Sunday, 24 September 2017

नाती अनमोल असतात

     नाती अनमोल असतात

       काही नाती अनमोल असतात,अशी नाती जपायची असतात. 
       काही जपूनही पोकळ राहतात तर काही मात्र आपोआप जपली जातात.
     समाजात आपला दर्जा राखून ठेवण्यासाठी आपण खूप धडपड करत असतो. त्यागडबडीत आपण धड घडतही नसतो आणि पडतही नसतो. खूप वेळेस एखादी मिळालेली जागा आपण गमवून बसतो आणि मग त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत राहतो. त्याचप्रमाणे जागा हि एखादे पद असो किवा कोणाच्या मनातले स्थान असो, ती मिळवायला इतका वेळ लागतो कि आयुष्यही कमी पडते त्याच उलट ती जागा गमवायला एक क्षणही पुरेसा असतो. प्रश्न असतो विश्वासाचा, आपुलकीचा आणि भावनेचा. पण गम्मत तर इथे अशी असते कि, हि आपुलकी, भावना जपायची कुणी हा मुद्दातर फारच निराळा. असो आपण सर्वच ह्याबाबतीत जाणकार आहोतचं

      जीवनात नाती अनेक असतात पण जपणारी लोक फार कमीच असतात. काही नातं रक्ताचे असतात तर काही हृदयानेच जोडली जातात.  काही जन्मोजन्मीची तर काही क्षणापुरतीच. काही नाती झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोव्ल्यागत तर काही झाडाच्या फांदीसारखी अलगद तुटणारी. नाती हि अशी सहज रुजली जात नाहीत, तर त्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित खतपाणी आवश्यक असते. जर हे खतपाणी नियमितपणे दिले गेले नाही तर ते फार काळ तग न धरू शकत नाही.

   नात्यांचे खतपाणी हे भावनांच्या ओलाव्याने, प्रेमाने केलेल्या विचारपूसने आणि वेळप्रसंगी मदतीला धावणाऱ्या हाताच्या साह्याने बनलेल्या पाठीचा कणाप्रमाणे असते. पण इतक्याश्या साध्या गोष्टी करतानाही आपण त्यात बरेच कारणे उपस्थित करतो. हो ना? आपण ज्या हौसेने बागेची निगा राखतो, काळजी घेतो. त्याच हौसेने आपल्या जिव्हाळाच्या माणसासाठी धडपडतो का? खरच प्रश्न मनात आलाच ना? काय असावं बंर हे?

   स्वतःसाठी सुंदर घर असावे हे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच वाटते. पण आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करायला शिकलो कि जिथे जाऊ तिथे ते घर आपले आणि त्या घरातली माणसेही आपलीचं. खूप साधी गोष्ट वाटते ना वरवरून पण तितकाच मृगजळाप्रमाणे भासणारी आणि तितकीच सहजतेने अवगत होणारी आहे. बसं ती सहजता आपल्यात अवगत करायला शिकले पाहिजे आणि त्यात फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे बोलणे असायला हवे. नात्यांमधली हि सहजता ज्यांनी कोणी हेरली, कि मग ती नाती शेवटपर्यंत आपलीच असतात.

   ग्लोबलाईझेशनच्या युगात जग एवढे जवळ आले आहे कि माणसाला आता प्रत्यक्षातला संवादाची गरज वाटत नाही. कारण त्याची हि संवादाची जागा आता मोबाइलच्या दुनियेने व्यापली आहे. मोबाइल म्हणजे जिवंत माणूसच आणि ऑपेरेटिंग सीसटम. जशी नवीन ऑपेरेटिंग सीसटम लौंच होईल तशी जुनी फेकून द्या. भयानक वाटतात ना हे विचार सुद्धा? खरच हे सत्य प्रत्यक्षात येण्याआधीच आपण आपल्या नात्याला जगवूया पुन्हा नव्याने खतपाणी घालून. कारण नाती हि पैश्याने विकत घेता येऊ शकत नाहीत. माणूस एकदा निघून गेला ना  कि तो पुन्हा भेटत नाही. त्यामुळे आपल्या माणसांना जपुयात, त्यांची काळजी घेऊयात. शक्य तितका वेळ स्वतःला आणि आपल्या जिव्हाळाच्या नात्यांना देऊयात, नाती जपुयात......
कारण एकाच नाती अनमोल असतात.......
अनामिक (PMJ)

Saturday, 23 September 2017

माझ्या नजरेतून श्रध्दा भक्ती.......


माझ्या नजरेतून श्रध्दा भक्ती....... 

"मी कधीच नाही म्हंटले कि तू दे मज दर्शन" ही दर्शन नावाची कविता शाळेत असतांना खूप छान पाठ होती यात कवी म्हणतात हे ईश्वरा जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तुझं दर्शन होतंय, मग तुला वेगळं दर्शन मी काय मागू ? कविता शिकत असतांना त्याचा फारसा अर्थ कळाला नाही पण आता कळतोय. गणेशाला शमीपत्र, महादेवाला बेल, दूध, खुपसारी फळ, आणि वाट्टेल तितकी फुल हे त्याचच त्याला देऊन मी त्याच्याकडे काय मागते? माझं सुख की नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान आणि माझ्याच भविष्याचं नुकसान?

झाड तोडू नये मोठ्या आवेगान म्हणतो आपण, पण भविष्याशी तरदूत म्हणून एकतरी झाड जगवतो का आपण? नुसतच म्हणायचं झाडे तोडू नका, पण बेलाची १०८ पान तोडल्याशिवाय मन भरत आपलं?
गणेशाला दुर्वा तर हव्यातच अरे पण त्याला सुंदर सृष्टीदेखील हवीय हे नाही लक्ष्यात येत. 
हेच आणि इतकच नाही त्याहीपलीकडे खूप गोष्टी अश्या आहेत कीं ज्याच्याकडे आपलं लक्ष्यच जात नाही तरी देवा मला पाव ही भक्ती?, ही श्रध्दा म्हणावी का ?
कुठेतरी वाचलेली एक सुंदर गोष्ट मला आज आठवतेय....

एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का?
वि. : हो निश्चितच सर..
प्रो. : देव हा चांगला आहे?
वि. : हो सर
प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे?
वि. : हो सर अर्थातच ..
प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही? (सर्व वर्ग शांत झाला). कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.'
प्रोफेसर पुढे बोलू लागले.
प्रो. : राक्षस चांगले आहेत?
वि. : नाही सर ..
प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?
वि. : हो सर...
प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?
वि. : नाही सर ..
प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?
वि. : हो सर...
प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'  (विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले.
प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस?
वि. : नाही सर ...
प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे?
वि. : नाही सर... असे काहीही नाही.
प्रो. : मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील?
वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.
प्रो. : हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.
वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का?
प्रो. : अवश्य ...
वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .
प्रो. : हो आहे ना.
वि. : आणि शीतलता?
प्रो. : हो अर्थातच ...
वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.' (वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता)
वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे?
प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?
वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .
प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.
वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.
विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .
विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ... मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.
सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..
प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.
वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ... (सर्व वर्गात हशा पिकला)
सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?
प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..  (आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)
वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही.... (सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या) पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो Minds Ignite केले. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी 'Wings of Fire' दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...
याला म्हणूयात खरी श्रध्दा खरी भक्ती आणि त्यातली शक्ती....... ती देवाला काही देऊन, नवस करून नाही मिळत.त्यासाठी श्रद्धाच ठेवावी लागते.
अनामिक (PMJ)

Friday, 22 September 2017

यशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग.....

यशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग.....
   गाडी एकदा घेतली की ती आपली आणि आपलीच राहणार चांगलीच राहणार हि अपेक्षा व्यर्थ आहे. त्यासाठी गरज असते ठराविक काळानंतर त्याच्या सर्व्हीसिंगची.  नात्यांचं असंच असतं त्याला सतत ताजेपणा लागतो तुम्ही एकमेकांसोबत किती वर्ष राहिलात यापेक्षा महत्वाचे ते तुम्ही एकमेकांसाठी काय आहात आणि किती आहात. 
   खरंतर नाती Live-in असतात. महत्वाचं असतं तुमच्यातील नातं एकमेकांसाठी किती आहे. की ती फक्त अपरिहार्य केलेली सोबत आहे! नात्यातला गोडवा तोपर्येंत असतो जोपर्येंत तुम्हाला एकमेकांची ओठ आहे एकमेकांविषयी विश्वास आहे नात्याला सतत ताजेपणा लागतो नावीन्य लागत. तुम्ही केवळ बरोबर राहता म्हणजे तुमच्यात प्रेम असेलच असं नाही ते प्रेम वाढत राहण्यासाठी सतत काहीतरी करावं लागत म्हणू तुम्ही एकमेकांसाठी काय आहात किती आहात आणि कोण आहात ते महत्वाचं .......

    अनिल अवचट यांचे "स्वतःविषयी" हे आत्मचरित्य बायको सुनंदाला अर्पण करतांना ते लिहितात " हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला माझ्यातून काहीकाळ बाहेर काढावं लागलंय त्यासाठी थोडी रुखरुख होतेय " या ओळीतून त्यांचं एकमेकांसाठी असणं म्हणजे काय ते कळत.

    माझ्या एक मैत्रिणीचं मला नेहमी औत्सुक्य वाटत काय असेल तीच आणि तिच्या आहोनं मधील नातं पूर्वी लग्न झालेलं असतांना आणि आपल्याकडे कायम दुसरेपणा येणार हे माहित असूनही एकत्र येण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच सोपा नसावा, पण त्याहीपेक्षा सोपं नव्हतं १५ - २० वर्ष हे नातं टिकवणं ती आजही नवऱ्याचं नाव घेतांना जे लाजते ना ते आत्ता लग्न झालेली मुलगीदेखील लाजणार नाही.

   मला वाटत तुम्ही एकमेकांबरोबर किती काळ राहता यापेक्षा महत्वाचं आहे तुमच्यातला वेळ तुमच्यातील प्रेम वाढवतोय की नाही ते ! अन्यथा परदेशी किंवा परगावी नोकरीला असतांना काही आठवडे, काही महिने,एकमेकांचं तोंडही न पाहणारी जोडपी सुखानं नांदलीच नसती.

   मान्य आहे की आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला इतरही अनेक व्यवधानं आहेत स्वतःच अस्थित्व टिकवायचं आहे स्वतःला सिध्द करायचं आहे पण तुमच्यातल्या नात्याचा बळी देऊन जर हे सिध्द करायचं असेल तर त्याचा आनंद ना धड तुम्ही घेऊ शकाल ना इतर.....

   कुणी कुठल्याही नामवंत व्यक्तीला त्यांच्या यशाचं कारण विचारा, मेहनत तर आहेच पण त्याहीपलीकडचं मानसिक समाधान महत्वाचं आणि ते घरातून मिळत असंच उत्तर तुम्हाला मिळेल नवरा बायको म्हणून तुमच्यातलं नातं जर परिपक्व नसेल तर ?

   तुम्ही कायद्याने एकत्र आहेत की नाही या पेक्ष्या महत्वाचं आहे ते तुम्ही मनाने एकमेकांचे आहेत कि नाही आणि म्हणून मघाशी म्हटल्याप्रमाणे गरज आहे ती नात्याला वेळ देण्याची नात्याच्या सर्व्हीसिंगची नात्याला भरभरून वेळ द्या त्याला फुलू द्या तुम्ही खूप खूप आनंदी राहाल आणि तुमचा आनंदच तुमच्या यशाचं कारण ठरेल.

Hum Hain Iss Pal Yahan, Jaane Ho Kal Kahan
Hum Miley Na Miley, Hum Rahey Na Rahey
Rahegi Sadaa Yahan, Pyar Ki Ye Dastan
Sunenge Sadaa Jise,Yeh Zameen Asmaan 


अनामिक (PMJ)

Thursday, 21 September 2017

शोधूयात आजच्या चांगल्या गोष्टी.............

शोधूयात आजच्या चांगल्या गोष्टी.............



   रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.
   असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

   जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडेलक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायच. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या. पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या.

   आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.

   तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत :ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही
शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊ लागलात की मित्रांना विचारा 'आजची चांगली गोष्ट काय?'

   आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं ठरवलं तरी वर्षाच्या 'चांगल्या गोष्टींची' यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊ शकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद
देऊ शकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर…
अनामिक (PMJ)





Wednesday, 20 September 2017

तुला टाळणे, मला शक्य नाही

तुला टाळणे, मला शक्य नाही
तुझे भाळणेही, मी जाणते आहे,
कशी सावरू सांग माझ्या मनाला,
इथे थांबणे जाळणे होत आहे.......  
Anamika(PMJ)

Thursday, 20 April 2017

जिसने चलना सीखाया,

जिसने चलना सीखाया,
उसीने सम्भलना भी सीखाया होगा.
मुश्किल है ये जिंदगी तो क्या हुआ ,
तुझे नया आसमा बनाना होगा....
अनामिका(PMJ)

Monday, 17 October 2016

आम्ही प्रोग्रामर्स
हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
सकाळी उशिरा उठणारे आम्ही, देवाआधी मोबाईल कडे पाहतो.
आमच्या सुंदर डोळ्यांनी, संगणकावरील निर्जीव चित्रे पाहतो.
निसर्ग पाहायला जायला, आम्हाला वेळ कधी का मिळतो ?
कारण हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
आई-बाबांशी नाही पण मित्रांशी आम्ही खूप खूप वेळ बोलतो.
काय भाजी करायची आज, हे देखील सर्च करून सांगतो.
स्वयंपाक आई करते, पण तो कसा झाला हे सांगायला तिसराच व्यक्ती शोधतो.
कारण आई नावाचा प्राणी कधीच online नसतो.
हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
प्रेम, माया, प्रीती, या साऱ्या भावना शब्दांत वर्णन करतो.
शब्द अपुरे पडलेच तर, फिलिंग चा उपयोग करतो.
समोरच्याला शब्दांचा अर्थ निट कळला तर ठीक, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो.
नात्यांचा गुंता सुटण्याआधी अधिकच गुंतत जातो.
कारण हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
आजी-आजोबा सोबत नसतांना, कशी जळते पणती ?
परक्या खोट्या नात्याची, वाटत नाही का कधी भीती ?
मोठ्या अवघड स्वप्नांची, वेळे अभावी कशी होईल पूर्ती ?
अपेक्षा, इच्छा, प्रयत्न, ध्यास, pending च राहती
कारण हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
नाती टिकण्यासाठी कशा कशाचीच गरज नसते
हवा असतो फक्त थोडासा सहवास .....