त बागडून सुख लुटून आणूया, आपल्या मुलांना आपल्या काळचं फक्त तोंडी वर्णन सांगायचो ते दूरदर्शनच्या माध्यमातून का होईना पुन्हा अनुभवूया.. त्यातल्या निरागसतेची मुलांनाही ओळख करून देऊया... गेलाबाजार आपण तरी स्वस्थ चित्त होऊया. ही मातृभूमी दुसरं काय मागतेय आपल्याकडे!?... आपण सुखानं, स्वस्थतेत चार भिंतीत उंबरठ्याच्या आत काही दिवस घालवणंच ना?.. तेवढं करूया! घरात जे काही असेल त्यात भागवूया.. बाहेर पडणं पूर्ण टाळूया. उद्या मोकळ्या आकाशात स्वच्छंद विहरायचं असेल तर आज हे करायलाच हवं... परिस्थिती भयानकतेच्या दिशेनं वळू लागलीये तिला परत खेचून सुरक्षित क्षेत्रात त्वरेनं आणूया... आहे तिथंच थोडं थांबूया! मोठी झेप घेण्यासाठी आधी दोन पावलं मागं येत स्थिर व्हवं लागतं तसे हे क्षण समजूया. काहीच उरलं नाही तर आपल्याला करायलाही काहीच उरणार नाही.. तेव्हां वेळीच स्वत:ला आवर घालूया! थोडं थांबूया... आनंदाच्या जुन्या थांब्यांवर क्षणभर विसावूया... ताजेतवाने होऊया... चैतन्यमय होऊया... त्यातून सकारात्मकता कमावूया... 

मिळालेले क्षण असे सार्थकी लावूया आणि आपल्यासाठी झिजणाऱ्या जिवांना आणि राष्ट्राला वाचवूया?
थोडा विचार 'करो ना'...
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस पाचवा..28/3/2020

आज सहज सकाळी रांगोळी काढतांना मनात आलं प्रसंन्न पहाट, सुंदर निसर्ग, मोकळा गार वारा त्यात अंगणात पडलेला सडा आणि त्याचा सुगंध त्यात काढत असलेली रांगोळी शंख, गोपद्म, कमळ, ओम,स्वस्तिक, समई ईतरही अनेक निसर्गानं भरभरून जे दान आपल्याला दिलं आहे त्याची ही प्रतीकं रेखून आपण त्याप्रती अपार कृतज्ञता व्यक्त करणं हा त्यामागचा खरा हेतू अक्षरश: मोहित करणारा आहे. सध्या उपलब्ध पर्यायांमधे बहुतांशी गोष्टींचं सवडीशास्त्र तर झालंच आहे शिवाय ह्या गोष्टींविषयी फार विचार करायला, त्याचा अर्थ समजून घ्यायलाही कुणाला वेळ नाही. आज मात्र खरंतर आपत्तीमुळं हाती आपसूक आलेल्या भरपूर वेळामुळं मन केवढा मोठा फेरफटका मारून आलं, फ्लॅटसमोरच्या छोट्याश्या जागेत छोटंसं चैत्रांगण काढताना बालपणाच्या त्या सुंदर आठवणींमधे मनसोक्त बागडलं, सैरावैरा धावलं... आणि तिथून परतताना एका क्षणी मात्र ते अडखळलं. वाटलं...

आज आयुष्यातून हा भावच तर हरवून गेलेला नाही!? त्याचीच फळं तर मानवप्राणी भोगत नाहीये ना!? व्यवहारी जगात काटेकोरपणे पै-पैचा हिशोब ठेवणारे आपण निसर्गानं फुकट प्रदान केलेली अमाप, अनमोल संपत्ती ना राखतो ना त्याविषयी साधा कृतज्ञभाव जपतो. मग ती संपत्ती लाभावी तरी कशी? आजच्या कठीणसमयी हा विचार पाठ सोडता सोडेना! तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे देव भावाचा भुकेला
दास सेवकांचा झाला।... अश्या भावाच्या भुकेल्या देवाला... निसर्गदेवतेला, आपण ज्यातून निर्मिलेले आहोत त्या पंचतत्वांच्या देवतांना आपण भुकेलेच तर ठेवत नाहीये ना? मग निसर्गाचा प्रकोप टळावा तरी कसा? नुकताच कोरड्या दुष्काळापाठोपाठ ओला दुष्काळही आपण आनुभवला... त्यातून अजून पुरेसे सावरतोय, न सावरतोय तोवर ही आपत्ती! ह्या आपत्तीची बीजं थोडी वेगळी आहेत... पण देश-विदेशांच्या सीमा पुसून टाकल्या तर हीसुद्धा मानवनिर्मित, निसर्गावर कुरघोडी करू पाहाणाऱ्या मानवाच्या मस्तवाल प्रवृत्तीमुळंच ओढवलेली आपत्ती आहे हे निर्विवाद!

बरं... आपत्ती ओढवली आहे, त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी काही बंधनं पाळणं आज अत्यावश्यक होऊन बसलं आहे. पण अंतरीचा हरवलेला भाव इथंही आपली पाठ सोडत नाही आणि त्याची जुळी भावंडं अहंकार व बेफिकिरीही मागोमाग धावत येत असल्याने आपण आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतो आहोत.. पर्यायानं देशाला अस्मानी संकटात ढकलतो आहोत. देशात जिथं-जिथं आवश्यक ते निर्बंध न पाळता मस्तवाल मनुष्यप्राणी मोकाट सुटला आहे तिथं ह्या आपत्तीनं गंभीर स्वरुप धारण केल्याच्या वार्ता आहेत. कधी जागे होणार आपण? कधी आपल्या कोषातून बाहेर पडणार? कधी आत्मकेंद्रितपण सोडणार? काळजाची हाक ऐकण्याएवढे संवेदनशील कधी होणार? आपली जबाबदारी कधी ओळखणार? कि कसलाच धरबंध न राखता प्रलयाचा प्रवाह बळकट करत राहाणार? ह्यानं काही साधणं तर दूरच.. आहे ते उरलंसुरलंही गमावून बसू आपण! स्मरण ठेवूया कि, आपण कधीच स्वयंभू नसतो, दृश्य स्वरूपातले आपले शिल्पकार आपल्या डोळ्याला दिसत असतात, मात्र अदृश्य स्वरूपातही अनेकजण आपलं आयुष्य सावरत असतात. जाणवून घेणाऱ्याला हे जाणवल्याशिवाय राहात नाही. आज अजून आपल्या उंबऱ्याशी ही आपत्ती गंभीर स्वरूपात पोचलेली नाही त्याचं कारण आपल्याला अश्याच अनेक अदृश्य हातांनी अलगद उचलून धरलं आहे.. त्या आपत्तीचा हात आपल्यापर्यंत पोचू नये म्हणून! ह्यासाठी आपण त्याचं कृतज्ञ राहावं तेवढं थोडं आहे. ही कृतज्ञताही नाहीच जमली तर किमान तटस्थ, शांत न राहून, मोकाट फिरून त्यांचा भार तरी वाढवायला नको. ह्या सर्व यंत्रणांनी, त्यातल्या प्रत्येक जिवानं आपलं आयुष्य पणाला लावून आपल्याला अलगद उंच उचलून धरलं आहे.. पण आपणच तिथून खालच्या संकटात उडी घ्यायला निघालो तर आपल्याला कोण आणि कसं वाचवू शकणार!? अश्या वर्तनानं आपण तर खाईत लोटले जाऊच.. सोबत आपल्या भोवतालचे चारजण घेऊन जाऊ आणि आपल्याला पेलून धरणाऱ्यांचीही फळी कमकुवत करून सगळाच डोलारा ढासळवून टाकू! गांभिर्यानं विचार करायची वेळ आली आहे... तो प्रत्येकाकडूनच घडावा आणि अंमलातही आणला जावा!
आपत्तीनं गंभीर स्वरुप धारण केल्याच्या वार्ता आहेत. कधी जागे होणार आपण? थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस चौथा..27/3/2020

लॉकडाउन च्या काही दिवस आधी मी एक चित्र प्रदर्शनी पहिली. त्यात प्रत्येक चित्राला एक शिर्षक दिले होते एका माणसाचे चित्र होते ते त्यात त्याचे अंग पुर्ण घट्ट वस्रांनी झाकलेले होते डोक्यावर लांबसडक केस आणि त्याच्या पायाला पंख लावलेले होते. त्याला पकडायचे असेल तर त्याचे केस पकडले पाहीजेत अस होत नाहीतर तो पायाला लावलेल्या पंखानी केव्हा उडून जाईल हे सागता येत नव्हत या चित्रातच शिर्षक होत संधी!

अचानक आपल्या पुढे आलेल्या संधीला आपण झटकन पकडू शकलो नाही तर ती पुन्हा कधीच आपल्या वाटेला येत नाही हा चित्रबोध त्याचक्षणी माझ्या मनात ठसला. आपल्या जिवन प्रवासात मोलाचे दगड येतात. आपण किती चाललो हे ते सांगतात. पण ते आपल्या मुक्कामापर्यत येत नाहीत त्यासाठी आपल्यालाच चालावं लागतं. संधी म्हणजे निराश माणसाला भेटलेली हिंमत होय...संधी नवा रस्ता दाखवते. नवी दिशा देते योग्य संधीची निवड करून आपल्या जिवनाचा विकास करण्यातच खरा पुरूषार्थ लपलेला आहे...

आज आपल्यावर जे जागतीक संकट आलयं आहे ते आपण बदलू शकणार नाहीच आहे, पण जगन्नियंत्यानं आत्ता आपल्याला त्यातुन तारण्यासाठी एक संधी दिली आहे. त्यात आपल्याला फक्त शांत, स्वस्थ राहाण्याची जबाबदारी दिली आहे आणि ती ‘तैसीच’ आपण पार पाडली तर संकट निवारणाऱ्यांच्या प्रयत्नांना अर्थ आणि धार प्राप्त होईल. तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त ‘तैसेची’ न राहाता ‘चित्ती समाधानही असू दिले’ तर अगदी दुधात साखरच! आजच्या सुखाच्या फक्त दोन क्षणांनी ह्याची जाणीव मला करून दिली. ही सकारात्मकता आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्मिली गेली आणि त्याच सकारात्मकतेनं मिळालेल्या चार क्षणांत सौंदर्य शोधत आपण शांत, स्वस्थ राहिलो, आपल्या मनातलं नाठाळपण निपटत राहिलो तर त्या नाठाळ संकटाची काय बिशाद की ते आपल्या उंबऱ्यात येईल!? उलट आपल्या सकारात्मक प्रयत्नांचे प्रचंड ऊर्जास्त्रोत आपल्या लढवैय्यांचे बाहू बळकट करतील आणि अरिष्टाला लवकरात लवकर नामशेष करतील.
अाणि संधीच सोनं होईल. आणि आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू .....
समाधानी राहुन संधीच सोन करूया का?
थोड विचार 'करो ना'
अनामिका(PMJ)

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस तीसरा..26/3/2020

गुढी नभात उंचवू, स्वराष्ट्र शक्ती वाढवू ।

भारती मनामनात राष्ट्रतेज जागवू ।।हिंदूनुतनवर्षाभिनंदन !

चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपळ सकाळी अभ्यंगस्नान करतो व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करतो.
गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालतो. तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करतो. तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधतो व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करतो. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. 

पण मित्रहो दुर्दवाने आजचा गुढीपाडवा खुप वेगळा आहे. आपल्यासाठीच नाही तर संपुर्ण जगासाठी ही परिक्षेची घडी आहे .आज जणू प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनी आपली कठोर परीक्षा आरंभली आहे. एक पताका आपणा सर्वांच्या हाती सुपूर्द केली आहे आणि एकवीस दिवस ती डोळ्यांत तेल घालून राखायची आहे. बळकट मनोबलानं तिला पेलायचं काम आपणा सर्वांना मिळून करायचं आहे. एकाचा जरी तोल ढळला तरी सगळेच ढासळतील अशी अवस्था आहे. एकवीस दिवस हे कर्तव्य निष्ठेनं निभावलं तर मात्र ही पताका विजयपताका होऊन जाईल आणि आपण सगळे मिळून हे नक्कीच करू शकतो

ज्या दिवशी आपण हे करू त्यादिवशी जिंकायच्या दृढ निश्चयाच्या टणकदार स्तंभावर आपल्या करोंडोंच्या प्रार्थनेच्या सुमधूर रंगीबेरंगी साखऱ्या होऊन करोडो साखरमाळा त्या गुढीशी रुळलेल्या असतील, आपल्या करोडोंच्या मनातल्या ह्या संकटजन्य ताणतणावांचा निचरा होऊन त्यातूनच शुद्धीकरणप्रिय कडुनिंबाच्या डहाळ्या उगवतील, आपल्या करोडोंच्या मनातल्या कृतज्ञतेच्या सुवासिक सुमनमाळा होऊन गुढीची शोभा वाढवतील, या कठीण परीक्षेच्या काळात नियमांत राहूनही आपण एखाद्या गरजूसाठी केलेली छोटीशी मदत सद्‌सद्‌विवेकाचं अन्‌ दातृत्वाचं प्रतीक होऊन गडूचं रूप घेईल, आपणा करोडोंच्या एकात्मतेचं, एकजुटीचं सुगंधी चंदन, स्वत:च्या जिवाची बाजी लावून आपणा करोडोंसाठी अहोरात्र झटणाऱ्या जिवांच्या सेवाभावाच्या मांगल्यात रंगलेलं हळदी-कुंकू आणि आपल्या करोडोंच्या निग्रह, निर्धाराचे झुळझुळीत महावस्त्र त्या गुढीची शान ठरेल. अश्या अभूतपूर्व गुढीचे पाईक आणि तिच्या पूजनाचे साक्षीदार आपल्याला व्हायचंय ही खूणगाठ मनाशी बांधूया... डोळ्यांत मावणार नाही इतक्या उंचीवर ह्या गुढीची पताका नेऊया... सहजा सहजी कुणी धक्का लावू शकणार नाही इतकी घट्टपणे ती रोवूया... आणि... जिंकूया...
हो आपण नक्कीच जिंकूया....
एकविस दिवस कर्तव्य पालन करून
विजयपताका घट्टपणे रोवूयात का?
थोडा विचार 'करो ना'
अनामिका (PMJ)

थोडा विचार करो ना' लॉकडाउन दिवस दुसरा..25/3/2020

देश-धरमपर मिटनेवाला शेर शिवाका छावा था ।महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था ॥धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज तिथीनुसार बलिदानदिन ! विनम्र अभिवादन !

१. जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा
२. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा
३. आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा , त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला
४. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा
५. उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
६. इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा
७. धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा
८. बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा करणारा
९. शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा
१०. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
११. देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
१२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा
१३. सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
१४. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
१५. स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा
१६. 'राष्ट्र’ जिवंत ठेवण्यासाठी साध्या कल्पनेनेही थरकाप उडेल असा अमानुष छळ... ह्या सच्च्या योद्ध्याने तोंडातून ब्रसुद्धा न काढता हसत हसत झेलला.
कठीण परीक्षेच्या क्षणांमधे आधार शोधत असताना अशी आदर्श व्यक्तीमत्वेच आपल्याला योग्य वाटा दाखवत असतात. अश्या अनेक वीरांच्या भूमीत आपण जन्म घेतला ह्याचं समाधान मानण्याचा आजचा दिवस!

आज आपल्यावरचा प्रसंग ह्यापेक्षा कितीतरी सोपा आहे. परीक्षा द्यायला लावणारा आहे. सुखसोयींनी भरलेल्या घरात आपल्याला फक्त शांत बसायचं आहे. मृत्यूला हसत हसत आलिंगण देणारे थोर क्रांतिकारक आपण आठवू या .. स्वातंत्रवीर सावरकरांनी राष्ट्रासाठी अकरा वर्षे अंदमानाच्या काळकोठडीत शत्रूचा छळ सोसत कशी काढली असतील असा नुसता विचार जरी मनात आणला तरी घरातून बाहेर पडणारं आपलं पाऊल नक्कीच थबकेल. आपल्या घराच्या उंबरठ्यालाच आपली मर्यादा मानून ती न ओलांडण्याचं व्रत घेऊन आपण ह्या संकटाशी चाललेला मुकाबला यशस्वी करूया. शासनयंत्रणेनं वेळेत पावलं उचलून युद्धपातळीवर काम सुरू केलं आहेच... आपण नियमभंग करून त्यांची ताकद व वेळ आपल्यावरच्या कार्यवाहीत खर्च होणार नाही इतकंच सांभाळूया!
त्यांच्यावरचा ताण वाढवायचं बेजबाबदार कृत्य नको. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड साठा नको.
नियमांचे भान राखूया! सुचनांचे पालन करून, आपला खारीचा वाटा उचलूया! निरोगी राहुया.....
निरोगी राहुन, नियमांचे, सुचनांचे पालन करूया
आपला खारीचा वाटा उचलूया का?
थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)